सेनिआ सोब्चोक : रशियाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुतीनविरुद्ध मैदानात

जे निवडणूक लढवू शकत नाही, त्यांचा मी आवाज होणार, असं सब्चोक म्हणतात.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

जे निवडणूक लढवू शकत नाही, त्यांचा मी आवाज होणार, असं सब्चोक म्हणतात.

रशियातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नाव असलेल्या सेनिआ सोब्चोक या मार्चमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभ्या राहणार आहेत. दुसरीकडे व्लादिमीर पुतीन यांची अध्यक्षपदी पुन्हा निवडून येण्यासाठी तगडी तयारी सुरू आहे.

सोब्चोक या स्वतःला योग्य उमेदवार मानत नाहीत आणि आपला विरोधी पक्षनेते अलेक्से नवॉलनी यांना पाठिंबा असल्याचं सांगतात. अलेक्से नवॉलनी यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे.

असं असलं तरी त्यांनी तिला निवडणूक न लढविण्याचा इशारा दिला होता. आता यावरून विरोधकांमध्ये फूट पडेल, असं विश्लेषकांना वाटतं.

क्रेमलिनने मात्र या उमेदवारीचं स्वागत करत ही लोकशाही असल्याचं म्हटलं आहे.

बेकायदेशीररित्या आंदोलन केल्याबद्दल नवॉलनी हे सध्या वीस दिवसांच्या तुरुंगवासात आहेत.

एका फसवणुकीच्या प्रकरणाचा ठपकाही त्यांच्यावर आहे आणि म्हणूनच निवडणूक लढवण्यास त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा त्यांच्याविरुद्ध रचलेला एक कट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

पुतीन यांना तगडे प्रतिस्पर्धी म्हणून नवॉलनी ओळखले जातात.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

पुतीन यांना तगडे प्रतिस्पर्धी म्हणून नवॉलनी ओळखले जातात.

पत्रकार आणि वृत्त निवेदिका सोब्चोक म्हणतात, "जे उमेदवार होऊ शकत नाहीत, जे निवडणूक लढवू शकत नाही त्यांच्यासाठी मी आवाजाचं काम करेन."

"मी क्रांतीविरोधात असले तरी मी एक चांगली मध्यस्थ आणि संयोजक आहे," असं सोब्चोक यांनी वेडमोस्टी या बिझनेस वृत्तपत्राच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या पत्रात लिहलं आहे.

रशियाचा निवडणूक प्रचार सात डिसेंबरच्या आसपास सुरू होईल. याच काळात राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्यासाठी महासभा घेणं अपेक्षित असतं.

कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसलेल्या रशियन नागरिकाला अपक्ष उमेदवारी जाहीर करता येते. अट फक्त एकच आहे की, त्याने त्यासाठी पाठिंबा दर्शवणाऱ्या तीन लाख सह्या जमा केल्या पाहिजेत.

2000 मध्ये पहिल्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झालेले पुतीन यांनी अद्याप ते उमेदवार असतील किंवा नाही हे जाहीर केलेलं नाही.

सोब्चोक

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

सोब्चोक

सेनिआ सोब्चोक कोण आहेत?

  • 35 वर्षं वयाच्या सेनिआ यांचे वडील अनातोली सब्चोक हे सेंट पिटर्सबर्गचे माजी महापौर आहेत. त्यांनी 1990 मध्ये त्यावेळी फारसे परिचित नसलेल्या व्लादिमीर पुतीन यांची केजीबी एजंट म्हणून नियुक्ती केली होती.
  • डोम-2 हा डेटिंगसाठी प्रसिद्ध असलेला रिअॅलिटी शो सेनिआ यांनी सादर केला होता. 'रशियाची पॅरीस हिल्टन' या नावानेही त्या ओळखल्या जातात.
  • काही जणांकडून 'पार्टी गर्ल' म्हणून त्यांची अवहेलना केली गेली. बबल बाथमधून एक रिअॅलिटी टीव्ही शो सादर केल्यामुळे त्या चर्चेत आल्या.
  • पुतीन यांच्याविरोधात 2012 मध्ये झालेल्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी लोकांना आश्चर्यचकित केलं.

क्रेमलिनचा ठग म्हणून नाकारलं

साराह रेंसफर्ड, बीबीसी न्यूज, मॉस्को, यांचं विश्लेषण

ही घोषणा अनेक दिवसांपासून अफवा समजली जात होती. म्हणून अलेक्से नवॉलनी यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या अटकेआधी त्यांचे विचार स्पष्ट केले होते.

पण भ्रष्टाचारविरोधी लिहिणारे ब्लॉगर असलेल्या नवॉलनी यांनी सेनिआ सोब्चोक यांना क्रेमलिनची ठग म्हणत नाकारलं आहे.

"त्या उदारमतवाद्यांसाठी विरोधी पक्षातले हास्यास्पद व्यक्तिमत्त्व असून केवळ सोशल मिडीयावर लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी देखावा करणाऱ्या एक सेलिब्रिटी आहेत", असंही नवॉलनी म्हणाले.

या आरोपांचं खंडन करत सोब्चोक म्हणाल्या की, जर नवॉलनी हे स्वतःच अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असतील तर त्या माघार घेतील. पण ही शक्यता अगदीच धुसर आहे.

प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या वर्तुळातून पत्रकारितेकडे वळलेल्या सोब्चोक यांनी चोरी आणि भ्रष्टाचाराने पिचलेल्या जनतेच्या वतीने आवाज उठवण्याचं आश्वासन दिलं आहे. अशीच कडक भाषा नवॉलनी यांचीही आहे.

गेल्या 14 वर्षांतील त्या पहिल्या महिला उमेदवार असतील आणि हाच मुद्दा त्यांच्या प्रचार व्हीडिओमध्ये त्यांना स्वंयपाकघरात दाखवून अधोरेखित केला आहे. पण सोब्चोक यांचा एक 'मार्माइट' प्रतिमाही आहे - अनेकांना त्या आवडतात, अनेकांना नाही.

खरंतर हे बघावं लागेल की लहानपणीपासूनच्या कौटुंबिक मित्र असलेल्या व्लादिमीर पुतीन यांच्यावर त्या कुठल्या स्तरापर्यंत टीका करू शकतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)