सोमालियात बाँबस्फोट : 30 हून अधिक ठार

सोमालिया स्फोट Image copyright Reuters

सोमालियाची राजधानी मोगादिशू इथे झालेल्या शक्तिशाली बाँबस्फोटात किमान 30 जण ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सोमाली राजधानीच्या गजबजलेल्या परिसरात एका हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशीच हा स्फोट झाला.

स्फोटकांनी भरलेला एक ट्रक या हॉटेलच्या दारात घुसला. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. मदिना या भागात झालेल्या आणखी एका बाँबस्फोटात दोन जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या स्फोटामागे कोण आहे हे अद्याप उघड झालेलं नाही, पण अल कायदा या संघटनेशी संबंधित अल शबाब या गटाच्या रडारवर मोगादिशू ही सोमालियाची राजधानी पूर्वीपासूनच होती. हा गट सरकारविरोधात कारवायांसाठी ओळखला जातो.

प्रतिमा मथळा स्फोटाचं ठिकाण

पहिला बाँबस्फोटानांतर रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना पोलीस कॅप्टन मोहम्मद हुसेन म्हणाले, "हा ट्रक बाँब होता. काही जण यात मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे. पण घटनास्थळाची आग अजूनही आटोक्यात आलेली नसल्यानं आम्ही मृतांचा नेमका आकडा सांगू शकत नाही."

प्रत्यक्षदर्शींनी बीबीसी प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार किमान डझनभर व्यक्ती मृत्युमुखी पडली असण्याची शक्यता आहे.

बीबीसी सोमालीचे प्रतिनिधी म्हणाले, " या स्फोटामुळे सफारी हॉटेल पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक गाडले गेले असण्याची शक्यता आहे."

Image copyright FARAH BASHIRS/TWITTER

मोगादिशूचे रहिवासी मुहिदीन अली यांनी एएफपी या वृत्तसंस्थेली बोलताना सांगितलं, "मी अनुभवलेला हा आत्तापर्यंतचा प्रचंड मोठा स्फोट आहे. हा सगळा भाग स्फोटानं हादरून गेलाय."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)