#ParadisePapers : करबुडव्या श्रीमंतांच्या नंदनवनाचा पर्दाफाश

  • पॅरडाईज पेपर्स रिपोर्टिंग टीम
  • बीबीसी पॅनोरामा
The Queen inspects the King's Troop Royal Horse Artillery outside Hyde Park Barracks in London, Britain, 19 October 2017

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

राणींचे 10 दशलक्ष पाउंड्स ऑफशोअर कंपनीत गुंतवल्याचं उघड झालं आहे.

परदेशातील करमुक्त प्रदेशात इंग्लंडच्या राणीसह जगातील अतिश्रीमंत, शक्तिशाली व्यक्ती कशी गुंतवणूक करतात याबाबत एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे.

अमेरिकेने मान्यता दिलेल्या एका रशियन कंपनीत डोनाल्ड ट्रंप यांचे वाणिज्य सचिव भागधारक असल्याचे समोर आले आहे.

'पॅरडाईज पेपर्स' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गौप्यस्फोटात एक कोटी 34 लाख कागदपत्रांचा समावेश आहे. यात बहुतांश ऑफशोअर फायनान्सचा (परदेशात केली जाणारी गुंतवणूक) समावेश आहे.

या पेपर्सची चौकशी करण्याऱ्या 100 माध्यम समूहांत बीबीसी पॅनोरमाचा समावेश आहे.

'स्युडडॉएश झायटुंग' या वृत्तपत्राने मागच्या वर्षी 'पनामा पेपर्स लीक' नावाने काही गौप्यस्फोट केले होते. शोध पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय समूहाला (ICIJ - इंटरनॅशल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग जर्नालिस्ट्स) या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं.

हा पहिला गौप्यस्फोट एका मोठ्या मालिकेचा एक छोटा भाग आहे. त्यामुळे आता शेकडो व्यक्तींची आणि कंपन्यांची विविध आर्थिक संस्थांमध्ये असलेली गुंतवणूक उघड होणार आहे. यांत काहींचा युनायटेड किंगडमशी अगदी जवळचा संबंध आहे.

व्हीडिओ कॅप्शन,

व्हिडिओ: तुमच्या जवळचा पैसा कसा लपवाल?

या बातम्यांच्या बहुतांश भागात राजकारणी, बहुराष्ट्रीय कंपन्या, सेलिब्रिटी आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती, ट्रस्ट आणि संस्थांचा समावेश आहे. यांनी बनावट कंपन्यांच्या गुंतागुंतीच्या रचनेचा फायदा घेऊन कर अधिकाऱ्यांकडून गोपनीयतेच्या नावाखाली व्यवहार लपवून ठेवल्याचा उल्लेख आहे.

यातील बहुतांश व्यवहारांत कोणत्याही बेकायदेशीर व्यवहारांचा उल्लेख नाही.

मोठी नावं

  • कॅनडाच्या पंतप्रधानाच्या विश्वासू अधिकाऱ्यांचे ऑफशोअर कंपन्यांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे करासंदर्भात देशाला लाखो डॉलर्सचा फटका बसू शकतो. यामुळे टॅक्स हॅवन बंद करण्याबाबत जोरदार मोहीम उघडणारे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर नामुष्की ओढवेल.
  • ब्रिटनमधले हुजूर पक्षाचे उपाध्यक्ष आणि महत्त्वाचे डोनर असलेले लॉर्ड अशक्रॉफ्ट यांनी परदेशातील गुंतवणुकीच्या व्यवस्थापनाबाबत नियमांना बगल दिली असावी. काही कागदपत्रांनुसार UKचा नागरिक असूनसुद्धा त्यांनी हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये गैररहिवाशी प्रमाणपत्र मिळवल्याचं कळतं.

राणींचा कसा सहभाग?

राणींच्या खासगी मालमत्तेपैकी 10 मिलियन पाउंडस (अंदाजे 84 कोटी रुपये) बाहेरच्या देशांत गुंतवल्याचा उल्लेख पॅरडाईज पेपर्समध्ये आहे.

राणींची संपत्ती सांभाळणाऱ्या डची ऑफ लँकास्टरने कॅमन आयलँड आणि बर्म्युडा या ठिकाणी हे पैसे गुंतवले आहेत. त्यातून राणींना काही मासिक उत्पन्न मिळतं आणि त्यांच्या 500 मिलियन पाउंड्स (अंदाजे 4226 कोटी रुपये) इतक्या खासगी मालमत्तेचं नियमन होतं.

व्हीडिओ कॅप्शन,

पॅरडाईज पेपर्स : राणीनं पैशाची गुंतवणूक नेमकी केली कशी?

या गुंतवणुकीत काहीही बेकायदेशीर आढळून आलेलं नाही किंवा राणी कर भरत नाहीत, असं कुठेही निदर्शनास आलं नाही. पण ब्रिटनच्या राणी बाहेरच्या देशात गुंतवणूक का करतात याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

UKमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या ब्राईटहाऊस या कंपनीतसुद्धा राणींनी काही प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या कंपनीवर गरिबांची फसवणूक केल्याचा आरोप होतात. ब्राईटहाऊसने 17.5 मिलियन पाउंड्स (अंदाजे 1.49 कोटी रुपये) कर चुकवला होता आणि त्यामुळे 6000 लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन,

वादग्रस्त ब्राईटहाऊसमध्ये राणींनी गुंतवणूक केली आहे.

डचीच्या म्हणण्यानुसार पैशाबद्दलच्या निर्णयांत त्यांचा कोणताही सहभाग नव्हता. राणींच्या वतीने गुंतवणूक कुठेकुठे केली आहे, याविषयी राणींना माहिती असल्याचा कुठेही उल्लेख नाही.

डचीने यापूर्वी म्हटलं आहे की ते "राणींच्या प्रतिष्ठेला धक्का लावू शकतील, अशा सर्व कृत्यांचा अभ्यास करत आहेत." राणी स्वतःच्या मालमत्तेविषयी "अतिशय सजग" असतात, असंही डचीने म्हटलं होतं.

रॉस आणि ट्रंप यांच्यावर नामुष्की?

विल्बर रॉस यांनी 1990 च्या दशकात डोनाल्ड ट्रंप यांना दिवाळखोरीपासून वाचवलं होतं. त्याचंच बक्षीस म्हणून ट्रंप यांच्या प्रशासनात त्यांना वाणिज्य सचिवपद मिळालं.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

विल्बर रॉस आणि डोनाल्ड ट्रंप

तेल आणि गॅस यांची वाहतूक करून वर्षाला लाखो डॉलर्स कमावणाऱ्या एका शिपिंग कंपनीत ट्रंप यांनी रस घेतला आहे. ही कंपनी एका रशियन ऊर्जा कंपनीसाठी वाहतूक करते. या कंपनीच्या भागधारकांमध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या जावयाचा आणि अमेरिकेने निर्बंधित दिलेल्या दोन व्यक्तींचा समावेश आहे.

या प्रकरणामुळे रशिया आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या टीममधल्या संबंधाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत ट्रंप यांनी रशियाशी संगनमत केल्याच्या आरोपावरून ट्रंप यांची प्रतिमा आधीच मलीन झाली आहे.

फोटो कॅप्शन,

विल्बर रॉसचे लागेबंधे

ट्रंप यांनी या आरोपाला 'खोटी बातमी' म्हटलं आहे.

ही कागदपत्रं आली कुठून?

या गौप्यस्फोटांतील बहुतांश माहिती अॅपलबी या कंपनीकडून आली आहे. ही कंपनी कायद्याशी निगडित गोष्टींची सेवा देते. तसेच आपल्या आशिलांना शून्य किंवा कमी कर असलेल्या देशांत कंपनी स्थापन करण्यास मदत करते.

या कंपनीची कागदपत्रं कॅरेबियनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कॉर्पोरेट रजिस्ट्रीजकडून स्युडडॉयश झ्वायटुंग या वृत्तपत्राने मिळवले आहेत. वृत्तपत्राने सूत्रांबद्दल माहिती द्यायला मात्र नकार दिला.

या दस्तावेजांचा खुलासा करणाऱ्या माध्यम समूहांचं म्हणणं आहे की चौकशी जनहितार्थ आहे. कारण टॅक्स हॅवन देशातून सातत्याने गैरप्रकार उघडकीस येत आहेत.

या लीकला उत्तर देतांना अॅपलबी कंपनीने सांगितलं, "आम्ही किंवा आमच्या आशिलांनी कोणतेही गैरप्रकार केलेले नाहीत, याचा आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही कोणतेही गैरप्रकार सहन करणार नाही."

ऑफशोअर फायनान्स म्हणजे नक्की काय?

ऑफशोअर फायनान्स म्हणजे एखादं असं ठिकाण जे आपल्या कायद्याच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे. या ठिकाणी कंपनी किंवा व्यक्ती कमी कराचा फायदा घेऊन पैसा, मालमत्ता किंवा नफा इतरत्र वळवू शकतात.

या कार्यक्षेत्राला सामान्य जनतेच्या भाषेत 'टॅक्स हॅवन' म्हणतात. उद्योगक्षेत्रात त्याला 'ऑफशोअर फायनान्शिअल सेंटर' (OFC) असं म्हणतात. सामान्यत: ते स्थिर, गोपनीय आणि विश्वसनीय असतात. ती बऱ्याचदा छोटी बेटं असतात. पण प्रत्येकवेळी असं असेलच असा काही नियम नाही. गैरव्यवहारांवर ते किती नियंत्रण ठेवतं, यानुसार त्यात फरक आढळून येतो.

हे अतिश्रीमंतांविषयी सुद्धा आहे. 'कॅपिटल विदाऊट बॉर्डर्स: वेल्थ मॅनेजर्स अँड वन पर्सेंट'चे लेखक ब्रुक हॅरिंग्टन सांगतात की, ऑफशोअर फायनान्स हे एक टक्यासाठी नाही तर 0.001% लोकांसाठी आहे.

आपल्यावर याचा काय परिणाम?

'बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप'च्या म्हणण्यानुसार ऑफशोअर प्रदेशात 1 लाख कोटी डॉलर्स आहेत. हा UK, जपान आणि फ्रान्सच्या एकत्रित उत्तपन्नाइतका आहे. हा आकडा याहून मोठा असू शकतो.

ऑफशोअरवर टीका करण्याऱ्यांच्या मते गुप्तता हे त्याचं मुख्य कारण आहे. या गुप्ततेमुळेच अनेक गैरव्यवहारांना चालना मिळते. असमानता हे आणखी एक कारण आहे. या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी सरकारचे प्रयत्न अत्यंत कमी आणि प्रभावहीन आहेत.

फोटो कॅप्शन,

कोणाचा पैसा आहे यात?

ब्रुक हेरिंगटनच्या म्हणतात, "जर श्रीमंतानी करचुकवेगिरी केली तर भार गरिबांवरच पडेल. सरकार चालवण्यासाठी एक विशिष्ट प्रमाणात पैसा लागतो. सरकार श्रीमंत आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून जे गमावतं त्याची भरपाई गरिबांची चामडी सोलून केली जाते."

UKमधल्या मजूर पक्षाचे खासदार आणि सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष मेग हिलर यांनी बीबीसी पॅनोरामाला सांगितलं, "ऑफशोअरमध्ये काय सुरू आहे ते आपण बघायला हवं. जर ऑफशोअर गुप्त नसतं तर बऱ्याचशा गोष्टी टळल्या असत्या. आपल्याला पारदर्शकता हवी आहे आणि यावर प्रकाश पडायला हवा असं आम्हाला वाटतं."

ऑफशोअरच्या बचावात काय सांगितलं जातं?

ऑफशोअर फायनान्शिअल सेंटर म्हणतात की ते नसते तर सरकारने किती कर लावावा, यावर कोणतंही बंधन नसतं. त्यांच्या म्हणण्यानुसार ते पैशाच्या ढिगावर बसलेले नाही. पण जगभरात पैसा खेळता राहण्यासाठी ते प्रयत्न करतात.

बर्म्युडाचे अर्थमंत्री बॉब रिचर्डस यांना या प्रकरणी बीबीसी पॅनोरमाने प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की इतर देशांचा कर गोळा करणं हे त्यांचं काम नाही आणि यातून त्या-त्या देशांनीच मार्ग काढला पाहिजे.

अॅपलबीने यापूर्वीच म्हटलं आहे की "भ्रष्ट सरकारांनी छळलेल्या पीडितांना संरक्षण देण्याचं काम ऑफशोअर कंपन्या करतात."

पॅरडाईज पेपर्सचे 134 लाख कागदपत्रं जर्मन वृत्तपत्र स्युडडॉएश झायटुंग यांना मिळाले व त्यांनी ते आंतरराष्ट्रीय शोध पत्रकारांच्या समूहाकडे (ICIJ) पाठवले. 76 देशांमधल्या 100 माध्यम संस्थांनी मिळून केलेल्या या तपासात बीबीसीच्या वतीने पॅनोरामाने भाग घेतला. ही कागदपत्रांचा स्रोत काय आहे, याची बीबीसीला माहिती नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)