कोर्फबॉल - एक असा गेम जो दूर करत आहे खेळांमधली लिंगभेदाची दरी

व्हीडिओ कॅप्शन,

ऑफिसेसमध्येच नाही तर खेळांच्या मैदानातही महिलांना भेदभावाचा सामना करावा लागतो का?

कोणत्याही शाळेत खेळाच्या तासाला जसा कल्ला असतो तसं वातावरण. लाल, हिरवी आणि पिवळी जर्सी परिधान केलेले मुलंमुली खेळत आहेत. ब्राझीलमधल्या रिओ दी जानिरो इन्स्टिट्युटो जेरेमारिओ डँटस नावाच्या शाळेतलं हे दृश्य वेगळं आहे. कारण मुलंमुली एकत्र खेळत आहेत.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शोधलेला कोर्फबॉल हा खेळ सुरू आहे. मुलंमुली, स्त्रीपुरुष यांना एकत्र आणणारा मिश्र प्रकाराचा हा खऱ्या अर्थानं एकमेव बॉलगेम आहे.

ब्राझीलमधल्या शाळांमध्ये मुलामुलींना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.

"मला हा खेळ आवडतो. कारण मुलामुलींना एकत्र खेळता येतं. वेगवेगळ्या क्षमता असणारे मुलंमुली एकत्र खेळू शकतात. आम्ही एकमेकांहून भिन्न आहोत पण हा खेळ आम्हाला संघ म्हणून काम करण्याची शिकवण देतो," असं अकरा वर्षांच्या जिओव्हॅनीनं सांगितलं.

फोटो कॅप्शन,

ब्राझीलमध्ये रिओ शहरात कोर्फबॉल खेळताना मुलंमुली

विविध खेळांतल्या लिंगभेदाच्या घटना कशा टाळता येईल यासंदर्भात बीबीसी 100 वुमन काम करत आहे.

अनेक खेळांमध्ये पुरुष आणि महिलांच्या बक्षीस रकमेत असणारा फरक, टीव्हीवर खेळांचे सामने पाहणाऱ्यांचं कमी प्रमाण, शाळांमध्ये विविध खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या मुलींचं खेळ सोडण्याचं वाढतं प्रमाण असे खेळांमधल्या महिलांच्या अनुषंगाने अनेक पैलू आहेत.

सगळ्या प्रतिकूल गोष्टी बाजूला सारत खेळांमध्ये होणाऱ्या लिंगभेदाच्या घटना कशा कमी करता येतील याकडे काही महिलांचं लक्ष वेधलं. कोर्फबॉल समानता आणू शकतो का?

मुलंमुली एकत्र खेळू शकत नाही या गैरसमजाला कोर्फबॉल छेद देतो. पुरुषांच्या तुलनेत महिला अशक्त असतात या गैरसमजुतीला कोर्फबॉल धक्का देतो असं इन्स्टिट्युटो जेरेमारिओ डँटस शाळेच्या शिक्षिका शीइला दुराते यांनी सांगितलं.

बॉलगेमसारखा आक्रमक आणि वेगवान खेळ मुली मुलांच्या बरोबरीनं खेळू शकतात असं बारा वर्षांच्या जॉननं सांगितलं. "मला हा खेळ आवडतो. धावपळ आणि वेगवान हालचालींचा हा खेळ आहे. तसंच मुलींबरोबर खेळता येतं" असं जॉननं सांगितलं.

कोर्फबॉल इन्डोअर आणि आऊटडोअर असं दोन्हीप्रकारे खेळता येतं. नेटबॉल आणि बास्केटबॉलशी साधर्म्य असणाऱ्या या खेळात बॉलद्वारे गोल म्हणजे कोर्फ करायचा असतो. जमिनीपासून 3.5 मीटर उंचीवर प्लॅस्टिकचं बास्केट असतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कोर्फबॉलच्या लीगदरम्यानचं दृश्य

जागतिक स्तरावर या खेळात नेदरलँड्स अग्रेसर आहे. मात्र इतर देशांमध्ये आता त्याची लोकप्रियता वाढत आहे.

कोर्फबॉल कसा खेळतात?

  • प्रत्येक संघात चार पुरुष आणि चार महिला मिळून आठ खेळाडू असतात. दोन्ही संघांना समान आकाराचं कोर्ट मिळतं. प्रत्येक बाजूला दोन मुलं किंवा दोन मुली असतात.
  • सामन्यादरम्यान कोर्ट बदलू शकत नाही. पण प्रत्येकवेळी दोन गोल झाल्यावर खेळाडू कोर्ट बदलतात. त्यावेळी बचावपटू आघाडीपटू होतात तर आघाडीपटू बचावपटू होतात. चेंडु जमिनीपासून ठराविक उंचीवर असलेल्या बास्केटबॉलमध्ये गोल करणं अपेक्षित असतं.
  • चेंडू हातात असताना केवळ एक पाऊल पुढे जाता येऊ शकतं. त्यानंतर हा चेंडू सहकाऱ्याकडे सोपवायचा असतो. चेंडू घेऊन ड्रिबल म्हणजे खेळवता येऊ शकत नाही. कोणत्याही स्वरुपाच्या शारीरिक संपर्कावर बंदी असते.
  • खेळाडू बचावपटूपासून दूर असतानाच गोल होऊ शकतो.
  • सर्वाधिक गोल करणारा संघ विजयी ठरतो.

स्रोत: आंतरराष्ट्रीय कोर्फबॉल महासंघ; रुल्सऑफस्पोर्ट.कॉम

कोर्फबॉलचं छोटं प्रारुप असणारा मिनीकोर्फ लहान मुलांसाठी अनुकूल असा खेळ आहे. बहुतांशीवेळा मिनीकोर्फ समुद्रकिनाऱ्यावर खेळला जातो. एकमेकांचे मित्र असणाऱ्या मात्र एकमेकांविरुद्ध कधीही न खेळलेल्या मित्रांसाठी हा खेळ आहे.

एखाद्या स्वरुपाचं अपंगत्व असणाऱ्या खेळाडूंसाठी कोर्फबॉलचं स्वरुप बदलतं. मुलामुलींना एकत्र खेळण्याच्या दृष्टीनं हा सर्वंकष खेळ आहे.

फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल, क्रिकेट या पारंपरिक खेळांच्या तुलनेत कोर्फबॉल खूप पिछाडीवर आहे.

पारंपरिक खेळांना प्रचंड जनाधार आहे. या खेळांच्या स्पर्धांना कोट्यवधी रुपयांचं प्रायोजकत्व मिळतं आणि या खेळांमध्येच जागतिक स्तरावर मान्यता असलेले प्रसिद्ध खेळाडू असतात.

पुरुष आणि महिलांच्या मानधनात इतकी तफावत असणारं खेळ हे एकमेव क्षेत्र आहे असं संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महिला स्पोर्ट्स पार्टनरशिप उपक्रमाच्या व्यवस्थापक बिअॅट्रिक्स फ्रे यांनी सांगितलं.

फोटो कॅप्शन,

कोर्फबॉलचा सामना उत्सुकतेने पाहणाऱ्या मुली

देश आणि खेळाचा संदर्भ बदलतो. पुरुष खेळाडू अब्जाधीश होऊ शकतो मात्र तोच खेळ खेळणाऱ्या महिला खेळाडूंना किमान मानधनही मिळत नाही.

जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल 100 खेळाडूंच्या यादीत सेरेना विल्यम्स ही एकमेव महिला खेळाडू आहे.

कोर्फबॉलसारखा खेळ ब्राझीलमधल्या रिओ शहरातील शाळांमध्ये लोकप्रिय होतो आहे. मात्र करिअरचा पर्याय म्हणून या खेळाचा विचार होऊ शकत नाही. अगदी या खेळातल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंनाही अगदी मर्यादित संधी आहेत.

हा केवळ दोन तासांचा खेळ आहे असं बिअॅट्रिक्स व्हॅझ यांनी सांगितलं. व्हॅझ व्यावसायिक फुटबॉलपटू असून खेळांमधल्या महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या समितीचा भाग आहेत.

खेळातील महिलांविषयक प्रश्नांचं मूळ खोलवर आहे. केवळ शाळांमध्ये खेळले जाणारे खेळ नाही तर अख्ख्या व्यवस्थेत बदल घडायला हवा असं त्यांनी सांगितलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)