शेवटच्या दिवशी ट्विटर कर्मचाऱ्यानं डिअॅक्टिवेट केलं ट्रंप यांचं अकाउंट

11 मिनिटांसाठी ट्रंप यांचं अकाउंट बंद झालं होतं. Image copyright Twitter
प्रतिमा मथळा 11 मिनिटांसाठी ट्रंप यांचं अकाउंट बंद झालं होतं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं वैयक्तिक ट्विटर अकाउंट गुरुवारी काही काळासाठी डिअॅक्टिव्हेट झालं होतं. आता ते पुन्हा सुरू करण्यात आलं आहे, असं ट्विटरनं म्हटलं आहे.

@realdonaldtrump हे अकाउंट 11 मिनिटांसाठी बंद करण्यात आलं होतं. "नोकरीच्या शेवटच्या दिवशी एका कर्मचाऱ्यानं ट्रंप यांचं अकाउंट बंद केलं होतं," असं स्पष्टीकरण ट्विटरनं दिलं आहे.

"या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. भविष्यात अशा चुका कशा टाळता येतील? याकडे कंपनी लक्ष देईल," असं ट्विटरनं सांगितलं.

ट्रंप यांचे ट्विटरवर 4 कोटी 17 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांनी या विषयावर काहीही भाष्य केलं नाही.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा ट्रंप यांचे 4 कोटी 17 लाख फॉलोअर्स आहेत

गुरुवारी संध्याकाळी ट्रंप यांच्या पेजवर "Sorry, that page doesn't exist!" ( सॉरी, हे पेज अस्तित्वात नाही) असा संदेश दिसत होता. अकाउंट पूर्ववत झाल्यानंतर ट्रंप यांनी आपल्या रिपब्लिकन पक्षाची करविषयक नीती काय आहे, याबाबत ट्वीट केलं.

"ट्रंप यांच्या कार्यालयाचं अकाउंट @POTUS हे व्यवस्थित सुरू होतं. आम्ही प्राथमिक चौकशी केली. त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की, ट्विटरच्या कस्टमर सपोर्टमधील कर्मचाऱ्याचा आजचा शेवटचा दिवस होता."

"त्याच्या हातून हे अकाउंट बंद पडलं. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत," असं ट्विटरनं म्हटलं आहे.

ट्रंप हे 2009 पासून ट्विटरवर आहेत. आपल्या पक्षाची धोरणं काय आहेत, हे सांगण्यासाठी ट्रंप यांनी वेळोवेळी ट्विटरचा वापर केला. 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत त्यांनी मोठ्या प्रमाणात ट्वीट्स केले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)