सौदी अरेबियानं पाडलं येमेनमधून रियाध विमानतळाकडं आलेलं क्षेपणास्त्र

रियाध विमानतळा

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

रियाध विमानतळ

येमेनमधून डागण्यात आलेल्या एका क्षेपणास्त्राचा वेध घेऊन ते पाडण्यात आल्याचं सौदी अरेबियानं म्हटलं आहे.

शनिवारी संध्याकाळी राजधानी रियाधवर असतानाच या क्षेपणास्त्राचा वेध घेण्यात आला, ज्याचा जोरदार स्फोटाचा आवाज रियाध विमानतळाजवळ ऐकू आला. त्या क्षेपणास्त्राचे तुकडे विमानतळ परिसरात पडल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिल्याचं सौदीच्या अधिकृत वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

हे क्षेपणास्त्र किंग खालीद आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेनं डागण्यात आल्याचं येमेनमधील हौदी बंडखोरांशी निगडित वृत्तवाहिनीनं सांगितलं.

या घटनेचा हवाई वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं विमानतळ प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे.

प्रथमच लोकवस्तीजवळचं लक्ष्य

यापूर्वीही सौदी लष्करानं हौदी बंडखोरांची क्षेपणास्त्र पाडल्याचा दावा केला आहे. मात्र लोकवस्तीच्या एवढ्या जवळ प्रथमच अशाप्रकारची घटना घडली आहे.

हे क्षेपणास्त्र छोट्या आकाराचं होतं, म्हणून कोणतंही नुकसान झालं नसल्याचं 'अल-अखबरिया' या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.

विमानतळाच्या पार्किंगमध्ये या क्षेपणास्त्रांचे तुकडे बघितल्याचं विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांनी 'अल-अखबरिया'ला सांगितलं आहे

फोटो कॅप्शन,

सौदी अरेबिया आणि येमेन

येमेनचे राष्ट्रपती अब्दराब्बूह मन्सूर हादी यांचं सरकार आणि हौदी बंडखोर यांच्यांत संघर्ष सुरू आहे.

नेतृत्व सौदी अरेबियाकडे

हौदी बंडखोरांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या आघाडीचं नेतृत्व सौदी अरेबियाकडे आहे. 2015पासून या बंडखोरांवर हवाई हल्ले केले जात आहेत.

संयुक्त राष्ट्राने केलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नानंतरही येमेनमध्ये हिंसाचार सुरूच आहे.

बुधवारी याच आघाडीने केलेल्या एका हल्ल्यात उत्तर येमेनच्या एका बाजारपेठेत 26 लोक ठार झाले होते, असं काही वैद्यकीय आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आतापर्यंत सौदी अरेबियाच्या नेतृत्वात कारवाई सुरू झाल्यापासून 8,000 लोकांचा बळी गेलेला आहे. तर 50,000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

या संघर्षामुळे दोन कोटीहून अधिक लोक संकटात आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)