जिन्नांची मुलगी : दीना वाडिया का राहिल्या दुर्लक्षित?

जिन्ना आणि रती Image copyright PAKISTAN NATIONAL ARCHIVE

मोहम्मद अली जिन्ना यांची मुलगी दीना वाडिया यांचं गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये निधन झालं. नस्ली वाडिया यांची आई आणि नेविल वाडियांची पत्नी म्हणूनच ओळखल्या गेलेल्या दीना यांचं बालपण कसं दुर्लक्षित राहिलं याबद्दल लेखिका शीला रेड्डी यांनी मांडलेला तपशील.

दीना वाडिया ही मोहम्मद अली जिन्ना आणि रती पेटिट यांची एकुलती एक मुलगी. जिन्नांची पत्नी रती ही पारशी घराण्यातील महिला होती. दीनाच्या जन्मावेळी जिन्ना आणि रती यांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच अडचणी होत्या.

जन्मल्याबरोबरच दीनाला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. ज्यावेळी तिचा जन्म झाला तेव्हा आई-वडिलांपैकी कुणाजवळही तिच्यासाठी वेळ नव्हता.

दीनाचा जन्म 14 ऑगस्ट 1919ला लंडन येथे झाला होता. जिन्ना तिथल्या संसदीय समितीसमोर सुधारणांविषयी बोलण्यासाठी हजर राहणार होते. त्यावेळी रती यांना ते सोबत घेऊन गेले होते.

दीनाचा जन्म झाला तेव्हा जिन्ना आणि रती या दोघांनाही फारसा आनंद झाला नव्हता. सरोजिनी नायडू जेव्हा दीनाला बघायला गेल्या तेव्हा त्यांनी त्याविषयी लिहिलं,

"रतींची तब्येत खूपच खराब झाली आहे. त्या एखाद्या पतंगासारख्या पातळ झाल्या आहेत. तसंच त्यांना मुलीच्या जन्माचा आनंद झाल्याचंही दिसत नव्हतं."

दीना दोन महिन्यांची झाल्यानंतर जिन्ना दांपत्य मुंबईला परत आलं. दीनाला नोकरांच्या भरवशावर सोडून दोघेही दोन दिशांना निघून गेले. जिन्ना राजकारणात व्यस्त झाले, तर रती हैदराबादला आपल्या मैत्रिणीला भेटायला निघून गेल्या. जाताना त्यांनी आपल्या कुत्र्याला सोबत नेणं पसंत केलं, आपल्या नवजात लेकीला मात्र मुंबईतच ठेवलं.

वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्यापूर्वीच आपल्या एकुलत्या एक मुलीविषयी जिन्ना दाम्पत्यामध्ये उदासीनता दिसून येत होती.

सहा वर्षांपर्यंत मुलीला नाव ठेवण्यात आलं नाही

आपल्या मुलीबद्दल रतींना जिव्हाळा नव्हता. हे पाहून त्यांच्या जवळचे मित्रसुद्धा हैराण झाले होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सरोजिनी नायडू

"रतीबद्दल मला आदर आहे. पण, रतीची त्यांच्या नवजात लेकीबद्दल असलेली वर्तणूक बघून मला त्यांचा तिरस्कार वाटायला लागतो," असं सरोजिनी यांची मुलगी पद्मजानं तिच्या बहिणीला लिहिलं होतं.

मुलीला एकटं सोडून जेव्हा जीना आणि रती परदेशात जात, तेव्हा सरोजिनी नायडू दीनाला बघायला त्यांच्या घरी जात असत.

"मी आज सायंकाळी जिन्नांच्या मुलीला भेटायला गेले होते. ती उटीहून नुकतीच परतली होती आणि जिन्नांनी तिला नोकरांच्या भरवशावर घरी ठेवलं होतं. मात्र जिन्ना आणि रती परदेशात गेले होते." असं सरोजिनी यांनी 1921 साली पद्मजा यांना लिहिलं होतं.

"जेव्हा मी त्यांच्या मुलीचा विचार करते, तेव्हा मनात येतं की, रतीला मार द्यावा," असंही त्यांनी लिहिलं आहे.

सहा वर्षांपर्यंत जिन्नांची ही मुलगी नोकरांच्या भरवशावर वाढली आणि मुख्य म्हणजे बिनानावाची वाढली. तिचं नाव ठेवण्याएवढाही वेळ त्यांच्याकडे नव्हता.

नवीन जीवनास सुरुवात

ऑक्सफर्डहून घरी परतल्यानंतर सरोजिनी यांची मोठी मुलगी लीलामणी ही जिन्नांच्या घरी गेली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीला दीनाची अवस्था सांगणारं एक पत्र लिहिलं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा उजवीकडे उभी असलेली दीना वडील जिन्ना आणि आत्या फातिमा यांच्यासोबत.

त्या लिहितात, "एक तास मी जिन्नांच्या घरी थांबले. जेव्हा मी तिथून निघायला लागले, तेव्हा सहा वर्षांची दीना अक्षरश: माझ्या पायात पडली आणि जाऊ नको असं केविलवाण्या स्वरात म्हणायला लागली."

मुलीबद्दल रतीच्या मनात पहिल्यांदा जिव्हाळ्याचे भाव तेव्हा दिसले जेव्हा मद्रासच्या थियोसोफिकल सोसायटीच्या शाळेत दीनाचा प्रवेश घ्यायचं ठरलं

पण, हीही योजना बारगळली. कारण, जिन्ना यांनी दीनाला शाळेत पाठवण्याच्या रती यांच्या कल्पनेला नकार दर्शवला. या सोसायटीशी संबंधित लोकांबद्दल जिन्नांना आदर नव्हता, हेही यामागचं कारण होतं.

जिन्ना आणि रती यांचं वैवाहिक जीवन संपुष्टात आल्यानंतर आणि 1929 साली रती यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दीनाला अशी व्यक्ती मिळाली जी तिच्यावर प्रेम करणारी होती.

आजीचं प्रेम

ही व्यक्ती म्हणजे दीना यांची आजी लेडी पेटीट. ज्या आजवर दीनाच्या स्थितीकडं केवळ दुःखी अंतःकरणानं पाहात होत्या. आपल्या नातीला भेटण्याची त्यांना इच्छा होती.

पण, त्या तिला भेटू शकत नव्हत्या. कारण, जिन्नाशी लग्न झाल्यानंतरच्या दिवसापासूनच त्यांचे मुलीशी असलेले संबंध बिघडले होते.

Image copyright KHWAJA RAZI HAIDER
प्रतिमा मथळा ख्वाजा रजी अहमद यांचे पुस्तक

आपल्या नातीची स्थिती एका अनाथ मुलीपेक्षाही वाईट झाली आहे, असं लेडी पेटीट यांना वाटत होतं. ही गोष्ट त्यांनी सरोजिनी नायडू यांना सांगितली होती.

रती जिन्नांपासून वेगळ्या झाल्यानंतर लेडी पेटीट यांनी आपल्या नातीवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. त्यांनी दीनाला चांगल्यापैकी शाळेत घालण्यातही पुढाकार घेतला.

आजीच्या प्रेमाने भारावून गेलेल्या दीनानं नंतर तिच्या नावात आजीचं नाव समाविष्ट करायचं ठरवलं. ती स्वत:ला दीना म्हणवून घेते. दीना हे लेडी पेटीट यांचं पूर्वीचं नाव होतं.

रती यांच्या मृत्यूनं त्यांच्या आईवडिलांना दु:खाच्या खाईत लोटलं. असं असलं तरी, यामुळंच लेडी पेटीट त्यांच्या नातीच्या जवळ आल्या.

पहिल्यांदा जिन्नांकडून विरोध

त्यानंतर एक आजीच होती. जिच्याकडून दीनाला प्रेम आणि मदतीची अपेक्षा होती. जिन्ना आपल्या मुलीला हवी ती पैशाची मदत करतच होते.

Image copyright PAKISTAN NATIONAL ARCHIVE

आपली बहीण फातिमाच्या विरोधात जिन्ना हे त्यांच्या मुलीला दीनाला पैसे पुरवत होते.

जेव्हा दीनांनी नेविल वाडिया यांच्याशी लग्न करण्याचा निश्चय केला, तेव्हा पहिल्यांदा जिन्ना यांनी आपल्या मुलीच्या आयुष्यात दखल दिली आणि लग्नाला विरोध केला.

कापड उद्योगाचे मालक असलेले वाडिया हे खरं तर दीनासाठी सर्वार्थानं एक उत्कृष्ट असे वर होते. पण, ते मुसलमान नसल्यानं जिन्नांनी या लग्नाला विरोध दर्शवला. हे लग्न झाल्यास ती माझ्यासाठी राजकीय शरमेची बाब ठरेल, असं जीना यांना वाटत होतं.

या वेळेपर्यंत जिन्नांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला होता.

दीनानं जर वाडिया यांच्याशी लग्न केलं, तर मी तिच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकेन, अशी जिन्नांनी धमकी दिली होती. पण, या धमकीला भीक न घालता दीना आपल्या आजीकडं राहायला गेली.

वडिलांना भेटण्यासाठी प्रयत्न

लग्न अवघ्या काही दिवसांवर येईपर्यंत ती आजीकडे म्हणजे लेडी पेटिट यांच्याजवळ राहात होती.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा दीना यांचा मुलगा नस्ली वाडिया

यानंतर बरीच वर्षं वडील आणि मुलीत अबोला होता. शेवटी दोघांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली, तेव्हा जिन्ना आपल्या मुलीपासून पहिल्यापेक्षा जास्त दूर गेले होते.

कधीतरीच ते दीनाला चिठ्ठी लिहित असत. आपल्या आईवडिलांसोबत असलेल्या नात्यानं दीनाला प्रचंड घाबरवलं होतं. तरीही ती जिन्नांना भेटण्यासाठी प्रयत्न करत राहिली.

आत्या फातिमा यांच्या विरोधात जाऊन जिन्नांना भेटण्यासाठी दीना ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिली, ही बाब तिची चिकाटी दाखवून देते.

ज्यावेळी जिन्ना मृत्यूशय्येवर होते तेव्हा दीनाला व्हिसा नाकारण्यात आला. जिन्नांच्या अंत्यविधीच्या वेळी तिला व्हिसाची परवानगी मिळाली.

अखेरची भेट

2004 साली दीना पाकिस्तानला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची मुलं आणि नातवंडंही सोबत होती.

"ज्या देशाला माझ्या वडिलांनी घडवलं, त्या देशात उपस्थित राहणं माझ्यासाठी दुख:द आणि अद्भूत होतं." असं त्यांनी जिन्ना यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर तिथल्या नोंदवहीत लिहिलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जिन्नांचं स्मारक

पाकिस्तानातून येताना त्या जिन्नांची तीन छायाचित्रं घेऊन आल्या होत्या. त्यातल्या एका फोटोत, दीना वडील जिन्ना आणि आत्या फातिमा यांच्या मधोमध उभ्या आहेत.

दुसऱ्या छायाचित्रात त्यांची आई रती होत्या, तर तिसऱ्या छायाचित्रात जिन्ना हे त्यांच्या टाइपरायटरसोबत होते.

ही तीन छायाचित्रं म्हणजे दीना यांच्या भूतकाळाची सावली होती. ज्यांच्या माध्यमातून त्या पुन्हा एकदा भूतकाळाला सामोऱ्या गेल्या होत्या.

(शीला रेड्डी या Mr and Mrs Jinnah: The Marriage That Shook India या पेंग्विन प्रकाशनाच्या पुस्तकाच्या लेखिका आहेत.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)