न्यूयॉर्क हल्ला : रोरावत येणाऱ्या ट्रकचं दृश्य मी कधीच विसरणार नाही...

न्यूयॉर्क, हल्ला Image copyright Reuters
प्रतिमा मथळा बेदरकार ट्रकने न्यूयॉर्क शहरात आठजणांची जीव घेतला.

बाबाटुंडे ओग्युनी हा न्यूयॉर्कमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकणारा 23 वर्षांच्या एक विद्यार्थी. बुधवारी न्यूयॉर्कमध्ये घडलेला ट्रकचा प्रसंग त्याने डोळ्यांदेखत पाहिला. हा विदारक अनुभव ओग्युनीच्या शब्दांत -

आम्ही कॉलेजच्या बाहेर बसलो होतो, तेव्हा हा ट्रक येताना मी पाहिला. भयंकर आणि अशक्य वेगाने सैरावैरा असा तो ट्रक जात होता. ट्रकचा वेग 100-120 नक्की असेल. हा अत्यंत गजबजलेला परिसर आहे आणि या भागात वेगमर्यादा तर जेमतेम 70 आहे.

त्याने दोघांना चिरडलं. हे सगळं माझ्या डोळ्यांदेखत घडताना पाहिलं.

त्यानंतर त्याने ट्रक सायकल आणि पादचारी मार्गावर घुसवला. मग तो ट्रक एका स्कूलबसवर जाऊन आदळला आणि डावीकडे वळला.

ट्रकचं नक्की काय होत आहे, हे बघायला लोकही ट्रकच्या दिशेने धावले. तेवढ्यात गोळीबार सुरू झाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या दिशेने पळू लागले.

मी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना. मी चक्रावून गेलो. माझं डोकं काम करेनासं झालं. नक्की काय घडलंय हे कोणालाही ठाऊक नव्हतं.

सुरुवातीला हा अपघात आहे, असं वाटलं. आजूबाजूची माणसंही गोंधळलेली होती. आणि नक्की काय करायचं हेही समजत नव्हतं.

Image copyright Babatunde Ogunniyi
प्रतिमा मथळा बाबाटुंडे ओग्युनी

ट्रकने चिरडलेली माणसं आता या जगात नाहीत, हे स्वीकारणं खूपच कठीण आहे. स्थानिक प्रशासनाशी संपर्क करावा की आपात्कालीन विभागाला फोन करावा? की जीव वाचवायला कुठेतरी आसरा घ्यावा? काहीच कळत नव्हतं.

अग्निशमन विभागाने स्कूलबसमधून मुलांना बाहेर काढलं. त्यांना सुरक्षित बाहेर काढता यावं म्हणून त्यांनी बसचे अक्षरक्ष: तुकडे केले. काय भयानक दृश्य होतं ते!

मुलं जखमी झाली होती की नाही, ठाऊक नाही. कोणीतरी बसमध्ये अडकलं असावं. पण मला नक्की काही सांगता येणार नाही.

ट्रक दोघांना चिरडत असताना आम्ही पाहिलं. पण प्रत्यक्षात आणखी जीव गेले, हे नंतर समजलं.

वातावरणात कल्लोळ होता. जे घडलं त्यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा घटनास्थळाचे दृश्य

असा दुर्देवी प्रसंग कोणाच्याही आयुष्यात घडू नये. एरव्ही अशा घटना टीव्हीवर बघतो, पेपरमध्ये वाचतो. पण आता तर माझ्या डोळ्यांदेखत हे सगळं घडलं.

माझ्यापासून इतक्या जवळ असं काही भीषण घडेल, हे कधीही वाटलं नव्हतं.

आपल्या गाडीसह लोकांना चिरडावं, ठार मारावं, असं कुणाला कसं वाटू शकतं? स्कूलबसला गाडी ठोकण्याचा विचारही कसा कुणाच्या मनात येऊ शकतो?

हे विचित्र आहे, अनाकलनीय आहे.

बाकी कशापेक्षाही गर्दीभरल्या रस्त्यावर भरधाव वेगाने रोरावत येणारा ट्रक, हे दृश्य आताही माझ्या डोळ्यासमोर आहे. नियंत्रणात नसलेल्या त्या ट्रकच्या इंजिनची घरघर माझ्या कानात आताही ऐकू येत आहे. ते मी कधीही विसरू शकत नाही.


न्यूयॉर्कमधल्या लोअर मॅनहॅटन भागात झालेल्या या घटनेत आठ जणांचा बळी घेतला आहे. या घटनेत 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा छोटा ट्रक चालवणाऱ्या 29 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गृह मंत्रालयाला अमेरिकेत प्रवेश करण्याऱ्यांची सुरक्षा पडताळणी आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहेत.

जॉर्जिना रानार्ड, युजीसी आणि सोशल न्यूज

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)