फ्रान्समध्ये मुलाचं नाव 'जिहाद' ठेवण्यावरून वाद

फ्रांसमध्ये मुलांच्या नावांची अधिकृत यादी केलेली आहे. Image copyright AFP
प्रतिमा मथळा फ्रान्समध्ये मुलांच्या नावांची अधिकृत यादी केलेली आहे.

'नावात काय आहे' असं सर्रास म्हंटलं जातं. पण, लहान मुलाच्या जन्मानंतर त्याचं नाव ठेवण्यावरून बराच काथ्याकूट केला जातो.

फ्रान्समध्ये सध्या एका नवजात मुलाच्या नावावरून बराच गोंधळ सुरू आहे.

फ्रान्सच्या टाउलूस शहरात एका जोडप्यानं त्यांच्या मुलाचं नाव 'जिहाद' असं ठेवलं आहे.

त्यामुळे फ्रान्सचे मुख्य अधिवक्ता सध्या गोंधळात सापडले आहे. कदाचीत फ्रान्समधल्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायधीशांना आता या प्रकरणात लक्ष घालावं लागणार आहे.

अरबी भाषेत 'जिहाद'चा अर्थ 'प्रयत्न' किंवा 'संघर्ष' असा होतो. 'पवित्र युद्ध' असा होत नाही.

Image copyright Getty Images

फ्रेंच कायद्यानुसार, पालकांनी त्यांच्या बाळांसाठी निवडलेल्या नावांवर कुठलही बंधन आणता येत नाही.

फक्त अट एवढीच आहे की, या नावामुळं मुलाच्या हितसंबंधांना बाधा येणार नाही. तसंच प्रतिष्ठेच्यापातळीवर कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याला विरोध केलेला नसावा.

'जिहाद' नाव ठेवण्यात आलेल्या टाउलूसमधील या बाळाचा जन्म ऑगस्टमध्ये झाला आहे. यापूर्वी, फ्रान्समध्ये इतर मुलांना हे नाव ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

जिहादमुळे शिक्षा?

2015 च्या सुरवातीपासून इस्लामिक दहशतवाद्यांनी केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांमुळे फ्रान्समध्ये 230 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्समधील नाईम्स शहरातील एका महिलेला 2013 मध्ये 2,353 डॉलर दंडासह एक महिन्याची कैद सुनावण्यात आली होती.

Image copyright BBC MONITORING

तिनं तिच्या तीन वर्षाच्या 'जिहाद' नावाच्या मुलाला 'मी एक बॉम्ब आहे' (आय एम अ बॉम्ब) आणि 'जिहादचा जन्म 11 सप्टेंबरला झाला' (जिहाद बॉर्न ऑन 11 सप्टेंबर) अशी वाक्य असलेला टी-शर्ट घालून शाळेत पाठवलं होतं.

ही शिक्षा चिथावणी देणाऱ्या टी-शर्टसाठी होती. ज्यात 9/11 च्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ दिला होता. त्याचा 'जिहाद' या नावाशी संबंध नव्हता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)