इराणचा शिया सैनिकांनी इराक सोडावा - अमेरिका

रेक टिलरसन Image copyright AFP GETTY

इराणच्या पाठबळाने कथित इस्लामिक स्टेट (IS) विरुद्ध इराकमध्ये लढणाऱ्या सैनिकांनी माघारी जावं, असं अमेरिकेचे स्टेट सेक्रटरी रेक्स टिलरसन यांनी म्हटलं आहे. हा लढा संपत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सर्व परदेशी लढवय्यांनी परत जावं आणि इराकींना देशाची पुनर्बांधणी करू द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

सौदी अरेबियाच्या भेटीवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य या प्रदेशातील इराणचा प्रभाव कमी करण्याचा दृष्टीनं असल्याचं मानलं जातं.

ते म्हणाले, IS विरुद्धच्या युद्धानंतर इराकला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. तसंच या देशावरील इराणचा प्रभाव कमी करण्यासाठी याची मदत होईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणच्या बाबती आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर टिलरसन यांनी हा दौरा केला. त्यामुळं या दौऱ्याला महत्त्व आहे.

इराणला विरोध

अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या फौजा आणि इराणचे लढवय्ये एकाच शत्रूशी लढत आहेत. पण अमेरिकेचा इथल्या इराणच्या उपस्थितीला विरोध आहे.

Image copyright Reuters

इराणचा पाठिंबा आणि आर्थिक पाठबळ असलेल्या शिया सैनिकांची आघाडी असलेलं पॉप्युलर मोबिलाइझेशन युनिट (PMU), अमेरिकेचं पाठबळ असलेल्या इराकी सरकारच्या फौजा एकत्र IS विरोधात लढत आहे.

IS च्या ताब्यातील प्रदेशात परत घेण्यासाठी होत असलेल्या कारवायांवेळी काही PMU सुन्नी नागरिकांवर अत्याचार करत असल्याचे आरोपही झाले आहेत.

यातील इराकी शिया लढवयांनी इराकच्या लष्करात सहभागी व्हावे किंवा शस्त्र खाली ठेवावेत, असं टिलरसन यांना वाटतं, अशी माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यानं बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"त्यांना पाठबळ देणाऱ्या इराणींनी इराक सोडावा," असं मत या अधिकाऱ्यानं व्यक्त केलं.

Image copyright Reuters

इराक आणि सौदी अरेबिया यांनी आर्थिक विकासात समन्वय साधण्यासाठी आणि दहशतवाद विरोधातील कारवायांसाठी एकत्रितपणे संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या उद्घाटनासाठी टिलरसन इथं आले होते.

इराणची प्रतिक्रिया

या संदर्भात इराणनं प्रतिक्रिया दिली आहे. इराणचे विदेश मंत्री जावेद जरीफ म्हणाले, "इराण आणि इराकच्या शियांनी जर स्वतःचा बळी दिला नसता तर IS आज बगदादवर राज्य करत असता."

कतारसंदर्भात प्रयत्न

सौदी अरेबियानंतर टिलरसन कतारच्या भेटीला गेले. टिलरसन यांनी पश्चिम अशियाचा दौरा करताना इराणचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न केले आहेत. याशिवाय कतार आणि सौदी यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले.

कतार आणि सौदी अरेबिया यांच्यात गेली 5 महिने सुरू असलेल्या राजकीय आणि व्यापारी वादावर टिलरसन मार्ग काढतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. पण ही अपेक्षा मावळली असल्याचं दिसते.

रियाधमध्ये सौदीचे राजकुमार मोहमंद बिन सलमान यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. "दोन्ही पक्षांत चर्चा करण्यासाठीचे प्रबळ संकेत दिसत नाहीत," असं त्यांनी या चर्चेनंतर म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)