ते 67 शब्द : बाल्फोर जाहीरनाम्याची शतकपूर्ती आणि पॅलेस्टिनींची ब्रिटनकडून माफीची मागणी

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
बाल्फोर जाहीरनाम्याची शतकपूर्ती आणि पॅलेस्टिनींची ब्रिटनकडून माफीची मागणी

ब्रिटीश अधिकारी ऑर्थर बाल्फोर ब्रिटनच्या शालेय पाठ्यपुस्तकांत क्वचितच झळकत असेल, पण इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनचे अनेक विद्यार्थी तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती सांगू शकतात.

2 नोव्हेंबर 1917ला बाल्फोर यांनी बनवलेला जाहीरनामा 'बाल्फोर डिक्लरेशन' म्हणून ओळखला जातो. तसंच शालेय विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातही त्याचा समावेश करण्यात आला आहे.

हा जाहीरनामा म्हणजे दोन वेगळ्या राष्ट्रांच्या वेगवेगळ्या कथांचा एक अध्याय आहे. अरब आणि इस्त्रायल यांच्या वादाचा आरंभबिंदू म्हणूनही या जाहीरनाम्याकडं बघता येतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ज्यूंनी 1925 साली जेरुसलेममध्ये बाल्फोर यांचं जंगी स्वागत केलं होतं.

"ज्यूंना पॅलेस्टाईनची भूमी घर म्हणून मिळावी यासाठी ब्रिटननं पाठिंबा दिला होता," असं हा जाहीरनामा सांगतो.

त्याचवेळी, "ज्यूंव्यतिरिक्त इतर समुदायांच्या नागरी आणि धार्मिक अधिकारांबाबत पूर्वग्रह निर्माण होतील, असं काही करायला नको," असंही जाहीरनामा सांगतो.

पॅलेस्टिनी मात्र या जाहीरनाम्याकडं विश्वासघात म्हणून बघतात.

प्रतिमा मथळा बाल्फोरच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे 67 शब्द.

यावरुन असं दिसतं की, ऑटोमन साम्राज्यातील बहुतांश देशांमध्ये स्वातंत्र्यासाठी ब्रिटन परत संघर्ष करेल, ज्यामध्ये मध्यपूर्वेतील बहुतेक भागांचा समावेश होतो. प्रत्यक्षात उल्लेख केलेला नसला, तरी यात पॅलेस्टाईनचाही समावेश आहे हे अरबांना समजलं आहे.

"पॅलेस्टिनी नागरिकांबाबत ब्रिटनचं चुकलं असं तुम्हाला वाटतं का? ब्रिटननं गुन्हा केला आहे का?" असा प्रश्न शिक्षकांनी पॅलेस्टीनच्या वेस्ट बँकमधील रामाल्लाह इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांना विचारला.

प्रतिमा मथळा पॅलेस्टिनी बेल्फोर जाहीरनाम्याला ऐतिहासिक अन्याय म्हणून संबोधतात.

उत्तरादाखल सर्वच विद्यार्थ्यांनी हात वर केले. 'हो' असं 15 वर्षीय मुलगी म्हणाली.

"हा जाहीरनामा बेकायदेशीर होता. कारण, पॅलेस्टीन ऑटोमन साम्राज्याचा भाग होते आणि ब्रिटिशांनी त्यावर नियंत्रण मिळवलं नाही," असं ती सांगते.

"अरब हे संख्येने 90 टक्क्यांपेक्षा जास्त होते, तरी ब्रिटनने त्यांना अल्पसंख्य समजलं," असं ती पुढं सांगते.

आशावाद कायम

इस्त्रायली विद्यार्थी मात्र बेल्फोर जाहीरनाम्याकडं सकारात्मक दृष्टीनं बघतात.

नोगा येहेझेकेली ही नऊ वर्षीय मुलगी इस्त्रायलच्या बाल्फोरिया गावात राहते. या जाहीरनाम्याचा हिब्रू अनुवाद तिला अक्षरश: तोंडपाठ आहे.

"या जाहीरनाम्यामुळं लोकांमध्ये एक मोठी आशा निर्माण झाली आणि झायोनिस्ट चळवळीनं जोर धरला," असं तिचे वडील नीव सांगतात.

"लोकांना वाटलं, ब्रिटीश सरकारने असा जाहीरनामा दिला, तर एक दिवस ज्यूंचं राष्ट्र निर्माण होईल. जे पुढे 1948 मध्ये इस्त्रायलच्या रुपानं निर्माण झालं", ते सांगतात.

प्रतिमा मथळा या जाहीरनाम्यामुळं लोकांमध्ये एक मोठी आशा निर्माण झाली, असं नीव सांगतात.

त्यावेळी हे संपूर्ण क्षेत्र ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होतं. पॅलेस्टाईनसाठी बेल्फोर जाहीरनामा औपचारिकरित्या ब्रिटीश अधिवेशनात नमूद करण्यात आला होता. ज्याला लीग ऑफ नेशन्सनं मान्य केलं होतं.

अधिवेशनाच्या सुरुवातीच्या अर्ध्या काळात ब्रिटनने ज्यूंच्या स्थलांतराला परवानगी दिली. पण, नंतर वाढता हिंसाचार विशेषत: होलोकॉस्टच्या काळातील वाढती हिंसा बघून स्थलांतराला आळा घालण्यात आला.

कठीण अंमलबजावणी

बेल्फोर यांनी जेरुसलेम येथील हिब्रू विद्यापीठाचं उद्घाटन केलं होतं. तिथल्या प्राध्यापक रुथ लॅपिडोथ यांनी 67-शब्दांचं हे पत्र वाचलं आहे.

आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञ असलेल्या लॅपिडोथ सांगतात, "हा जाहीरनामा कायदेशीररित्या बंधनकारक होता. पण, ब्रिटनला त्याची अंमलबजावणी करणं कठीण गेलं."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ज्यूंनी 1925 साली जेरुसलेममध्ये बाल्फोर यांचं जंगी स्वागत केलं होतं.

"जेव्हा नाझी सत्तेवर आले, तेव्हा राजकीय परिस्थिती अत्यंत वाईट होती आणि नंतर इंग्लंडला अरब देशांची मदत हवी होती," त्यांनी सांगितलं.

"मग त्यांना जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यात मर्यादा आल्या", लॅपिडोथ म्हणतात.

दुसरं महायुद्ध सुरु झाल्यानंतर 1938 साली लॅपिडोथ यांनी जर्मनी सोडलं.

त्या सांगतात, "मला त्याचं अजूनही समाधान वाटतं. हा जाहीरनामा म्हणजे आमचा पॅलेस्टाइनमध्ये परत येण्याच्या अधिकाराचा मूळ स्त्रोत आहे."

दीर्घकालीन वचन

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आपल्या देशाच्या स्थापनेच्या प्रकियेत बेल्फोर जाहीरनाम्याचा मैलाचा दगड म्हणून वर्णन केलं आहे.

या जाहीरनाम्याची शताब्दी साजरी करण्यासाठी ब्रिटीश सरकारने गुरुवारी नेत्यानाहू यांना आमंत्रित केलं आहे.

इस्त्रायल-पॅलेस्टिनींमध्ये शांतता नांदण्याची चिन्हं नसताना ब्रिटीश सरकारने नेत्यानाहू यांना आमंत्रित केल्यामुळे पॅलेस्टिनी संतप्त झाले आहेत. गुरुवारी निदर्शनं करण्याचा त्यांचा विचार आहे.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा गुरुवारी निदर्शनं करण्याचा पॅलेस्टिनी नागरिकांचा विचार आहे.

बाल्फोर जाहीरनाम्यासाठी ब्रिटनने माफी मागायला हवी, अशी त्यांची मागणी आहे.

"जसजसा काळ पुढे सरकत आहे, तसतसं ब्रिटीश लोक इतिहासाचा धडा विसरत आहेत," असं पॅलेस्टाईनचे शिक्षणमंत्री सवरी सैदाम यांनी म्हटलं आहे.

पॅलेस्टिनी लोक आजही त्यांचं स्वतंत्र राज्य बनवू शकतात. असं झाल्यास ज्यामुळं हा संघर्ष मिटेल असं इस्त्रायलला वाटतं, तो कथित द्विराष्ट्राचा प्रस्ताव पूर्ण होऊ शकतो. ज्याला आंतरराष्ट्रीय समुदायाचाही पाठिंबा आहे, त्यांनी स्पष्ट केलं.

"पॅलेस्टाईननं स्वतंत्र होण्याची वेळ आली आहे, तसंच त्याद्वारे दीर्घकालीन वचन पूर्ण होण्याचीही वेळ आली आहे," असं ते सांगतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)