भारतीय वंशाचे विनोदवीर अमेरिकेत फुलवताहेत हास्याचे मळे

कॉमेडियन Image copyright Netflix
प्रतिमा मथळा हसन मिन्हाज

अमेरिकेतल्या मनोरंजन क्षेत्रात भारतीय आणि मुळच्या भारतीय वंशाच्या कलाकारांचा दबदबा वेगाने वाढतो आहे. अनेक असे कलाकार आहेत, जे या क्षेत्रात वेगाने प्रसिद्धी मिळवत आहेत.

भारतीय वंशाचे अमेरिकन कॉमेडिअन हसन मिन्हाज यांनी आपल्या कलेची अशी छाप सोडली आहे की, प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या मुखी त्यांचं नाव आहे.

व्हाईट हाऊसला होणाऱ्या काही वार्षिक कार्यक्रमांमध्ये पत्रकारांसोबत डिनर हा खास कार्यक्रम असतो. हसन मिन्हाज यांना यावर्षी त्याचं निमंत्रण मिळालं आहे. 2016 साली ओबामांच्या कार्यकाळात प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडिअन लॅरी विलमोर यांनी आपली कला सादर केली होती.

कम्युनिस्ट चीनमधला सर्वांत मोठा धर्म कुठला?

अल्लाहचं नाव घेत करतात मुस्लीम योग

डोनाल्ड ट्रंप राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांना पुन्हा जेव्हा ही संधी मिळाली तेव्हा लॅरी यांनी आपल्या जागी हसन मिन्हाज यांचं नाव पुढे केलं. त्यावेळेपर्यंत हसन यांचं कॉमेडीच्या क्षेत्रात आजच्या इतकं मोठं नाव नव्हतं.

हसन मिन्हाज

हसन यांना आपली कला सादर करण्यासाठी फक्त 19 दिवसांचा वेळ मिळाला होता. कार्यक्रमात जॉन स्टुअर्ट आणि स्टीफन कॉल्बर्टसारख्या लोकांनी आपली कला प्रस्तुत केली होती.

पण हसननी आपलं सादरीकरण संपवताना सांगितलं की, "फक्त अमेरिका हाच असा देश आहे जिथे एक भारतीय मुसलमान स्टेजवर येऊन राष्ट्रपतींवरही विनोद करू शकतो."

Image copyright Alamy
प्रतिमा मथळा हसन मिन्हाज

या एका वाक्याने हसनला एका रात्रीत हिरो बनवलं. सोशल मीडियावर हसन मिन्हाज यांचा हा कार्यक्रम सहा अब्जाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

कॉमेडिअनचं काम फारसं सन्मानाचं समजलं जात नाही. पण समाजाला आरसा दाखवण्याची कुवत या व्यवसायात आहे.

बऱ्याच काळापर्यंत या व्यवसायात श्वेतवर्णीय लोकांचा दबदबा होता. ज्या लोकांना इंग्रजी भाषा येत नाही तिथेसुद्धा श्वेतवर्णीय स्टँडअप कॉमेडिअन लोकांचाच प्रभाव होता.

या कलेचं स्वरूप एका विशिष्ट वर्गापर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे नवीन शक्यतांना कमी वाव मिळतो आहे. जुनेच विषय आणि जुन्याच प्रकारचं सादरीकरण बघून लोक कंटाळले होते.

म्हणूनच आशियायी वंशाच्या लोकांनी जेव्हा नवीन प्रकारे कॉमेडी सादर करायला सुरुवात केली तेव्हा हा एक नवीन प्रवाह निर्माण झाला.

एका रात्रीत हिरो..

रातोरात प्रसिद्धी या एकाच कारणामुळे हसन मिन्हाज आणि पाकिस्तानच्या अनेक कॉमेडिअनना अमेरिकेत मोठी प्रसिद्धी मिळाली.

आशिया खंडातल्या जितक्या कॉमेडिअननी परदेशात नाव कमावलं आहे त्यात एक नाव अझीझ अन्सारीचं आहे. त्याने जगभरात स्टॅंड अप कॉमेडी शो केले आहेत. त्याने लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'मास्टर ऑफ नन'ला पुरस्कार मिळाला होता.

Image copyright Netflix
प्रतिमा मथळा 'मास्टर ऑफ़ नन' मुळे अझीझ अन्सारी एका वेगळ्या उंचीवर पोहोचला.

नेटफ्लिक्सवर हा शो पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

भारतीयांनंतर पाकिस्तानी कलाकार अमेरिकेत विशेष लोकप्रिय आहेत. पाकिस्तानी अमेरिकी कॉमेडिअन कुमैल ननजियानी यांच्या 'द बिग सिक' या चित्रपटाला 2017 सालच्या सर्वाधिक लोकप्रिय विनोदी चित्रपटाचा मान मिळाला.

हा चित्रपट मॉडर्न रोमँटिक या वर्गवारीत मोडणारा आहे. कुमैल आणि त्याची बायको एमिली गॉर्डन यांच्या नात्यावर हा चित्रपट आधारित आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च फक्त 30 कोटी होता. पण हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की, या चित्रपटाने 300 कोटींची कमाई केली आहे. तो यावर्षीचा सगळ्यात यशस्वी चित्रपट आहे. या चित्रपटाचे सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील स्क्रीनिंग झालं आहे.

अमेरिकेत उर्दू

'मास्टर ऑफ नन' या शोच्या आणि 'द बिग सिक' या चित्रपटाच्या यशाचं एक रहस्य असं आहे की, या दोन्ही कलाकृती खासगी आयुष्यावर आधारित आहे. लोकांना जे पाहायचं किंवा ऐकायचं आहे ते सगळं यात आहे.

या चित्रपटातील सगळी पात्रं खऱ्याखुऱ्या आयुष्यातली आहेत. हे देखील या शोच्या लोकप्रियतेचं एक महत्त्वाचं कारण आहे.

'मास्टर ऑफ नन' या मालिकेत अन्सारीचे वडील त्याचे खरेखुरे वडील आहेत. 'द बिग सिक' हे पाकिस्तानी अमेरिकी पात्र दैनंदिन आयुष्यात बोलतात त्याचप्रमाणे उर्दूत डायलॉग बोलताना दिसतं.

Image copyright Amazon Studios/Lionsgate
प्रतिमा मथळा द बिग सिक या चित्रपटातील एक दृश्य

कोणताही कॉमेडिअन आपल्या सादरीकरणाची कधी व्यंगानं सुरुवात करत नाही आणि प्रेमभंगानं त्याचा शेवट करत नाही. पण मिन्हाज आपल्या शोमध्ये सांगतात की, त्यांच्या गर्लफ्रेंडच्या वडिलांनी मिन्हाज यांच्याबरोबर फोटो काढणं कमी प्रतिष्ठेचं समजून फोटोसाठी नकार दिला होता.

या कथेसोबतच मिन्हाज यांनी परदेशात लोकांना ज्या दु:खाला सामोरं जावं लागतं त्याचा उल्लेख केला आहे. ज्या लोकांसोबत त्यांचा सतत संपर्क येतो त्यांनीच असं कमी लेखणं थोडं त्रासदायक वाटतं.

भारतीय कॉमेडिअनचा बोलबाला

भारतीय कॉमेडिअनसुद्धा जगभरात आपल्या कलेचा झेंडा फडकावत आहेत मुंबईची स्टँड अप कॉमेडिअन आदिती मित्तल ही पहिली भारतीय स्त्री आहे जिचा नेटफ्लिक्सवर स्पेशल शो आहे.

आदिती यांचा हा प्रसिद्ध लाईव्ह स्टेज शो 'दे वूड नॉट लेट मी से'वर आधारित आहे. आदिती यांनी स्कॉटलंडमध्ये एडिंबरा फ्रिंज फेस्टिव्हलमध्ये सादरीकरण केलं आहे. असं करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला!

खरं तर याआधीसुद्धा आदिती आणि वीर दास सारख्या कॉमेडिअनना परदेशातून आमंत्रणं येत असतं. पण तेव्हा ते फक्त भारतीय वंशांच्या लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तिथे जात.

Image copyright Netflix
प्रतिमा मथळा कॉमेडिअन अदिती मित्तल

पण आता या लोकांचं महत्त्व इतकं वाढलं आहे की, त्यांच्या शो ला भारतीय कमी आणि परदेशी लोकच जास्त प्रमाणात असतात.

भारतीय कलाकारांच्या वाढत्या प्रसिद्धीचा हा आणखी एक फायदा आहे.

जागरुकतेसाठी फायदेशीर

ज्या मुद्द्यांना राजकारणात कमी महत्त्व दिलं जातं अशा किंवा प्रशासकीय कारणांमुळे दुर्लक्षित राहिलेल्या बाबींकडे हे कलाकार लक्ष वेधून घेतात.

2015 मध्ये सुप्रीम कोर्टाने समलैंगिकांच्या विवाहाला मान्यता दिली, तेव्हा अर्ध्याहून कमी मुस्लीम समुदायाने हा निर्णय स्वीकारला.

त्यावेळी मिन्हाज आणि लेखक रेजा असलान यांनी आपल्या समुदायाच्या लोकांसाठी एक खुलं पत्र लिहिलं आणि हा निर्णय स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं.

आदिती मित्तल म्हणतात, कलेचा हा मंच विविध स्तरातल्या लोकांना मानवतेचा संदेश देण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतो.

कलेचा हा मंच लोकांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. भारतीय कलाकारांचा वाढता सहभाग ही त्यातली लक्षणीय बाब आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)