संघर्षग्रस्त काँगोत 30 लाख लोक भूकबळीच्या छायेत

कांगोतील कुपोषित मुलं

फोटो स्रोत, AFP/GETTY

फोटो कॅप्शन,

काँगोतील हजारो कुपोषित मुलं भूकबळीच्या उबंरठ्यावर आहेत.

काँगोमध्ये जवळजवळ तीस लाख लोकांचा भूकबळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) खाद्य संस्थेनं काँगोला या मानवी संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचं आवाहन केलं आहे.

वर्ल्ड फूड प्रोग्रॅम (WFP) चे प्रमुख डेव्हिड बीझली यांनी बीबीसीशी बोलाताना सांगितलं की, "काँगोच्या कसाय प्रांतातील 30 लाख लोकांचा जीव धोक्यात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जर मदत पोहोचली नाही तर लाखों मुलांचा भूकबळी जाईल."

ऑगस्ट 2016 मध्ये सैन्यासोबत झालेल्या संघर्षात एक स्थानिक नेता मारला गेला होता. तेव्हापासून काँगोमध्ये हिंसाचार भडकला आहे आणि जवळपास 15 लाख लोकांना घरदार सोडावं लागलं होतं. यात बहुतांश बालकांचा समावेश आहे.

कसाय प्रांताच्या परिस्थितीविषयी बीझली म्हणाले, "आमची टीम सध्या या प्रांताच्या दौऱ्यावर आहे. इथं झोपड्या पेटवण्यात आल्या आहेत, घरं जाळण्यात आली आहेत. अन्नाअभावी कुपोषित बालकांची वाढ खुंटली आहे. सहाजिकच अनेक मुलांचा मृत्यूही झाला आहे."

फोटो स्रोत, AFP/GETTY

फोटो कॅप्शन,

संघर्षात विस्थापित झालेल्यांत मुलांची संख्या जास्त आहे.

"जर वेळेवर निधी मिळाला नाही, अन्न पोहोचलं नाही आणि गरजेच्या जागी मदत मिळाली नाही तर ही परिस्थिती आणखी गंभीर होणार. आम्ही अशा मुलांबद्दल बोलत आहोत जी येत्या काही महिन्यात शेवटचा श्वास घेतील."

काँगोतील लोकांच्या मदतीसाठी आवश्यक निधीपैकी WFPकडे केवळ एक टक्का निधी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.

पावसाळा सुरू झाल्यावर तर रस्त्यानं मदत पोहोचवणं आणखीनच कठीण होऊन बसणार आहे, असं ते म्हणाले. हेलिकॉप्टरनं मदत पोहचवणं फारच महाग पडणार आहे.

जर येत्या काही दिवसांत मदत पोहोचली नाही तर आपण कल्पना करू शकत नाही इतकी भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते असं त्यांना वाटतं.

इथल्या सरकारनं पारंपरिक नेतृत्वाला मान्यता देण्यास नकार दिला आणि संघर्ष सुरू झाला. एका स्थानिक नेत्यानं एका बंडखोर गटाची स्थापना केली. पण, सरकारच्या सैन्यासोबत झालेल्या संघर्षात हा नेता मारला गेला.

त्यानंतर बंडखोर गटांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. या हिंसक संघर्षामागे अनेक कारणं आहेत, पण बंडखोर गटांच्या निशाण्यावर सरकार आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

कांगोतील संघर्षात 3 हजार लोक मारले गेले आहेत.

या संघर्षात आणखी लोक सहभागी झाले आणि संघर्ष वाढत गेल्यानं इथल्या पाच प्रांतामध्ये हिंसाचार पसरला. यात आजवर 3000हून अधिक बळी गेले असून UNला इथं सामूहिक कबरी सापडल्या आहेत.

काँगो सरकार आणि बंडखोर गटांवर मानवी हक्कांच्या पायमल्लीचे आरोप झाले आहेत. या आरोपांचा तपास करायला गेलेल्या दोन UN कार्यकर्त्यांचं मार्चमध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

मार्चमध्येच झालेल्या एका चकमकीत बंडखोरांनी 40 पोलिसांचं मुंडकं कापलं होतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)