आशिष नेहरा : निवृत्ती एवढी हळवी का ठरावी?

 • पराग फाटक
 • बीबीसी मराठी प्रतिनिधी
फोटो कॅप्शन,

आशिष नेहरा आणि झहीर खान ही वेगवान गोलंदाजांची जोडगोळी भारतीय क्रिकेट संघासाठी आधारस्तंभ ठरली.

दिल्लीत झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी 20 सामन्यासह वेगवान गोलंदाज आशिष नेहरानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

आशिष नेहराला पाहून 'कालचक्र' हा शब्द आठवावा इतका तो ग्रेट नाही. लीजंड तर नाहीच नाही, पण बुधवारसारख्या ऑड वारी गच्च भरलेल्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर त्याने शेवटचा बॉल टाकल्यावर आतमध्ये काहीतरी हलल्यासारखं वाटलं.

क्रिकेटमध्ये फास्ट बॉलर म्हटल्यावर धिप्पाड शरीराचा, उग्र डोळ्यांचा, तोंडातून फुत्कार सोडणारा, स्वँकी असे टॅटू असलेला माणूस अशी प्रतिमा उभी राहते. नेहराकडे यातलं काहीही नाही. कुपोषित नाही पण ब्रोकोली, लेट्यूस आणि तत्सम पदार्थ ओरपणाऱ्या आंग्ल देशीही नाही अशा मध्यमवर्गाचा नेहरा हा प्रतिनिधी.

हा मध्यमवर्ग आणि आपला भारत देश जसा बदलत गेला तसा नेहरा बदलला नाही हे त्याचं गुणवैशिष्ट्य. ओल्ड स्कूल थॉट म्हणतात ना, अगदी तसाच राहिला नेहरा.

स्विंगची करामत त्याने अनेकदा दाखवली. अझरपासून कोहलीपर्यंत सगळ्या कॅप्टनसाठी तो अडचणीच्या काळातला गो टू मॅन होता. पण सहा फुटांच्या नेहराने रावडी फास्ट बॉलर होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

जिराफासारखे पाय, खप्पड म्हणजे गालफडं वर आलेला डाऊनमार्केट चेहरा, हाडाची काडं, केसाला जेल नाही, सेलिब्रेटी गर्लफ्रेंड नाही, ब्रँडेड मर्चंडायझिंग नाही, इतर खेळांच्या लीगमध्ये स्वत:च्या मालकीची कुठलीही टीम नाही, कोट्यवधींची जाहिरातींची कॉन्ट्रॅक्ट्स नाहीत, वर्षानुवर्ष बाबा आझम काळातला नोकियाचा बेसिक फोन वापरणारा नेहरा म्हणून खास आहे.

फोटो कॅप्शन,

आशिष नेहरा अनेक वर्षं स्मार्टफोनविना वावरत होता.

नेहराने 1999 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला बॉल टाकला तेव्हा वायटूकेचा प्रश्न उपटला नव्हता. जगावर माज करणाऱ्या अमेरिकेचे ट्विन टॉवर शाबूत होते आणि ओसामा बिन लादेनची चलती होती. व्हॉट्सअप, मेसेंजर, जीपीएस, स्मार्टफोन या विश्वाचा उदय व्हायचा होता.

लोक पत्र लिहायचे. ट्रंक कॉल अस्तित्वात होता. नेटकॅफेंचा वावर सुरू झाला होता. फ्लॉपी तेजीत होती आणि पेनड्राइव्ह कन्सिव्हंही झाले नव्हते. प्लेस्टेशनचं जंक्शन भारतीयांच्या गावीही नव्हतं.

शाळेत मुलं शिकायला जात आणि शाळेबाहेर बोरकूट आणि चटणीपाव मिळत असे. डेंटिस्टकडे तीनशे रुपयांत रुटकॅनल करून मिळत असे. पाचशे रुपयांत मोठ्या फॅमिलाचा एका चांगल्या हॉटेलात लंच किंवा डिनर होत असे.

डीडी मेट्रो नावाचं चॅनेल पाहायची माणसं. 'ये थी खबरे आजतक, इंतजार कीजिए कलतक' म्हणणाऱ्य़ा एसपी सिंगांच्या ऑथेंटिक बातम्या असण्याचे दिवस होते.

फोटो कॅप्शन,

नेहराचं विमानासारखं सेलिब्रेशन अनोखं होतं.

फियाट, एम्बॅसिडर, चेतकची स्कूटर वापरात असण्याचे दिवस होते. सीसीडी, सबवे, मॅकडी हे अजून पाइपलाइनमध्येपण नव्हते. तो झुणका भाकर केंद्रांचा काळ होता.

बाबा सेहगलचे म्युझिक व्हिडिओ पाहण्याचे दिवस होते. 'हम दिल दे चुके सनम' म्हणणारा सलमान खान गुणी बाळ होता. संजय दत्तचं 'वास्तव' जगासमोर यायचं होतं. आमिर खान राष्ट्रद्रोही 'गुलफाँ हसन'ला ठार मारत होता. क्रिकेट म्हणजे डीडी स्पोर्ट्स होतं. ज्यात सहाव्या बॉलनंतरचं आणि पहिला बॉल अर्धा होईपर्यंत जाहिरातच दिसे.

अभिनेत्रीहून अँकर झालेल्या मंदिरा बेदीचा नूडल स्ट्रॅप ब्लाऊजपूर्व काळ होता. चीअरलीडर्स, ललनांच्या गराड्यात चालणाऱ्या पाटर्या, खेळाडूंच्या नावावर लागणाऱ्या बोली आणि अब्जावधींचे लिलाव हे सगळं घडवून आणणारे ललित मोदी तेव्हा नुकते शिकत होते.

त्या काळातला नेहरा आणि आज शेवटचा बॉल डॉट पडल्यावर निरागस समाधानी हास्य चेहऱ्यावर असणारा नेहरा यादरम्यान कालचक्राचे किती वळसे फिरलेत!

फोटो कॅप्शन,

दुखापतींमुळे आशिष नेहरा फक्त 17 कसोटी सामने खेळू शकला.

आपण काम करण्यासाठी ऑफिसात जातो. काहींना काम करायला फावला वेळ जेमतेम उरतो तो भाग वेगळा. पण नेहराचं क्रिकेट असं आहे - फावल्या काळातलं. एकदोन नव्हे तर तब्बल 12 सर्जरी झेललेल्या या माणसाला निरोगी शरीराने खेळायला मिळालं तरी कुठे?

आपली लोकसंख्या आणि क्रिकेट टीममधल्या खेळाडूंची संख्या हे गुणोत्तर फारच विषम. एका जागेसाठी लाखोजण शर्यतीत. या भाऊगर्दीत नेहरा हरवून जाण्याचीच शक्यता अधिक होती.

दोड्डा गणेश, टिनू योहानन, इक्बाल सिद्दीकी असे अनेक आले आणि गेले. पण नेहरा पुन्हापुन्हा येत राहिला.

शरीराकडून खच्चीकरण होत असताना चिवटपणे टीम इंडियाच्या दरवाज्यावर तो धडका देत राहिला. स्विंग बॉलिंग खेळण्याचा अनुभव असलेल्या इंग्लंडच्या टीमला 2003 वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेतल्या डर्बनमध्ये नेहराने एकहाती शरण आणलं.

युट्यूबवर त्याचं नाव टाकाल तर असंख्य भन्नाट स्पेल पाहायला मिळतील पण त्याचवेळी त्याच्या बॉलिंगला बेदम चोपून काढल्याच्या इनिंग्जही पुष्कळ आहेत.

फोटो कॅप्शन,

नेहराचं 'अपील'

वासिम अक्रम, वकार युनिस, चामिंडा वास, ब्रेट ली, मिचेल जॉन्सन, जेम्स अँडरसन आणि या मांदियाळीतले अनेकजण - प्रत्येकाची कधी ना कधी भीती वाटली बॅट्समनना. नेहराची भीती वाटण्याचा प्रश्नच नव्हता. पण तरीही तो विकेट काढायचा, पाप्याचं पितर असताना बॅट्समन सरप्राईज होईल असा बाऊन्स द्यायचा. बॅट्समनला बुचकळ्यात टाकणारे त्याचे इनस्विंग आणि आऊटस्विंग पक्के लक्षात राहतात.

बॅट्समनला डिवचण्यासाठी मॉडर्न क्रिकेटमध्ये स्लेजिंगचं अस्त्र वापरतात. आई-बहीण, जात-वंश-धर्म यावरून शिवराळ भाषेत उकसवलं जातं. नेहरा या पंथापासून सुरक्षित अंतरावर होता.

व्हीडिओ अनॅलिसिस, बॉलिंग मशीन, फिटनेस ट्रेनर, बायोमेकॅनिक्स या सगळ्यांनी फास्ट बॉलिंग आणखी धारदार झाली. पण नेहराचं तंत्र मनात आणि मेंदूत होतं.

फोटो कॅप्शन,

2003 वर्ल्डकपमधला आशिष नेहराचा इंग्लंडविरुद्धचा स्पेल अविस्मरणीय होता.

फर्ड्या इंग्रजीत शायनिंग मारण्यापेक्षा देशी हिंदी भाषेत गजाली मारणं नेहराला आजही आवडतं. स्मार्टवरून स्ट्रीटस्मार्ट होण्याच्या काळात नेहराचं साधेपण अधिकच गहिरं होतं. नेहरा ज्याला स्कूटरवर बसवून आणत असे तो सेहवाग रेकॉर्ड बुकमध्ये जाऊन बसला. नेहराचा जिगरी झहीर खान राजघराण्याच्या घाटगेंचा जावई झाला. तेंडुलकर-द्रविड-लक्ष्मण-गांगुली ही नावं माऊंट एव्हरेस्टएवढी झाली.

देशातल्या सर्वाधिक लांबीच्या खरगपूरच्या प्लॅटफॉर्मवर तिकीटं चेक करणारा महेंद्रसिंग धोनी लाडका 'माही' झाला. दिल्लीतल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत पोरगेल्या कोहलीला बक्षीस देताना नेहराचा फोटो व्हायरल झाला होता.

तोच कोहली आज जगातला एक नंबरचा बॅट्समन आहे. आणि तोच कोहली नेहराचा शेवटच्या मॅचमधला कॅप्टन होता.

फोटो कॅप्शन,

महेंद्रसिंग धोनी आणि आशिष नेहरा हे समीकरण लोकप्रिय आणि यशस्वी ठरलं.

आजूबाजूची माणसं शिखराएवढी मोठी होत असताना मीडियम आणि मॉडरेट गुणवत्तेचा नेहरा लढत राहिला. तो खुजा झाला नाही आणि आऊटडेटेडही झाला नाही हे महत्वाचं. आणि म्हणूनच फास्ट पेस क्रिकेट असलेल्या टी-20 मध्ये नेहरा कॅप्टनसाठी ट्रम्प कार्ड होता.

त्याची फील्डिंग अनेकदा हास्यास्पद असे. शरीरामुळे फिटनेसही यथातथाच होता, पण स्किल आणि मेहनतीच्या बाबतीत तो नेहमीच सच्चा राहिला.

स्टॅट्स अर्थात आकडेवारी ही नेहराच्या करिअरचा ताळेबंद मांडतानाचा निकष असू शकत नाही. कारण विराटचा चिकू होतो, धोनीचा माही होतो पण नेहराचा 'नेहराजी' झाला होता. आपल्या या टोपणनावावरून सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या गंमतीजमतीबद्दल नेहरा अनभिज्ञ कारण तो या जगापासून कोसो मैल दूर होता.

फोटो कॅप्शन,

आशिष नेहराचं योगदान आकड्यांमध्ये तोलता येणार नाही.

मी कसा वेगळा! पुणेरी पाट्यांसारखं आपलं वेगळेपण सिद्ध करण्याची गरज नेहराला कधीच भासली नाही. पदरात हे पडलंय, याच्यासह काय मजल मारू शकतो याचं नेहरा हे उत्तम उदाहरण. चालताना धावण्याची आणि धावताना जेट स्पीडने झेप घेण्याची सक्ती होण्याच्या काळात नेहरा म्हणजे ऑड मॅन आऊट. पण तसं झालं नाही. आणि म्हणूनच बुधवारी 'नेहराजी विल मिस यू'चे फलक घेऊन तरुण मंडळी कोटलाच्या गेटवर मॅचच्या दीडतास आधी हजर होती.

नेहरा कॉमेंट्रेटर होईल, अंपायर होईल की कोचिंग अॅकॅडमी उघडेल ठाऊक नाही पण आशुभाईंचं मैदानावर नसणं सलणारं असेल हे नक्की...

आशिष नेहरा : आकड्यांतून

 • 24 फेब्रुवारी 1999 रोजी आशियाई कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत नेहराने पदार्पण केलं.
 • श्रीलंकेचा सलामीवीर मर्वन अट्टापट्टू आशिष नेहराची कारकीर्दीतील पहिलीवहिली विकेट होती.
 • जेमतेम 17 कसोटी खेळलेल्या नेहराच्या नावावर 44 विकेट्स आहेत. 120 वनडेत नेहराच्या नावावर 157 विकेट्स आहेत तर ट्वेन्टी-20 प्रकारात नेहराने 27 सामन्यांत 34 विकेट्स घेतल्या आहेत.
 • कारकीर्दीत आठ विविध कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी नेहराला मिळाली. मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि इंझमाम उल हक (आशियाई इलेव्हन) यांच्या नेतृत्वाखाली नेहरा खेळला.
 • इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत नेहराने आतापर्यंत मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांचे प्रतिनिधित्व केलं आहे.
 • ट्वेन्टी-20 प्रकारात भारतासाठी सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्यांच्या यादीत नेहरा (27 सामन्यांत 34 विकेट्स) तिसऱ्या स्थानी आहे.
 • वनडे क्रिकेटमध्ये दोनवेळा एका डावात सहा विकेट्स मिळवणारा नेहरा हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
 • 2003 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धचं 6/23 हे नेहराचं प्रदर्शन वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजांची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.
 • क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्स स्टेडियमवर मैदानाबाहेर षटकार मारण्याची किमया आशिष नेहराने केली आहे. 2002 मध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध खेळताना नेहराने अँड्यू फ्लिनटॉफच्या गोलंदाजीवर लगावलेला षटकार मैदानाबाहेर गेला. याआधी असा पराक्रम दिग्गज फलंदाज व्हिव्हिअन रिचर्ड्स यांच्या नावावर होता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)