मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी स्कॉटलंडच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

इयन ग्रीन Image copyright Corskie Farm
प्रतिमा मथळा इयन ग्रीन यांनी वेगवेगळ्या शेतात चड्ड्या पुरल्या.

स्कॉटलंडच्या मरी काउंटीमधला एक शेतकरी सुती अंतर्वस्त्रं मातीत पुरून त्याच्या शेतातल्या मातीची उत्पादकता तपासतो.

एल्गीन शहराच्या उत्तरेस असणाऱ्या कॉर्स्की फार्म्सचे मालक इयन ग्रीन यांनी त्यांच्या 2800 एकराच्या शेतीत वेगवेगळ्या ठिकाणी चड्ड्या पुरल्या आहेत.

त्यांची अशी थेअरी आहे की, कापडाचं जितकं जास्त विघटन होईल तितकी मातीची गुणवत्ता चांगली.

क्वालिटी मीट स्कॉटलंड (QMS) आणि अॅग्रीकल्चर अँड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट बोर्ड (AHDB) यांच्या सहकार्यानं या चाचण्या केल्या गेल्या.

''मातीत असणारे जिवाणू या सुती कापडावर तुटून पडतात, त्यामुळे त्याचं जितकं जास्त विघटन होईल तितकं चांगलं,'' असा विचार 'सॉईल माय अँडीज' या टेस्टमागे होता, असं इयन ग्रीन सांगतात.

''आम्ही वेगवेगळ्या शेतांमध्ये या चड्ड्या पुरल्या. काही ठिकाणची माती चांगली होती, काही ठिकाणची नाही,'' असंही ते म्हणाले.

Image copyright Corskie Farm

पुरलेल्या चड्ड्यांचं काय झालं हे पाहण्यासाठी स्पे नदीच्या उगमाजवळ असलेल्या इयन ग्रीन यांच्या शेतात अनेक अधिकारी आणि इतर शेतकरी जमले होते.

'आश्चर्याची गोष्ट'

ग्रीन म्हणाले, ''अनेक शेतकरी आश्चर्यचकित झाले होते, आता ते ही हा प्रयोग करुन पाहात आहेत.''

''या प्रयोगाचे निकाल पाहण्यासारखे होते. इथल्या जमिनीत आर्द्रता खूप आहे, ऑक्सिजनची कमतरता आहे, साहजिकच या चड्ड्यांवर काहीच परिणाम झाला नाही'' असं ग्रीन म्हणाले.

''पण आम्ही आमच्या शेतांत खूप पीक घेतो, इथे चड्ड्या पुरताना आम्ही त्यावर भरपूर चिखल लावला होता आणि त्यांचं पूर्ण विघटन झालं होतं.''

''ह्या चड्ड्या सुती आहेत हे महत्त्वाचं आहे,'' असंही त्यांनी सांगितलं.

संपूर्ण स्कॉटलंडमधले शेतकरी या चाचणीच्या मदतीनं मातीची गुणवत्ता आणि इतर बाबी तपासून पाहतील, अशी आशा QMSच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)