इजिप्तमध्ये इस्लामी बंडखोरांचा हल्ला, 50 पेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी मृत्यूमुखी

बाहारिया मरुद्यान Image copyright AFP
प्रतिमा मथळा बाहारिया मरुद्यान नजीक हा हल्ला झाला.

इजिप्तमध्ये झालेल्या इस्लामिक बंडखोरांच्या हल्ल्यात 50 पेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी ठार झाले आहेत. इजिप्तच्या पश्चिम वाळवंटात हा हल्ला झाला आहे.

इजिप्तच्या गृह मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.

"कैरोच्या नैऋत्य दिशेला असलेल्या बहारिया मरुद्यानानजीक हा हल्ला झाला. पोलीस आणि शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक एका गुप्त छावणीत असताना बंडखोरांनी हा गोळीबार केला," अशी माहिती गृह मंत्रालयानं दिली आहे.

या हल्ल्यात 15 बंडखोर सुद्धा ठार झाले आहेत. ते जहालवादी संघटना हस्मचे सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे.

इजिप्तच्या सुरक्षादलांच्या मते 'हस्म' ही मुस्लीम ब्रदरहूडची शस्त्रसज्ज शाखा आहे. पण, हस्मनं हा आरोप नाकारला आहे.

गेल्या काही वर्षांत हस्म आणि इतर गटांनी इजिप्तमध्ये हल्ले घडवले आहेत.

बंडखोरांच्या मागावर सुरक्षारक्षक होते. ते या छावणीकडे जात असताना हा हल्ला झाला.

सुरक्षादलांतील सुत्रांनुसार या सुरक्षारक्षकांच्या ताफ्यावर बंडखोरांनी रॉकेटच्या सहायानं मारा करता येणारे बाँबगोळे आणि स्फोटकांनी हल्ला चढवला.

म्हणून परिस्थिती चिघळली

हा परिसर बंडखोरांच्या सवयीचा असल्यानं परिस्थिती चिघळली.

शिवाय टेलीफोन सुविधा कमकुवत असल्यानं सुरक्षा कर्मचारी अधिकची मदत मागवू शकले नाहीत.

या हल्ल्यात सुरक्षा दलांचे 53 कर्मचारी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी बीबीसीला दिली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)