#ParadisePapers प्रकरण नक्की आहे तरी काय?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
व्हिडिओ: तुमच्या जवळचा पैसा कसा लपवाल?

जगभरातील श्रीमंत, अतिश्रीमंत आणि बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी ऑफशोअर फायनान्स कंपन्यांमार्फत गुंतवलेल्या पैशासंदर्भातली कागदपत्रं म्हणजे पॅराडाईज पेपर्स. पण या किचकट प्रकरणात काही मोठी नावं अडकली आहेत, एवढंच कळत आहे. पण या कागदपत्रांमध्ये नेमकं आहे काय?

'पॅरडाईज पेपर्स' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गौप्यस्फोटात 1.34 कोटी कागदपत्रांचा समावेश आहे. यात बहुतांश ऑफशोअर फायनान्सविषयीचे (परदेशात केली जाणारी गुंतवणूक) कागदपत्रं आहेत.

बीबीसी पॅनोरामासह जगभरातल्या 100 माध्यम समूहांनी ही चौकशी एकत्र केली आहे. ज्या कंपन्यांनी आणि देशोदेशीच्या श्रीमंतांनी आपला पैसा विदेशी कंपन्यांमध्ये ठेवला आहे त्यांची माहिती यातून बाहेर आली आहे.

जगभरातील सेलेब्रिटी, खेळाडू काही फर्मच्या मदतीने या 'टॅक्स हॅवन्स'मध्ये पैसा गुंतवतात. ज्या देशांमध्ये गुंतवणुकीवर कर किमान किंवा पूर्णतः माफ असतो, अशा देशांना टॅक्स हॅवन्स म्हणतात.

'पॅरडाईज पेपर्स' म्हणजे काय?

फ्रेंचमध्ये टॅक्स हॅवन्सला 'पॅराडाईज फिस्कल' म्हणतात. त्यावरूनच या गौप्यस्फोटाला 'पॅरडाईज पेपर्स' असं म्हटलं गेलं आहे.

सोबतच यात अडकलेले हाय-प्रोफाईल लोक, आणि 'टॅक्स हॅवन्स' म्हणून पुढे आलेल्या देशांची नावंही या नावाला साजेशी आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

याच देशांपैकी एक म्हणजे बरम्युडा, जिथली अॅपलबी कंपनी या सगळ्या प्रकरणाचा एक मुख्य दुवा आहे. अॅपलबीच्या सहाय्याने अनेक अशिलांनी आपला पैसा या टॅक्स हॅवन्समध्ये गुंतवला आहे.

कुणाची नावं झाली उघड?

या ऑफशोअर वित्तीय प्रकरणात शेकडो नेते, सेलिब्रिटी, बहुराष्ट्रीय कंपन्यांची नावं समोर आली आहेत. या कागदपत्रांमध्ये काही अशा कायदेविषयक आणि वित्तीय संस्था आणि अकाउटंट्सची नावं उजेडात आली आहेत, जे अशा परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करतात.

यातील काही मुख्य गौप्यस्फोट :

  • इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनीही बर्म्युडा देशात असल्याचं या पेपर्समध्ये म्हटलं आहे.
  • अमेरिकेने निर्बंध घातलेल्या एका रशियन कंपनीत डोनाल्ड ट्रंप यांचे वाणिज्य सचिव भागधारक असल्याचे समोर आले आहे.
प्रतिमा मथळा विल्बर रॉस
  • कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांचे या ऑफशोअर कंपन्यांशी लागेबांधे आहेत. यामुळं टॅक्स हॅवन बंद करण्याबाबत जोरदार मोहीम उघडणारे जस्टिन ट्रुडो यांच्यावर नामुष्कीची वेळ ओढवली आहे.
  • ब्रिटनच्या हुजूर पक्षाचे उपाध्यक्ष आणि एक महत्त्वाचे देणगीदार असलेले लॉर्ड अॅशक्रॉफ्ट यांनी त्यांची परदेशातील गुंतवणुकीच्या व्यवस्थापनाबाबात नियमांना बगल दिली असावी, असा अंदाज आहे. काही आणखी कागदपत्रांच्यानुसार युकेचे नागरिक असूनसुद्धा त्यांनी हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये गैररहिवाशी प्रमाणपत्र मिळवल्याचं कळतं.

कुठून आले पॅरडाईज पेपर्स?

पॅरडाईज पेपर्स हे डेटा स्वरुपात आहेत. हा डेटा 1400 गिगाबाइट इतका मोठा आहे. जर कागदपत्रांच्या स्वरुपात पाहिलं तर ही अंदाजे 1.34 लाख पानं आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 'स्युडडॉयश झायटुंग' जर्मन वृत्तपत्राने हा पॅरडाईज पेपर्सचा डेटा मिळवला.

बर्म्युडा येथे मुख्यालय असलेल्या अॅपलबी कंपनीचे 60 लाख कागदपत्रं, सिंगापूर येथे मुख्यालय असलेल्या एशिया सिटी ट्रस्टचे काही कागदपत्रं आणि 19 अधिकारक्षेत्रात असलेल्या कंपन्यांची काही कागदपत्रं 'स्युडडॉयश झायटुंग' या जर्मन वृत्तपत्राने मिळवली.

नंतर त्यांनी ही कागदपत्रं इंटरनॅशनल कन्सॉरशियम फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (ICIJ) यांच्याकडे सोपवली. 1950 ते 2016 या काळातला डेटा मिळवण्यात आला आहे.

काय आहे 'अॅपलबी'?

ऑफशोअर अकाउंटमध्ये (विदेशी खात्यांमध्ये) कशी गुंतवणूक करायची, याबाबत अॅपलबी कंपनी बड्या कॉर्पोरेट कंपन्या आणि गर्भश्रीमंतांना सल्ला देते.

1890 मध्ये बर्म्युडामध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या प्रकारची सेवा देणाऱ्या कंपन्यामध्ये जगातील सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीची जगभरात 10 कार्यालयं आहेत.

प्रतिमा मथळा अॅपलबी

या कंपनीचे सर्वाधिक क्लायंट्स अमेरिकेत आहेत. अमेरिकेतल्या 31,000 जणांनी या कंपनीची सेवा घेतल्याचा या लीकमध्ये उल्लेख आहे.

तसंच 14,000 हून अधिक अॅपलबी क्लायंट्सनी आपला पत्ता युकेचा दिला आहे तर 12,000 क्लायंट्स बर्म्युडामधले आहेत.

पॅरडाईज पेपर्स कुणी लीक केले?

'स्युडडॉएश झायटुंग' या जर्मन वृत्तपत्राने 2016च्या पनामा पेपर्ससोबतच पॅरडाईज पेपर्स मिळवले होते. ज्यांच्याकडून स्युडडॉएश झायटुंगने हा डेटा मिळवला त्यांची ओळख सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली आहे.

पनामा पेपर्सच्या वेळीही माहितीचं मुख्य स्रोत म्हणून 'जॉन डो' असं एक नाव महिन्याभरानं देण्यात आलं होतं.

पॅराडाईज पेपर्सवर कोण काम करत आहे?

पनामा पेपर्सप्रमाणेच इंटरनॅशनल कन्सॉरशियम फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (ICIJ) म्हणजेच शोधपत्रकारांच्या आंतराष्ट्रीय समूह या प्रकल्पावर काम करत आहे.

जगभरातील 67 देशातील प्रतिष्ठित पत्रकार या समूहामध्ये आहेत. 100 पेक्षा अधिक माध्यमांशी ICIJने भागीदारी केली आहे. यापैकी एक आहे बीबीसीने पॅनोरामा.

गार्डियन आणि न्यूयॉर्क टाइम्सदेखील या प्रकल्पात सहभागी आहेत.

सामान्य जनतेचा यात काय फायदा?

या लीक्समुळं जगभरातील बड्या कंपन्या आणि अतिश्रीमंतांचे आर्थिक व्यवहार उघड होणार आहे. कुणाचे कुणाशी लागेबांधे आहेत, ते देखील स्पष्ट होणार आहे.

प्रतिमा मथळा अॅपलबीचे संबंध कुणाकुणाशी?

पॅरडाईज पेपर्स लीकमध्ये 714 भारतीयांची नावे असल्याचं उघड झालं आहे. त्यात केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा, भाजपचे खासदार आर. के. सिन्हा आणि अभिनेता संजय दत्त यांची पत्नी मान्यता यांची नावं आहेत.

या लीकचं वैशिष्ट्य काय?

गेल्या चार वर्षांतली ही पाचवी मोठी लीक आहे. पनामा पेपर्सता साईज 2.6 टेराबाइट होता. त्या तुलनेत पॅरडाईज पेपर्सचा साईज कमीच आहे. पण यावेळी जी माहिती हाती आली आहे ती तुलनेने अधिक प्रभावी आहे.

गेल्या लीकच्या तुलनेत या लीकमध्ये अधिक स्पष्टता आहे. कुणाचे हितसंबंध कुणाशी जोडले गेले आहेत, याचं रहस्य देखील उलगडू शकतं, असा अंदाज आहे.

ICIJचे गेराल्ड रायल सांगतात, "पॅरडाईज पेपर्स लीक महत्त्वपूर्ण आहेत. ऑफशोअर गुंतवणूक सल्लागार कंपन्यांमधील महत्त्वपूर्ण कंपनीचा डेटा हाती लागणं ही एक मोठी गोष्ट आहे."

प्रतिमा मथळा किती मोठा आहे हा लीक?

"(पनामा पेपर्स प्रकरणात अडकलेली मुख्य कंपनी) 'मोजॅक फोंसेका'चा लीक झालेला डेटा अनेकांनी धुडकावून लावला होता. कारण 'मोजॅक फोंसेका' हे कुणालाही सेवा द्यायचे. पण 'अॅपलबी'ची गोष्ट वेगळी आहे. ही या व्यवसायातील सर्वांत मोठी कंपनी आहे आणि म्हणून यंदा अनेक बडे मासे अडकणार आहे," असं रायल पुढे सांगतात.

पॅरडाईज पेपर्स लीकमध्ये मिळालेली कागदपत्रं पनामा पेपर्सपेक्षाही अधिक किचकट आहेत.

"ही कागदपत्रं आम्हाला निरनिराळ्या पद्धतींमध्ये मिळाली होती. म्हणून त्यांचा अर्थ समजणं अवघड होतं आणि ते आम्हाला मांडायलाही वेळ लागला."

"पण हा सगळा डेटा गाळताना आम्हाला काही आश्चर्यकारक गोष्टी सापडत गेल्या. पण एकंदरच हा डेटा समजून घेण्यास अवघड होता," असं रायल यांनी म्हटलं.

टॅक्स हॅवन्स म्हणजे नेमकं काय?

टॅक्स हॅवन्सची नेमकी व्याख्या सांगणं कठीण आहे. साधारणतः माध्यमं आणि जनतेकडून या शब्दाचा वापर केला जातो. तर कॉर्पोरेट कंपन्या टॅक्स हॅवन्स असं न म्हणता ऑफशोअर फायनांशियल सेंटर (OFC) असं म्हणतात.

टॅक्स हॅवन्स म्हणजे असे काही देश जिथं गुंतवणुकीवर किमान कर आहे किंवा ते देश पूर्णतः करमुक्त आहेत. या देशांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची माहिती गोपनीय ठेवली जाते.

स्वित्झर्लंड, आयर्लंड आणि नेदरलॅंड्समध्ये कर कमी करणाऱ्या काही अशाच यंत्रणा आहेत, तर ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये अशा प्रकारच्या OFCला प्रोत्साहन देणारी करसंरचना आहे.

म्हणून या देशांमधले लोक कर बुडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी टॅक्स हॅव्हन्सचा वापर करतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)