'झिनत परत येण्याची आशा सोडली होती'

झिनत शहजादी
प्रतिमा मथळा झिनत शहजादी

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकार झिनत शहजादी यांची तब्बल दोन वर्षानंतर सुटका झाली आहे. ऑगस्ट 2015 मध्ये लाहोरमधून त्याचं अपहरण झालं होतं.

बेपत्ता लोकांसाठी काम करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जावेद इकबाल यांनी बीबीसी उर्दूला दिलेल्या माहितीनुसार, झिनत शहजादी यांना पाकिस्तान-अफगानिस्तान सिमाभातून मुक्त करण्यात आलं आहे.

बीबीसी प्रतिनिधी शहझाद मलिक यांच्याशी बोलताना जावेद इकबाल म्हणाले की, झिनत यांची गुरुवारी सुटका झाली. काही राष्ट्रविरोधी तत्त्व आणि परदेशी गुप्तचर संस्थांनी झिनत यांचं अपहरण केलं होतं, असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे.

झिनत यांच्या सुटकेसाठी बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कबिल्यांच्या नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

प्रतिमा मथळा झिनत शहझादी यांचे लाहोर येथील बंद घर

झिनत शहझादी यांच्या सुटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बीबीसी प्रतिनिधी उमर दराज नंगयाना यांनी झिनत शहझादी यांच्या लाहोर येथील घरी भेट दिली असता घर बंद होते. शेजारी विचारपूस केली असता त्यांच्या घरचे एक आठवड्यापू्र्वीच बाहेरगावी गेले आहेत, असं सांगीतल.

झिनत यांच्या आईला झिनतविषयी माहिती मिळाली आहे. तसंच लवकरच आपण तिला भेटणार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं शेजाऱ्याचं म्हणण आहे.

झिनत या लाहोरमधल्या एक स्थानिक टिव्ही चॅनेलसाठी काम करत होत्या.

मानवीहक्कांसाठी लढणाऱ्या वकिल हिना जिलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार झिनत यांचं 19 ऑगस्ट 2015 रोजी अपहरण केलं होत.

प्रतिमा मथळा हिना जिलानी

"त्यादिवशी झिनत रिक्षानं ऑफिसकडे जात असताना दोन कोरोला कारमधून आलेल्या शस्त्रधारी लोकांनी तिचं अपहरण केलं होतं."

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी झिनत बेपत्ता लोकांसाठी कार्य करणाऱ्या 'कमिशन ऑफ एनफोर्स्ड डिसअॅपिअरेन्सेस' यांच्या समोर हजर होणार होत्या.

अपहरण होण्याच्या अगोदर त्या भारतीय नागरीक हमिद अंसारी यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणावर काम करत होत्या.

मुंबईमध्ये राहणाऱ्या हमिद अंसारी यांच्या आई आणि झिनत एकमेकांच्या संपर्कात होत्या. त्यांच्या वतीनं झिनत ही केस लढत होत्या.

झिनत यांच्या अपहरणानंतर एका वर्षातच त्यांचा भाऊ सद्दाम यांनी आत्महत्या केली होती. याअगोदर बीबीसी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत झिनतच्या आईंनी तिच्या माघारी येण्याच्या आशा सोडून दिल्या आहेत असं सांगीतलं होतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या