इन्स्टाग्राम वापरून कसा कमवायचा पैसा?

डॉना मॅककुलोच Image copyright Sulky doll
प्रतिमा मथळा फॅशन स्टायलिस्ट डॉना मॅककुल्लोच

आपला व्यवसाय वाढवण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर तुम्ही करता का? जगभरातले अनेक छोटे मोठे व्यावसायिक आपल्या व्यवसायवृद्धीसाठी इन्स्टाग्रामचा वापर करत आहेत.

यातून त्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. त्यांनी सांगितलेली काही रहस्यं या लेखातून देण्याचा पदार्थ. त्यांचं पालन तुम्ही केलं, तर तुमच्या व्यवसायात अनेक पटींनी वाढ होऊ शकते.

2012मध्ये फेसबुकने इन्स्टाग्राम हे अॅप 1 अब्ज डॉलरला (अंदाजे 6400 कोटी रुपये) विकत घेतलं तेव्हा सर्वांनी भुवया उंचावल्या होत्या. त्यावेळी इन्स्टाग्राम केवळ 18 महिन्यांचं होतं.

ही तर झाली तेव्हाची गोष्ट, आता आपण 2017 मध्ये येऊ. जरी फेसबुकपेक्षा इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या कमी दिसत असली तरी ट्विटर आणि स्नॅपचॅटच्या तुलनेत इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या 70 कोटी आहे.

फोटो फिल्टर्स आणि 24 तासांपुरताच व्हीडिओ टाइमलाइनवर राहणं या दोन फीचर्समुळं फ्रीलान्सर्ससाठी इन्स्टाग्राम म्हणजे प्रमोशनसाठी हक्काचा प्लॅटफॉर्म बनला आहे. याद्वारे व्यावसायिकांना नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचणं सोपं झालं आहे.

कसा वाढवायचा व्यवसाय

इन्स्टाग्रामचा वापर करून तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्याची इच्छा आहे?

"इन्स्टाग्राम हे तुमच्या व्यवसायाचं प्रथमदर्शनी रूप आहे," असं फॅशन स्टायलिस्ट डॉना मॅककुल्लोच म्हणते.

"आजकाल कुणी मला माझं व्हिजिटिंग कार्ड मागत नाही. तर लोक मला विचारतात तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटचं हॅंडल काय आहे? आम्ही आमचे फोन बाहेर काढतो आणि दुसऱ्या क्षणी आम्ही कायमचे एकमेकांच्या संपर्कात राहतो."

Image copyright cat meffan
प्रतिमा मथळा योग शिक्षिका कॅट मेफान

कॅट मेफान ही युवती योग शिक्षिका आहे. ती तिच्या अकाउंटवर आपले ग्लॅमरस फोटो टाकत असते. तिचे 77,000 फॉलोअर्स आहेत. जगभरातील विविध ठिकाणी जाऊन ती आपले फोटो टाकत असते.

आपल्या चाहत्यांनी आपल्याकडे पाहून प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी देखील ही जीवनशैली आत्मसात करावी या उद्देशाने तिने इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केलं होतं. पण आता तिला याचा व्यावसायिक फायदा देखील होत आहे.

"मी नुकताच एक योग शिबिर घेण्याचा विचार केला आणि त्याचं पूर्ण बुकिंग झालंसुद्धा. मी फक्त एकच काम केलं. ते म्हणजे माझा एक फोटो मी इन्स्टाग्रामवर टाकला. मला आनंदही झाला आणि धक्कादेखील बसला. हीच इन्स्टाग्रामची खरी ताकद आहे," असं ती म्हणते.

"मी जे फोटो टाकणार आहे त्याच्या कॅप्शनसाठी कधीकधी एक तास देखील घालवते. कधीकधी मी माझ्या साथीदाराच्या मदतीने फोटो काढते. पण बहुतांश वेळा मी फोनमधील सेल्फ टायमर या फीचरचा वापर करून फोटो काढते आणि अपलोड करते, " असं कॅट म्हणते.

हॅशटॅग महत्त्वाचे

डॉनाप्रमाणेच कॅटला देखील फोटोसोबत टाकले जाणारे हॅशटॅग अतिशय महत्त्वपूर्ण वाटतात. ती म्हणते जर हॅशटॅग योगा (#Yoga) किंवा हॅशटॅग आउटफिट ऑफ द डे (#Outfitoftheday) जर आपल्या फोटोसोबत टाकलं तर आपला फोटो जास्तीत जास्त लोकापर्यंत जातो.

"समविचारी लोक शोधण्याचं हे चांगलं ठिकाण आहे," असं कॅट म्हणते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सेलेना गोमेझचे इन्स्टाग्रामवर 12 कोटींच्यावर फॉलोअर्स आहेत.

इन्स्टाग्रामच्या 'स्टोरीज' या फीचरचा त्या दोघी देखील प्रभावी वापर करतात. त्या फीचरच्या साहाय्याने त्या व्हीडिओ टाकतात. आपण कोण आहोत याची ओळख आपल्या फॉलोअर्सला देण्यासाठी हे महत्त्वाचं फीचर आहे असं त्या म्हणतात.

"तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यात कसे आहात हे दाखवण्यासाठी या फीचरचा वापर करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही जशा तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आहात तशाच वास्तविक आयुष्यात देखील आहात असं जेव्हा लोक मला म्हणतात तेव्हा मला खरा आनंद होतो," असं डॉना म्हणते.

थीमवर आधारित अकाउंट

डॉना आणि कॅटमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे त्यांचं अकाउंट एखाद्या थीमवर आधारलेलं आहे. जसं की योगा किंवा लाइफ स्टाइल.

"जर तुम्हाला तुमचे फॉलोअर्स वाढवायचे असतील तर तुम्ही एखादा विषय घेऊन त्या संबंधित पोस्ट करणं आवश्यक आहे," असं डॅनी कॉय म्हणतात. डॅनी कॉय हा फोटोग्राफर आणि इन्स्टाग्राम कंसल्टट आहे. त्यांचे 1,73,000 फॉलोअर्स आहेत.

'24 तासाला एक तर पोस्ट'

"आमचा फर्म इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या महिन्याला 2000 ने वाढवून देऊ शकतो," असा दावा ते करतात. त्यासाठी तुम्हाला महिन्याला 300 पाउंड एवढी फी त्यांना द्यावी लागते.

"तुम्ही रोज अकाउंटवर काही ना काही टाकावं असं काही नसतं, पण ज्यावेळी तुम्ही फोटो टाकताल त्यावेळी लोकांना ते आवडायला हवेत. 24 तासांमध्ये एक पोस्ट टाकली तर तुमचे फॉलोअर्स चटकन वाढू शकतात असा पण आमचा अनुभव आहे," असं कॉय यांनी सांगितलं.

Image copyright Danny coy
प्रतिमा मथळा तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या देखील कार्यरत आहेत.

तुम्हाला तुमचं खास वैशिष्ट्य काय आहे याची माहिती हवी. इनस्टाग्रामने पण हाच सल्ला दिला आहे.

"जर दरवेळी तुम्ही काहीतरी वेगळं सांगितलं तर लोकांना हेच समजणार नाही की तुमचा खरा मुद्दा काय आहे. तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता हेच त्यांना समजणार नाही," असं जेन रॉनन सांगतात.

रॉनन हे इन्स्टाग्रामच्या युरोप, आखाती देश आणि आफ्रिका या क्षेत्रासाठी कार्यरत असलेल्या लघु उद्योग विभागाचे प्रमुख आहेत.

फॉलोअर्स वाढवण्यासाठी...

"तुमच्या ग्राहकांना काय हवं आहे काय नको याची माहिती तुम्हाला हवी. त्यांना जे हवं आहे ते सातत्यानं तुम्ही इन्स्टाग्रामवर द्यायला हवं," असं रॉनन म्हणतात.

डॅनीचे क्लायंट्स प्रामुख्याने कंपन्या आहेत. त्यांना त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढवून आपणही या स्पर्धेत आहोत हे दाखवायचं असतं.

"जेव्हा पण एखादा फोटोग्राफर इन्स्टाग्रामवर येतो त्यावेळी तो फॉलोअर्सच्या संख्येवर समाधानी नसतो. पण त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रत्येकाला केव्हा ना केव्हा सुरुवात करावीच लागते," असं डॅनी म्हणतात.

त्याच बरोबर जर तुमचे फॉलोअर्स जास्त वाढले तर त्यांना कंपन्या इंफ्ल्युएंसर किंवा अॅम्बेसिडर म्हणून पैसे देऊ करतात.

ब्रँ प्लेसिंग

जर तुम्ही सेलिब्रिटी असाल तर तुमच्या फोटोच्या बाजूला विशिष्ट ब्रॅंडची वस्तू ठेवणं (ब्रॅंड प्लेसिंग) हा देखील एक जाहिरातीचा प्रकार आहे असं कंपन्यांच्या लक्षात आलं आहे. पण या पर्यायाचा जपून वापर करायला हवा.

"मी हे करत नाही. यामुळं मी माझी विश्वासार्हता गमवू शकते. पण ज्या ब्रॅंड्सवर माझा विश्वास आहे ते ब्रॅंड मी वापरून फोटो अपलोड करते," असं डॉना म्हणते.

"मी बऱ्याच ब्रॅंड्सला नाही म्हणते. पण एखाद्या ब्रॅंडची प्लेसिंग करणं माझ्या प्रतिमेसाठी चांगली असेल तर मी ते जरूर करते," असं कॅट म्हणते.

"मला दीड वर्षांपूर्वी कंपन्यांकडून ब्रॅंड प्लेसिंगसाठी महिन्याला 2000 ते 3000 पाउंड मिळत असत. पण आता कंपन्या हुशार झाल्या आहेत," असं डॅनी कॉय म्हणतात.

"जर इन्स्टाग्रामरने त्या कंपनीला टॅग केलं तर ती कंपनी त्या इन्स्टाग्रामरचा फोटो वापरू शकते. बऱ्याचदा इन्स्टाग्रामर कंपनीला टॅग करण्याआधी पैशांची बोलणी करून घेतात," असं कॉय म्हणतात.

पण जे लोक तुम्हाला आवडतात ते नकळत एखाद्या ब्रॅंडची जाहिरात करतात. हे अयोग्य नाही का? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो.

Image copyright Mariam Hardey
प्रतिमा मथळा मारियन हार्डे, प्राध्यापिका, डरहॅम विद्यापीठ

यावर मारियन हार्डे या डरहॅम विद्यापीठातील प्राध्यापिकेनी दिलेली प्रतिक्रिया अगदी बोलकी आहे. त्या म्हणतात, "इन्स्टाग्राम वापरणारे एवढे बुद्धू आहेत असं समजणं चूक ठरेल. कारण फिल्टर्स वापरले की तुम्हाला कळू शकतं की ही पोस्ट स्पॉन्सर्ड आहे, ब्रॅंडेड आहे खरी आहे हे कळू शकतं."

"सर्वात महत्त्वाचं आहे की तुमची पोस्ट ही गमतीशीर आहे का? तुम्ही पोस्ट केलेला फोटो हा सुंदर आहे की नाही याला महत्त्व आहे. जोपर्यंत इन्स्टाग्रामरची पोस्ट ही सर्वांना आवडत असते तोपर्यंत त्याने एखाद्या ब्रॅंडचं प्रमोशन केलं तरी काही हरकत नाही," असं मरियन म्हणतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)