सोमालियाची राजधानी पुन्हा स्फोटांनी हादरली

स्फोटानंतरच मोगादिशूतील हे दृष्य
प्रतिमा मथळा स्फोटानंतरच मोगादिशूतील हे दृष्य

सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी झालेल्या दोन बाँबस्फोटांमध्ये किमान 14 लोकांच्या मृत्यू झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच मोगादिशूमध्ये झालेल्या एका मोठ्या बाँबस्फोटात तब्बल 350 लोक मारले गेले होते.

शनिवारी राजधानीत एका हॉटेल परिसरातील कारमध्ये हा बाँबस्फोट झाला. यानंतर ठीक वीस मिनीटांनी तिथल्या जुन्या संसद भवनाच्या जवळ आणखी एक बाँबस्फोट झाला.

या स्फोटांमध्ये किमान 14 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इस्लामिक बंडखोर संघटना अल-शबाबने या बाँबस्फोटांची जबाबदारी घेतली आहे. असं असलं तरी अल कायदाशी संबध असलेल्या या संघटनेने 14 ऑक्टोबरच्या हल्ल्यात आपला हात असल्याचं नाकारलं होतं.

पण शनिवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी या संघटनेनी घेतली. सुरक्षा दल आणि नेत्यांना निशाना बनवण्यासाठीच हा हल्ला केल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.

अल-शबाबच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी मोगदिशूमध्ये प्रांतिक नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. ही बैठक रविवारी होणं अपेक्षित आहे. तत्पूर्वीच हा स्फोट घडवून आणला गेला.

स्थानिक वेळेनुसार, रात्री उशीरापर्यंत हॉटेलमध्ये गोळीबार सुरू होता. हा बाँबस्फोट इतका शक्तिशाली होता की, त्यानं भव्य दरवाजा पूर्ण उखडला गेला.

वृत्तसंस्था एएफपीला पोलिस अधिकारी इब्राहिम मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरा स्फोट हा एका मिनीबसमध्ये झाला.

या स्फोटांमध्ये 14 लोक मारले गेल्याचं त्यांनी सांगितलं. मृत्यू पावलेल्यांमध्ये सर्वसामान्य लोकांचा समावेश आहे.

सुरक्षा दलातर्फे या परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून परिसर रिकामा करण्यात आला आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics