जपान एक्झिट पोल्समध्ये शिंजो आबे यांना दोन तृतीयांश बहुमत

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे Image copyright Reuters
प्रतिमा मथळा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे

जपानमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झालं. एक्झिट पोल म्हणजेच मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानुसार पंतप्रधान शिंजो आबे पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे.

दोन तृतीयांश बहुमत निश्चित असल्याचं मतदानोत्तर चाचाणीत स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना आबे म्हणाले, "मी माझ्या वचननाम्यात म्हटल्याप्रमाणे पहिलं महत्त्वाचं काम उत्तर कोरियाला रोखणं हे असेल."

आबे यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टी आणि मित्र पक्षांना 311 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आबे यांना स्पष्ट बहुमत मिळेल असं आणखी एका संस्थेनं म्हटलं आहे.

जपानमध्ये रविवारी मतदान झालं. त्यानंतर घेण्यात आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये शिंजो आबे यांना स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज बहुसंख्य संस्थांनी वर्तवला आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा रविवारी जपानमध्ये मतदान झालं.

उत्तर कोरियाविरोधात त्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे त्यांना बहुमत मिळेल असं म्हटलं जात आहे.

त्याचबरोबर जपानच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना जनतेचा पाठिंबा आहे की नाही हे निवडणुकांच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा रविवारी सकाळी मतदानाआधी 'लान' नावाचं चक्रीवादळ आलं होतं.

25 सप्टेंबर रोजी आबे यांनी 22 ऑक्टोबरच्या या निवडणुकीची घोषणा केली होती. राष्ट्रासमोर उद्भवलेल्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी आपणास जनतेचा नव्यानं पाठिंबा हवा आहे. असं आवाहन त्यांनी जनतेला त्यावेळी केलं होतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics