हेडलीच्या खटल्यावर होती ओसामाची नजर

पाकिस्तान, भारत, काश्मीर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ओसामा बिन लादेन

कट्टरपंथी ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर जप्त करण्यात आलेली कागदपत्रं अमेरिकेची मुख्य गुप्तचर संघटना असलेल्या सीआयएने खुली केली आहेत.

कट्टरपंथी ओसामा बिन लादेन संवेदनशील काश्मीरमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन होता, असं स्पष्ट झालं आहे. मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीच्या खटल्याकडे ओसामाचं लक्ष होतं.

1 मे 2011 रोजी अमेरिकेच्या सैनिकांनी पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला ठार केलं होतं. बुधवारी अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने या कारवाईसंदर्भातील 4 लाख 70 हजार फाइल्स खुल्या केल्या. यामुळे या कारवाईचा तपशील जगासमोर आला आहे.

अबोटाबादमधील कारवाईत ही कागदपत्रं जप्त करण्यात आली होती.

ही कागदपत्रं जाहीर झाल्यानं ओसामाच्या आयुष्यातील रहस्यमय गोष्टी उघड झाल्या आहेत. यामध्ये लादेनच्या मुलाचा लग्नाचा व्हीडिओ आणि काही डायऱ्या यांचाही समावेश आहे.

लादेन करायचा भारतीय वृत्तपत्रांचं वाचन

मुंबई हल्ल्याचा आरोपी डेव्हिड हेडलीवर सुरू असलेल्या खटल्याची बित्तंबातमी लादेन वाचत असल्याचं सीआयएने जाहीर केलेल्या कागदपत्रांद्वारे स्पष्ट झालं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ओसामाचा खात्मा केल्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये कारवाईचा आढावा घेताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

भारतातून प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्रं वाचून लादेन हेडलीच्या खटल्याविषयी इत्यंभूत माहिती मिळवत असे.

ओसामाच्या काँम्प्युटरमध्ये इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला 'Omar sheikh's Pak handler Ilyas kashmiri also handled Headley' नावाचा लेख मिळाला होता.

एका दुसऱ्या कम्प्युटरमध्ये श्रीलंका गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेला 'भारत आणि अमेरिकेत कट्टरपंथीयांच्या हल्ल्यांची भीती' हा लेख सापडला होता.

भारतातील वृत्तसंस्था प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियातर्फे देण्यात आलेली एक बातमी लादेनच्या कॉम्प्युटरवर मिळाली आहे.

Al-Qaeda helping Taliban to destabilise Pakistan Government: Gates असं या बातमीचं शीर्षक होतं.

हेडली आणि हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी(हुजी) यांच्यात झालेल्या गुप्त संभाषणासंदर्भातला टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात 15 नोव्हेंबर 2009 रोजी प्रसिद्ध झालेली बातमीही मिळाली आहे.

लादेनच्या कॉम्प्युटरवर पीटीआयची India to send magistrate to US to record Headley's statement.' नावाची बातमी मिळाली आहे. बातमीमधला काही तपशील पिवळ्या रंगाने अधोरेखित करण्यात आला आहे.

काश्मीरशी निगडीत बातम्यांवर नजर

काश्मीरशी निगडीत बातम्यांमध्ये लादेनला स्वारस्य असल्याचंही मिळालेल्या कागदपत्रांद्वारे स्पष्ट झालं आहे. काश्मीरमध्ये सक्रिय विविध कट्टरपंथी संघटनांशी निगडीत बातम्या लादेन आवर्जून वाचत असल्याचं उघड झालं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ओसामा बिन लादेन

अमेरिकेने पाकिस्तानला इलयास कश्मीरीला शोधण्याची केलेल्या सूचना केली होती. या संदर्भात इकॉनॉमिक टाइम्सची 7 जानेवारी 2010 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी लादेनने वाचली होती.

2009 मध्ये पाकिस्तानमधील कट्टरपंथी आणि नाटो यांच्यात झालेल्या संघर्षासंदर्भात लेख लादेनकडे मिळाला होता.

लादेन अल कायदा या कट्टरपंथी संघटनेचा प्रमुख होता. लादेनला मारल्यानंतर मिळालेली कागदपत्रं जाहीर झाल्यानं एखादी कट्टरपंथी संघटना कसं काम करते हे स्पष्ट झालं असं सीआयएचे संचालक माइक पोम्पेओ यांनी सांगितलं.

लादेन पाहात असे बीबीसीची डॉक्युमेंट्री

या फाइलींच्या बरोबरीने सीआयएनं दोन डझनांहून अधिक व्हीडिओही जारी केले आहेत. यामध्ये बीबीसीच्या द स्टोरी ऑफ इंडिया या डॉक्युमेंट्रीचा समावेश आहे. ही डॉक्युमेंट्री भारताच्या इतिहासाविषयी होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आपल्या सहकाऱ्यांसमवेत ओसामा बिन लादेन.

या सगळ्या दस्तावेजांमध्ये लादेनच्या वैयक्तिक गोष्टींचाही समावेश आहे. 18 हजार कागदपत्रं, 79 हजार ऑडियो आणि काही फोटोंचा समावेश आहे. यामध्ये लादेनने जाहीर सभेत केलेल्या भाषणाचा तसंच अल कायद्याच्या विविध ठिकाणी झालेल्या बैठकांच्या फोटोंचा समावेश आहे.

अल कायदाने अमेरिकेत 9 सप्टेंबर 2011 रोजी केलेल्या हल्ल्याला 10 वर्षं झाल्यानिमित्ताने सुरू असलेल्या तयारीचा व्हीडिओ लादेनकडे मिळाला.

लादेन कोणते व्हीडिओ पाहत असे?

अल कायदाचा म्होरक्या असलेला लादेन अॅनिमेशन चित्रपटांचा चाहता होता. त्याच्या हार्डडिस्कमध्ये अँट्ज, कार्स, चिकन लिटिल तसंच द थ्री मस्कीटर्स हे अॅनिमेशनपट मिळाले आहेत.

त्याच्याकडे यूट्यूबवरचे असंख्य व्हीडिओ मिळाले आहेत. यामध्ये इंग्लंडमध्ये व्हायरल झालेला 'चार्ली बिट माय फिंगर'चा समावेश आहे. माणसांना कसं मारावं असे 'हाऊ टू क्रोशे अ फ्लावर' व्हीडिओही लादेन पाहत असे. लादेनच्या कॉम्प्युटरवर 'फायनल फँटसी VII' हा गेम मिळाला.

लादेनकडे डॉक्युमेंट्रीचा साठा सापडला होता. where in the world is osama bin laden हिचाही समावेश होता. याव्यतिरिक्त नॅशनल जिओग्राफिकच्या कुंग फु किलर्स, इनसाइड द ग्रीन बेरेट्स अँड वर्ल्ड वर्स्ट वेनोम डॉक्युमेंट्री यांचाही समावेश होता.

मुलाच्या लग्नाचा व्हीडिओ

सीआयएद्वारे जाहीर करण्यात आलेल्या गोष्टींमध्ये लादेनचा मुलगा हमजाच्या लग्नाचा व्हीडिओही आहे. हमजा लादेनचा अत्यंत लाडका मुलगा होता. मात्र हमजाच्या लग्नाच्या व्हीडिओत लादेन दिसत नाही.

वऱ्हाडी मंडळी लादेनबद्दल बोलताना ऐकू येतं. 'दुल्हे के पिता, मुजाहिदीन के राजकुमार अपने बेटे की शादी से बहुत खुश है और उनकी खुशी सभी मुजाहिदीनों में फैल गई है' असे उद्गार ऐकू येतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हत्यारांच्या पार्श्वभूमीवर ओसामा बिन लादेन.

अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अमेरिकेची रणनीती काय असेल याचा लादेन अभ्यास करत असे. बॉब वुडवर्ड्स लिखित Obama's wars पुस्तकंही सापडलं आहे.

सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते. अल कायदा आणि इस्लामिक स्टेट यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. अल कायदा संघटनेत फूट असल्याचं कागदपत्रांद्वारे स्पष्ट होतं, असं सीआयएनं सांगितलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)