डोमिनिका : कॅरेबियन बेटांवरील चक्रीवादळाशी मराठी कुटुंबानं दिली आठ तास झुंज

मारिया वादळानंतरचे नुकसान Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कॅरेबियन बेटांवर नुकत्याच येऊन गेलेल्या मारिया या भीषण चक्रीवादळात इथलं जनजीवन संपूर्ण उद्ध्वस्त झालं.

कॅरेबियन बेटांवर नुकत्याच येऊन गेलेल्या मारिया या भीषण चक्रीवादळात इथलं जनजीवन संपूर्ण उद्ध्वस्त झालं. इथल्या वादळाचा तडाखा मराठमोळ्या श्रीनिवास काळे यांच्या कुटुंबालाही बसला.

श्रीनिवास काळे कुटुंबियांनी या पाचव्या प्रतीच्या जोरदार चक्रीवादाळाशी सलग आठ तास झुंज देत आपलं घर वाचवलं.

या आठ तासांत त्यांना आलेले अनुभव आणि त्यानंतर डोमिनिका देशाच्या झालेल्या अवस्थेचा याची देही, याची डोळा वृत्तान्त काळे यांनी आपल्या शब्दांत खास बीबीसी मराठीच्या व्यासपीठावर मांडला आहे.

एक महिन्यापूर्वीची ही घटना. परंतु जणू काही काल घडली आहे असंच वाटतं. आम्ही गेल्या काही वर्षांपासून वेस्ट इंडीज बेटावर राहत आहोत.

त्यामुळे चक्रीवादळांची आम्हाला कल्पना आहे. पण मारिया चक्रीवादळ इतर वादळांपेक्षा भीषण होतं याची कल्पना मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आली.

या थरार नाट्याची सुरुवात १८ सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास झाली. त्यावेळी वारं पूर्ण ताकदीनं वाहू लागलं होतं.

अचानक माझी पत्नी ऋजुता ओरडली, "निवास, आपला दरवाजा बघ!" दोन दारं असलेल्या दरवाजाला जोराचा वारा उघडू पहात होता.

आता हा दरवाजा उघडला गेला तर छप्पर उडणार हे निश्चितच. हा विचार करत मी आणि ऋजुता दरवाज्याजवळ पोहोचतच होतो आणि दरवाजा खाडकन उघडला! त्याचा फटका माझ्या गुढग्यावर बसला. पण ते लक्षात येऊन विचार करण्यासाठी वेळ कुणाकडे होता?

मी आणि ऋजुता दोघांनी मिळून दरवाजा बंद करत असतानाच आमची मुलगी मनुश्री आमच्या मदतीला धावून आली. आणि मग आम्ही तिघं विरुद्ध ३१० किमी प्रती तासाचा वारा जणू काही स्पर्धाच चालू झाली.

Image copyright SRINIVAS KALE
प्रतिमा मथळा मारिया चक्रीवादळाचे वारे ताशी 310 किलोमीटर वेगानं वाहत होते.

३१० किमी प्रती तास म्हणजे किती वेग हे लक्षात येण्यासाठी काही तुलना सांगतो. दिल्ली - अहमदाबाद बुलेट ट्रेन ही ३२० किमी प्रती तास वेगानं धावणे अभिप्रेत आहे.

तर, एअरबस ए३८० जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान ज्यातून एकावेळेस ८५३ प्रवासी प्रवास करतात. उड्डाण करण्यापूर्वी धावपट्टीवर असताना या विमानाचा वेग साधारणपणे २७७ किमी प्रती तास असते.

सर्वांत शक्तिशाली वादळ

वारा अकल्पनीय वेगानं आणि शक्तीनं त्या दिवशी वाहत होता. तो आलटून-पालटून आम्हाला समोरच्या भिंतीवर अक्षरशः फेकत होता. पण जितका वारा जिद्दीस पेटला होता तितकेच आम्ही देखील!

आम्ही १९९७ पासून वेस्ट इंडीजमध्ये राहत आहोत. कॅरेबियन समुद्रात असलेल्या साधारण ७००० लहान मोठ्या बेटांचा हा २६ देशांमध्ये विभागलेला समूह.

हा बेट समूह "कॅरेबियन" या नावानं ओळखला जातो. एका कंपनीत नोकरी करण्यासाठी २००८ मध्ये आम्ही डोमिनिका नावाच्या या छोट्या देशात आलो.

छोटा म्हणजे पुणे शहराएवढं त्याचं क्षेत्रफळ आणि 73,500 लोकसंख्या. तेव्हापासून आम्ही सहा चक्रीवादळं पाहिली होती.

पण ती तिसऱ्या श्रेणीची होती. चौथ्या श्रेणीच्या एका चक्रीवादळाविषयी मी अनेकांचे अनुभव ऐकले होते. पण आमच्यावर येऊन थडकलेलं मारिया चक्रीवादळ हे पाचव्या म्हणजे सगळ्यांत तीव्र श्रेणीचं होतं, हे आम्हाला तेव्हा ठाऊक नव्हतं.

मारिया तिसऱ्या श्रेणीचं असेल, असं आधी सांगितलं होतं. पण आम्ही राहत असलेल्या रुझोऊ या राजधानीच्या शहरात येईपर्यंत त्याची शक्ती वाढली आणि ते पाचव्या श्रेणीत पोहोचलं. एवढं मोठं वादळ शे-दोनशे वर्षांत एकदा आलं तर येतं!

चक्रीवादळाच्या डोळ्यातली शांतता!

निसर्गाबरोबर चालू असलेला हा खेळ रात्री दहाच्या सुमारास, म्हणजे साधारणपणे २ तासांनी पाऊण तासापुरता थांबला. चक्रीवादळाच्या डोळ्यात नेहमी नीरव शांतता असते. वारा आणि पाऊस थांबला ही याची खूण.

पाऊस थांबला तसे आमचे शेजारी कुलवंतजी आणि फतेहसिंग चौकशी करायला घरी आले. ते पोहोचले तोच चक्रीवादळाचा डोळा जवळपास पूर्ण पुढे सरकला होता.

Image copyright SRINIVAS KALE
प्रतिमा मथळा 1997 पासून वेस्ट इंडीजमध्ये राहणाऱ्या काळे कुटुंबीयांनी यापूर्वी अनुभवलेल्या चक्रीवादळांपेक्षा मारिया चक्रीवादळ सर्वाधिक भीषण होतं.

रात्री पावणे अकरा वाजता पुन्हा वाऱ्या-पावसाचा खेळ चालू झाला. त्यामुळे कुलवंतजी व फतेहसिंग आमच्या घरी अडकून पडले.

आता आम्हा तिघांच्या मदतीला या दोघांचे चार हात होते. वादळी वारे वाहायला सुरुवात झाली की वीज कंपनी वीज बंद करते. विजेच्या झटक्याने कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणून ही उपाययोजना करतात.

त्यानुसार सायंकाळी ६:३० वा. वीज बंद केली गेली. वीज गेल्यामुळे किट्ट अंधार होता. बेफाम वाऱ्याचा भयावह आवाज घुमत होता. फोन, मोबाईल चालू होते परंतु हे सुख क्षणभंगूर होतं हे लगेचच जाणवलं.

टॉवर पडला आणि रेंज गेली

वाऱ्याच्या अशाच एका बेफान झोतानं पहिला टॉवर पडला आणि त्यासोबतच फोन आणि मोबाईलचा आधार देखील संपला.

एवढ्या सोसाट्याच्या वाऱ्यात साधा काचेचा किंवा पत्र्याचा तुकडादेखील तलवारीसारखे वार करू शकतो. त्यामुळे आमचं छत आम्हाला वाचवायचं होतं. आणि त्यासाठी वाटेल ते करून वादळाला घरात घुसू द्यायचं नव्हतं.

Image copyright SRINIVAS KALE
प्रतिमा मथळा मारियानं संपूर्ण डोमिनिका देश उद्ध्वस्त केला होता. संपूर्ण देशात रस्त्यांवर झाडं, खांब आडवे-तिडवे पडले होते. घरं कोसळली होती.

साधारणपणे पहाटे १:३० ते २:०० च्या सुमारास जसं-जसं वादळ पुढे सरकत गेलं आणि वाऱ्याचा जोर थोडा हलका झाला. तसं आम्ही दारामागे सोफा ठेवून त्यावर बसून होतो ते दिवस उजाडेपर्यंत, अर्थातच ओले चिंब.

सकाळी सहाच्या सुमारास प्रत्येक घरातून लोक बाहेर आले आणि आजूबाजूच्यांची चौकशी करू लागले. एकमेकांची काय मदत करता येईल, याची चाचपणी सुरू झाली.

चक्रीवादळात पाऊस आडवा पडतो, त्यामुळे ज्यांची घरं शिल्लक होती, त्यांत पाणी शिरलं होतं. अनेक घरांची छपरं उडून गेली होती.

मनांत विचार आला की जर का चक्रीवादळ दिवसा आलं असतं आणि दरवाजा लढवताना आजूबाजूची छपरं उडताना दिसली असती तर दरवाजा लढवायला कितपत हिम्मत राहिली असती?

लुटालूट आणि अनागोंदी

मारियानं संपूर्ण डोमिनिका उद्ध्वस्त केलं होतं. रस्त्यांवर झाडं, खांब आडवे-तिडवे पडले होते. घरं कोसळली होती.

लोकांना लक्षात आलं की आता खायला प्यायला अनेक दिवस काही मिळणार नाही. म्हणून लुटालूट सुरू झाली. लोकांनी दुकानं फोडली. अनागोंदीचं वातावरण होतं.

डोमिनिका हा देश पूर्णपणे डोंगराळ आहे. इथे उद्योग नाहीत, त्यामुळे फारशी समृद्धी नाही. निसर्गानं मात्र भरभरून दिलं आहे. पण ही चक्रीवादळं मात्र मोठी नासधूस करतात.

यथावकाश संयुक्त राष्ट्रांची मदत पथकं आली. कायदा-सुव्यस्था प्रस्थापित करण्यासाठी संचारबंदी लागली. रस्त्यावर ब्रिटिश, अमेरिकन, संयुक्त अरब अमीरात आणि जमैकाचे सशस्त्र सैनिक आले.

Image copyright SRINIVAS KALE
प्रतिमा मथळा डोमिनिका देशात कायदा-सुव्यस्था प्रस्थापित करण्यासाठी संचारबंदी लागली. रस्त्यावर ब्रिटिश, अमेरिकन, संयुक्त अरब अमीरात आणि जमैकाचे सशस्त्र सैनिक मदतीसाठी आले.

चौथ्या दिवशी एका सोळंकी नावाच्या काकूंच्या मोबाईलला थोडी रेंज आली. त्यावरून त्यांच्या कुटुंबियांना कॅनडामध्ये SMS पाठवून आमच्या आई-वडिलांना तसंच जे अन्य भारतीय येथे राहिले त्यांच्या घरी फोन करून खुशाली कळवण्याची विनंती केली.

आमचे घरचे काळजीत होते. डोमिनिकामधल्या 27 जणांचे जीव गेल्याची आणि 50 लोक हरवले असल्याची बातमी तिथं पोहोचली होती.

'डोमिनिकामध्येच राहणार'

या छोट्याशा देशात अवघे 35 भारतीय आहेत. डोमिनिका हे त्रिनिदाद येथील भारतीय दूतावासाशी संलग्न आहे. जसा संपर्क सुरू झाला तसे भारतीय दूतावासही मदतीला धावून आलं.

भारत सरकारनं सर्वच भारतीयांना डोमिनिकातून बाहेर पडून सेट ल्युशिया - त्रिनिदादमार्गे भारतात घेऊन जाण्याची व्यवस्था केली होती.

पण मी ऋजुता आणि मनुश्रीनं ठरवलं की आपण इथेच राहायचं. ज्या डोमिनिकानं आम्हाला घडवलं, त्याला अवघड परिस्थितीत सोडून पळ काढणं आम्हाला योग्य वाटत नाही.

या देशाच्या पुर्नउभारणीत आम्ही आमचं योगदान देण्याचं ठरवलं. आमच्या तिघांसोबत अन्य ९ समविचारी येथे डोमिनिकामध्येच राहिले. बाकी २० जणांनी डोमिनिकामधून बाहेर पडणे पसंत केलं.

आम्ही आता रोज इथले रस्ते मोकळे करण्याची आणि लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याची कामं करतो. इथं तीन आठवड्यांनतंर अजूनही वीज नाही. रोझोऊ शहर हे डोमिनिकाच्या राजधानीचे शहर. खुद्द रोझोऊ शहरात वीज यायला नोव्हेंबर किंवा डिंसेबर उजाडेल.

Image copyright SRINIVAS KALE
प्रतिमा मथळा डोमिनिका देशात सध्या रोगराई पसरण्याची भीती आहे. तसंच शाळा आणि सगळी कार्यालयं बंद आहेत.

मोबईलची रेंज आताशी आली आहे. पाणी कधी-कधी येतं. रोगराई पसरण्याची भीती आहे. शाळा आणि सगळी कार्यालयं बंद आहेत.

जगभरातून मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. यात अभिमान वाटावा असं त्रिनिदादपासून अमेरिका आणि कॅनडापर्यंतचे भारतीय तसंच भारतीय वंशाचे लोक जहाजातून मदत पाठवत आहेत.

ही मदत केवळ भारतीय वंशांच्या लोकांसाठी नाही, तर डोमिनिकामधील सर्व धर्म तथा वंशाच्या लोकांसाठी आहे.

अशा कठीण प्रसंगी कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतल्या ओळी आठवतात...

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!

हे वाचलं आहे का?

हे पाहिलं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : व्हेनेझुएलात अन्नाच्या तुटवड्यामुळे नागरिकांची उपासमार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)