अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ल्यात 60 हून अधिक ठार

काबूल Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही गटाने घेतली नाही

अफगाणिस्तानात दोन वेगवेगळ्या हल्ल्यांत 60 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. काबूलमध्ये एका शिया मशिदीवर आत्मघातकी हल्ला झाला आणि त्यात 39 जण मृत्युमुखी पडले.

दुसऱ्या एका हल्ल्यात अफगाणिस्तानच्या घोर प्रांतात सुन्नी मशिदीत बाँबस्फोट घडवण्यात आला आणि त्यात किमान 20 जणांचा मृत्यू झाला. या ताज्या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानात आठवडाभरात बाँबस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 179 वर पोचली आहे.

राजधानी काबूलमध्ये असलेल्या इमाम झमान मशिदीत शिरलेल्या एका शस्त्रधारी व्यक्तीने प्रथम बाँब फेकला आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

कथित इस्लामी स्टेटनं काबूलमधल्या या मशिदीवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचं म्हटलं आहे, पण त्यांच्या या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कुठलाही पुरावा अद्याप दिलेला नाही.

याआधी देखील अफगाणिस्तानमध्ये शिया मशिदींमध्ये कथित इस्लामिक स्टेटने हल्ले केले होते.

काबूलच्या इमाम झमान मशिदीत झालेल्या या हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितलं की, हा एक भीषण हल्ला होता.

बाँब फोडण्यापूर्वी हल्लेखोराने शुक्रवारच्या प्रार्थनेला जमलेल्या भाविकांवर गोळीबार केला.

काबूल पोलीसांचे प्रवक्ते बशीर मुजाहिद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे, पण सविस्तर माहिती दिलेली नाही.

AFP वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार अफगाणी गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "या स्फोटकांचं स्वरूप तपासण्यासाठी अधिकाऱ्यांचं पथक पोचलं आहे."

दरम्यान घोर प्रांतात झालेल्या हल्ल्यात सरकारचं समर्थन करणाऱ्या समूहाचा एका कमांडर ठार झाल्याचं वृत्त आहे.

हल्ल्याचा तपशील अजून स्पष्ट झालेला नाही आणि हल्ल्यातील बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

यापूर्वी मे महिन्यात काबूलमध्ये झालेल्या ट्रक बाँबस्फोटात 150 हून अधिक जण ठार झाले होते. 400 जण जखमी झाले होते आणि यातले बहुतेक सर्व सामान्य नागरिक होते.

ऑगस्टमध्ये काबूलमधल्या आणखी एका प्रार्थनास्थळावर बाँबहल्ला झाला होता. त्या वेळी 20 लोक ठार झाले होते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)