इराणला उत्तर कोरिया होऊ देणार नाही - ट्रंप

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

'इराण न्यूक्लिअर ऍग्रीमेंट रिव्ह्यू ऍक्ट' नुसार अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना दर तीन महिन्यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये इराण कारारचं पालन करत असल्याची ग्वाही द्यावी लागते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणला 'धर्मांध राजवट' संबोधत जोरदार टीका केली आहे. तसंच अमेरिकेच्या पुढाकारानं आण्विक कार्यक्रमासंदर्भात झालेल्या करारापासून मागे हटण्याची धमकी सुद्धा दिली आहे.

या कारारबाबत आता अमेरिकी काँग्रेसच निर्णय घेईल असं ट्रंप यांनी म्हंटलं आहे. तसंच त्यात बदल केला जावा असं आवाहन सहकाऱ्यांना करणार असल्याचं त्यांन म्हंटलं आहे.

'इराण न्यूक्लिअर ऍग्रीमेंट रिव्ह्यू ऍक्ट' नुसार अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना दर तीन महिन्यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये इराण कारारचं पालन करत असल्याची ग्वाही द्यावी लागते.

तसंच काँग्रेसकडून करार पुढे सुरू ठेवण्याची परावनगी घ्यावी लागते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ट्रंप यांनी आतापर्यंत दोन वेळा कारार पुढे सुरू ठेवण्याची संमती अमेरिकी काँग्रेसकडून मिळवली आहे. पण, या वेळी मात्र त्यांनी ते टाळलं आहे.

इराणवर पुन्हा निर्बंध?

ट्रंप यांनी आतापर्यंत दोन वेळा कारार पुढे सुरू ठेवण्याची संमती मिळवली आहे. पण, यंदा मात्र त्यांनी ते टाळलं आहे.

त्यामुळे आता अमेरिकी काँग्रेस 60 दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेऊन पुन्हा इराणवर निर्बंध लादावेत की नाही याबाबत भूमिका घेऊ शकते.

इराण दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा ट्रंप यांनी आरोप केला आहे. तसंच इराणला आण्विक अस्त्र तयार करण्यापासून रोखू असं त्यांनी म्हंटलं आहे.

इराणला उत्तर कोरीया सारखा धोकदायक देश होण्यापासून रोखू असं ट्रंप बोलले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

इराण हा मृत्यू, संहार, आणि अराजकता पसरवत असल्याचा आरोप सुद्धा ट्रंप यांनी केला आहे.

इराणवर आरोप

आंतरराष्ट्रीय निरिक्षकांच्या म्हणण्यानुसार 2015 मध्ये झालेल्या कराराचं इराण योग्य पद्धतीनं पालन करत आहे.

पण, हा करारच मुळात फार उदार पद्धतीनं करण्यात आला होता. तसंच त्यानुसार इराणला ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त हेवी वॉटर (आण्विक अस्त्र तयार करण्यासाठी उपयुक्त प्लुटोनियम स्रोत) तयार करणं आणि आंतरराष्ट्रीय निरिक्षकांना धमकावण्याची सूट मिळाली आहे, असं ट्रंप यांच म्हंणण आहे.

इराण हा मृत्यू, संहार, आणि अराजकता पसरवत असल्याचा आरोप सुद्धा ट्रंप यांनी केला आहे.

इराण कारारचं योग्य पद्धतीनं पालन न करता त्याचा गौरफायदा घेत आहे. त्यामुळे या करारातून कधीही बाहेर पडण्याचा पर्याय अमेरिकेकडे असल्याचं ट्रंप यांनी सुनावलं आहे.

इराणच्या नेत्यांवरही ट्रंप यांनी टीका केली आहे.

महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेबरोबरच्या या करारामध्ये इराणच्या बॅलेस्टीक मिसाईल कार्यक्रमाचा समावेश नाही. त्यामुळेच ट्रंप त्यावर टीका करतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

या करारापासून ट्रंप म्हणजेच अमेरिका एकटीच कशी काय मागे जाऊ शकेत. या करारावर इतरही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. असं इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी म्हटलं आहे.

इराणची प्रतिक्रिया

दरम्यान, "या करारापासून ट्रंप म्हणजेच अमेरिका एकटीच कशी काय मागे जाऊ शकेत. या करारावर इतरही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत," असं इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी म्हटलं आहे.

"या करारामध्ये आणखी नव्या अटी आणि शर्तींचा समावेश करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. पण, त्यात कुठलीही दुरूस्ती ते करू शकत नाहीत हे त्यांना माहिती नाही," असं रुहानी यांनी सरकारी टीव्हीवर भाषण करतांना म्हंटलं आहे.

पुढे त्यांनी म्हंटलं, "ट्रंप यांना आंतरराष्ट्रीय कायदेकानून निट माहिती नाहीत. अनेक देशांमध्ये झालेला करार एखादा राष्ट्राध्यक्ष एकटाच कसा काय रद्द करू शकतो?"

"बहुतेक ट्रंप यांना हे माहिती नाही की हा अमेरिका आणि इराणमध्ये झालेला फक्त द्विपक्षीय करार नाही, ज्याबाबत ट्रंप वाटेल ते करू शकतील."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ट्रंप यांच्या भूमिकेबद्दल ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, रशिया या देशांनी चिंता व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया

ट्रंप यांच्या वक्तव्याच्या काही मिनिटांनंतरच युरोपीय संघाच्या परराष्ट्र विभागाच्या प्रमुख फेडरिका मोगरीनी यांनीही या विषयावर आपलं मत व्यक्त केलं.

त्या म्हणाल्या, "हा करार खूप मजबूत आहे. आणि करारात जी बंधनं घालण्यात आली आहेत त्यांचं उल्लंघन झाल्याचं मला वाटत नाही."

"तसंच जगातल्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला हा करार एकतर्फी संपवण्याचा अधिकारी नाही. कारण हा करार संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाअंतर्गत झाला आहे."

सात देशांसोबत झालेल्या या कराराला संपवण्यासाठी ट्रंप यांच्यावर आपल्या देशातून तसंच बाहेरून दबाव आहे.

तसंच ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स यांनी एक संयुक्त पत्रक याप्रकरणी प्रसिद्ध केलं आहे. ट्रंप यांनी उचललेल्या पावलांवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

"आम्ही अणू कार्यक्रमाबाबात झालेल्या कराराचा सन्मान करतो. मात्र, इराण इराणच्या बॅलेस्टीक मिसाईल कार्यक्रमाबाबत आम्हांला चिंता आहे" असं त्यांनी या पत्रकात म्हंटलं आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्रंप यांच्या निर्णयावर खेद व्यक्त केला आहे. पण, या निर्णयाचा कोणता फरक पडेल असं त्यांना वाटत नाही.

इसराइलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनी इराण विरोधात ट्रंप यांनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसंच त्यांना शुभेच्छा देत हा साहसी निर्णय असल्याचं मत प्रकट केलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)