समुद्राच्या वाढत्या 'अॅसिडीटी'चा सर्व सागरी जीवांवर परिणाम

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
वाढतं कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कसं समुद्राला 'अॅसिडीक' करत आहे?

कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या उत्सर्जनामुळं समुद्र अधिकाधिक आम्ल (अॅसिडिक) बनत असून याचा फटका समुद्रियजीवांना बसत असल्याचं एका अभ्यासात दिसून आलं आहे.

250 संशोधकांनी 8 वर्षं अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.

विशेष करून बाल्यावस्थेतील जीवांवर याचा अधिक परिणाम होईल, असं या संशोधनांत म्हटलं आहे.

म्हणजे बाल्यावस्थेतील कॉड मासे प्रौढावस्थेत पोहचण्याचे प्रमाण आताच्या तुलनेत एक चतुर्थांश किंवा त्यापेक्षाही कमी येईल, असं या संशोधकांना वाटते.

जर्मनी नेतृत्व करत असलेल्या या प्रकल्पाच नाव बायोअॅसिड असे आहे.

या संशोधनातील निष्कर्ष जर्मनीतील बॉन इथं नोव्हेंबर येथे होणाऱ्या पर्यावरण बदल परिषदेत सादर केले जाणार आहेत.

द बायालॉजिकल इम्पॅक्ट ऑफ ओशियन अॅसिडिफिकेशन अभ्यासाच्या संशोधकांनी म्हटलं आहे की काही जीवांना या रासायनिक बदलाचा थेट लाभ होईल. पण अन्नसाखळीवर होणाऱ्या विपरित परिणामांचा विचार केला तर अप्रत्यक्षरित्या याचा तोटाच होणार आहे.

अॅसिडिफिकेशन होणारे परिणाम पर्यावरण बदल, प्रदूषण, किनारपट्टीवर होणारी विकासकामे, अतिमासेमारी, शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते यामुळे अधिकच बिघडणार आहेत.

Image copyright JAGO-TEAM/GEOMAR
प्रतिमा मथळा अॅसिडिफिकेशचा परिणाम उबदार पाण्यातील प्रवाळांवर अधिक होणार आहे.

इंधानातील कार्बन डायऑक्साईडमुळे समुद्रांचं अॅसिडिफिकेशन होत आहे. त्यातून कार्बोनिक अॅसिडची निर्मिती होते आहे, त्यामुळं पाण्याचा पीएच कमी होत आहे.

समुद्राची आम्लतेत वाढ

औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीपासूनचा विचार केला तर समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचा पीएच सरासरी 8.2 वरून 8.1 वर आला आहे. म्हणजेच आता समुद्राची आम्लता 26 टक्के इतकी वाढली आहे.

मुख्य संशोधक किल इथल्या जिओमार हेल्महोल्टज सेंटर फॉर ओशिएन रिसर्चमधील प्रा. उल्फ रिबेझल आहेत. या विषयावरील जागतिक पातळीवरील तज्ज्ञ मानले जातात.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, अॅसिडिफिकेशनचा परिणाम सर्वच जीवांवर होत आहे. त्याची तीव्रता कमीअधिक आहे.

Image copyright Oxford

उबदार पाण्यातील प्रवाळ थंड पाण्यातील प्रवाळांशी तुलना करता अधिक संवेदनशिल असतात. तसेच शिंपले आणि गोगलगाई झिंगे, खेकडे यांच्यापेक्षा अधिक संवेदनशिल असतात, असं ते म्हणाले.

पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांपेक्षा बाल्यावस्थेतील प्राण्यावर याचा जास्त तीव्रतेने प्रभाव पडतो.

ते म्हणाले, जरी काही जीवांवर थेट परिणाम झाला नाही तर अन्नसाखळी आणि अधिवासातील होणाऱ्या बदलांचा परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल.

म्हणजेच शेवटी समुद्राकडून मानवा जे लाभ मिळत असतात त्यावर परिणाम होणार आहे, असं ते म्हणाले.

2009 पासून बोयोअॅसिड प्रकल्पावर संशोधक काम करत आहेत. अॅसिडिफिकेशनचा समुद्रियजीवांवर त्यांच्या जीवनक्रमातील विविध टप्प्यांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करत आहेत. समुद्राच्या अन्नसाखळीवर याचा काय परिणाम होतो, उत्क्रांतीमध्ये या आव्हानांवर मात केली जाईल का, अशा विविध पातळीवर हे संशोधन सुरू आहे.

Image copyright MAREK MIS/SPL
प्रतिमा मथळा ज्या प्राण्यांच शरीर कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलं आहे, त्यांच्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे.

काही संशोधन प्रयोगशाळांत तर काही संशोधन नॉर्थ सी, बाल्टिक, आर्क्टिक, पापुआ न्यू गिनी इथं झालं आहे.

आता पर्यंत 350 विविध रीसर्च पेपरचे एकत्रिकरण करून हा अहवाल पुढील महिन्यात होत असलेल्या पर्यावरण बदल परिषदेला सोपवले जाणार आहेत.

50 टक्के जीवांवर परिणाम

अभ्यास करण्यात आलेल्या एकूण जीवांपैकी 50 टक्के जीवांनी समुद्राच्या पाण्यातील कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणाला नकारात्मक परिणाम दाखवला आहे, असे या अभ्यासाचे निष्कर्ष आहेत.

अटलांटिक कॉड, मुसेल्स, स्टार फिश अशा समुद्रियजीवांच्या जीवनचक्रातील सुरुवातीच्या टप्प्यावर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.

Image copyright ARIS MESSINIS/AFP/Getty Images

तर प्रकाशसंश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड वापरणाऱ्या शैवलांना मात्र याचा लाभ झाला आहे.

या विषयातील यूकेमधील प्लेमाऊथ मरिन लॅब्जमधील तज्ज्ञ कॅरोल टुर्ली यांनी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, सुक्ष्मजीव ते मासे अशा विविध समुद्रियजीवांवर कसा प्रभाव होतो, याची मांडणी यात करण्यात आली आहे.

समुद्राच वाढणारं तापमान आणि इतर प्रभाव टाकणारे घटक इकोसिस्टमवर कसा परिणाम करतील आणि मानवी समजावर त्याचा कसा परिणाम होईल हे संशोधनातून विषद करण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

समुद्र आणि त्याची इकोसिस्टम याकडं दुर्लक्ष केलं जाऊ नये, हे या निमित्तानं स्पष्ट झालं आहे, असं त्या म्हणाल्या.

ही परिषद जर्मनीत होत असून त्याच अध्यक्षपद फिजीकडे आहे. कार्बन डायऑक्साईडचा समुद्रावर होणारा परिणाम यावर भर दिला जावा असं हा परिषदेला वाटतं

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)