#ParadisePapers : कायद्यातील त्रुटीचा गैरफायदा घेऊन अॅपलनं बुडवला कर

  • पॅरडाईज पेपर्स रिपोर्टिंग टीम
  • बीबीसी पॅनोरामा
टीम कूक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक

जगातील सगळ्यांत जास्त नफा कमावणारी कंपनी अशी ख्याती असलेली अॅपल कंपनी कोट्यवधी डॉलर्सचा कर चुकवत आहे, असं पॅरडाईज पेपर्समध्ये उघड झालं आहे.

इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (ICIJ) म्हणजेच शोधपत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय समूहानं पॅरडाईज पेपर्स लीक केले.

त्यात बहुराष्ट्रीय कंपन्या आणि अतिश्रीमंत व्यक्तींनी टॅक्स हॅव्हन्समध्ये आपला पैसा गुंतवला अशी माहिती समोर आली आहे.

या यादीमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या अॅपलचंही नाव समोर आलं आहे.

त्यांनी एक गुंतागुंतीची रचना तयार केली आहे. त्यातून त्यांनी कर चुकवण्यासाठी पळवाट तयार करून कोट्यवधी रुपयांचा कर बुडवला ही बाब समोर आली आहे.

2013 मध्ये वादग्रस्त 'दुहेरी कर' कायद्याला वेसण घातल्यानंतर, अॅपलने आपला पैसा टॅक्स हेव्हन्समध्ये गुंतवला अशी माहिती समोर आली आहे.

'दुहेरी कर' पद्धतीवर निर्बंध लागू झाल्यानंतर अॅपलनं आपल्याकडील 252 बिलियन डॉलर्स (अंदाजे 23,000 कोटी रुपये) जर्सी येथील चॅनेल आयलॅंडमध्ये गुंतवले होते.

फोटो स्रोत, Getty Images

"नवीन संरचना लागू झाल्यानंतर आमच्या कराचं प्रमाण कमी झालं नाही," असं अॅपलनं आपल्या प्रसिद्धिपत्रकामध्ये सांगितलं आहे.

"आम्ही अजुनही जगात सर्वांत जास्त कर भरणारी कंपनी आहोत," असं त्यांनी म्हटलं आहे.

"गेल्या तीन वर्षांमध्ये आम्ही 35 अब्ज डॉलर कर भरला आहे. आम्ही कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाही. तसेच कोणत्याही देशातला कर आम्ही बुडवला नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.

"नवा कायदा आणल्यानंतर आम्ही आयर्लंडमधला व्यवसाय किंवा गुंतवणूक कमी केली नाही," असं अॅपलनं म्हटलं.

पॅरडाईज पेपर्स नावानं लीक झालेल्या माहितीमध्ये टॅक्स हॅव्हनमध्ये झालेल्या गुंतवणुकीवर मोठे गौप्यस्फोट झाले आहेत.

दुहेरी आयरिश कर संरचना म्हणजे काय?

आयर्लंडमध्ये स्थापन करण्यात आलेल्या उपकंपन्यांना तांत्रिकदृष्ट्या कर भरावा लागत नाही. याचा गैरफायदा अॅपलसारख्या कंपन्यांनी 2014 पर्यंत घेतला.

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी रिपब्लिक ऑफ आयर्लंडमध्ये उपकंपन्यांची स्थापना करून अमेरिकेत घेतल्या जाणाऱ्या अतिरिक्त करापासून आपली सुटका करून घेतली.

अॅपलला अमेरिकेबाहेरून 55 टक्के महसूल मिळतो. अॅपलने आयर्लंडमध्ये काही उपकंपन्यांची स्थापना केली.

तांत्रिकदृष्ट्या त्या आयर्लंडमध्ये स्थापित झालेल्या असल्यामुळं त्यांना जास्त कर द्यावा लागत नसे.

आयर्लंडमध्ये 12.5 टक्के आणि अमेरिकेत 35 टक्के पूर्ण कर भरण्याऐवजी त्यांनी नफ्यावर किमान कर भरला.

अमेरिकेबाहेर केलेल्या उत्पादनांच्या विक्रीतून मिळालेला नफा आणि त्यावर बाहेर देशात अॅपलनं भरलेल्या कराचं प्रमाण हे नेहमी कमी होतं असं आढळून आलं आहे.

उत्पन्नाच्या तुलनेत कराचं प्रमाण हे पाच टक्के एवढंच आहे तर मधल्या काळात हे प्रमाण कमी होऊन 2 टक्क्यांपर्यंत सुद्धा गेल्याचं लक्षात आलं आहे.

युरोपियन कमिशनची भूमिका

युरोपियन कमिशनने एकदा अॅपलच्या आयरिश कंपनीचं कराचं प्रमाण तपासलं होतं. हे प्रमाण फक्त 0.005% टक्के इतकं होतं.

2013 मध्ये अमेरिकन सिनेटमध्ये अॅपलचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

अमेरिकन सेनेटर कार्ल लेव्हिन यांनी सिनेटमध्ये हा मुद्दा उचलून धरला.

अॅपलने खेळलेल्या या खेळीवर ते चिडले आणि सिनेटमध्ये कडाडले.

"सोन्याची अंडी देणारी कोंबडी तुम्ही आयर्लंडला नेली. या कंपन्या आयर्लंडमध्येही काही टॅक्स भरत नाही.

"कंपन्या म्हणजे अॅपलच्या मुकुटातील रत्नांपेक्षा कमी नाहीत. मित्रांनो, ही गोष्ट बरोबर नाही." असं लेव्हिन यांचं म्हणणं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर टीम कूक यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं होतं.

"आम्ही आमच्या कराचा एकही डॉलर बुडवलेला नाही. आम्ही पळवाटा शोधत नाही आणि आम्ही कॅरेबियन आयलंडवर आमचा पैसा देखील साठवत नाहीत," असं ते त्यावेळी म्हणाले होते.

अॅपलने पाठवलेली प्रश्नावली

अॅपलचा सावळा गोंधळ काय आहे याची आम्ही चौकशी करू अशी घोषणा यूरोपियन युनियननं 2013 मध्ये केली होती.

केवळ टॅक्स चुकवण्यासाठी या देशात कंपन्यांची स्थापना करता येणार नाही असा निर्णय आयरिश सरकारनं घेतला.

फोटो कॅप्शन,

अॅपलनं अॅपलबी पाठवलेली प्रश्नावली

या नव्या कायद्यानंतर आपला कर वाचावा म्हणून अॅपलनं आपला पैसा ऑफशोअर अकाउंट्समध्ये वळवला.

मार्च 2014 मध्ये अॅपलने अॅपलबी या संस्थेला काही प्रश्न पाठवले होते.

अॅपलबी कंपनी ही गुंतवणुकीचा सल्ला देणारी अग्रगण्य कंपनी आहे. त्यांची कागदपत्रं पॅरडाईज पेपर्समध्ये लीक झाली.

"ब्रिटिश व्हर्जिन आयलॅंड, बर्म्युडा, कॅमन आयलॅंड, मॉरिशस, जर्सी आणि गर्नजी या ठिकाणी गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत?" अशी विचारणा अॅपलनं अॅपलबीकडं केली होती.

"तुमच्या कंपनीमार्फत गुंतवणूक केल्यास काय फायदा होईल असं देखील त्यांनी विचारलं होतं. आम्ही गुंतवणूक केल्यास करातून सवलत मिळेल याची लेखी हमी तुम्ही देऊ शकता का?" असा प्रश्न त्यांनी केला आहे.

"आयरिश कंपन्यांना कर न लागता त्यांचे प्रबंधनाचे अधिकार अबाधित राहतील का?" असा प्रश्नसुद्धा अॅपलनं विचारला होता.

"आयर्लंडच्या अधिकार क्षेत्रातून बाहेर येण्यासाठी काय प्रक्रिया आहे?"

त्या ठिकाणी सरकार बदलण्याची चिन्हं आहेत का? याबाबतची काय माहिती उपलब्ध आहे?" असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.

जेव्हा अॅपल आपला क्लायंट होणार आहे हे कळल्यावर अॅपलबीच्या भागीदारांनी अॅपलबाबत गोपनीयतेच्या सर्व अटी पाळा असं म्हटल्याचा उल्लेख पॅरडाईज पेपर्समध्ये आहे.

आपण केलेली गुंतवणूक गुप्त राहावी म्हणून अॅपलनं खबरदारी घेतल्याचं उघड झालं आहे.

एका इमेलमध्ये एका वरिष्ठ भागीदारानं दुसऱ्या भागीदारास असं म्हटलं आहे, "अॅपल आपल्या प्रसिद्धीबाबत खूप संवेदनशील आहे. जे कर्मचारी अॅपलच्या खटल्यावर काम करत आहे त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही आमचं नाव कळू देऊ नये असा त्यांचा आग्रह आहे. कृपया ही बाब लक्षात ठेवावी," असं त्यांनी म्हटलं आहे.

जर्सीमध्ये केली गुंतवणूक

अॅपलनं आपल्या गुंतवणुकीसाठी UKच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जर्सीची निवड केली. या ठिकाणी विदेशी कंपन्यांना 0 टक्के कॉर्पोरेट टॅक्स लावण्यात येतो.

फोटो कॅप्शन,

ऑफशोअरमध्ये अॅपल कंपनीने गुंतवलेल्या पैशातून काय विकता घेता येऊ शकतं?

अॅपलनं आयर्लंडमध्ये निर्माण केलेली कंपनी अॅपल ऑपरेशन्स इंटरनॅशनलच्या नावावर 252 अब्ज डॉलर इतकी गंगाजळी आहे.

त्याचबरोबर अॅपलनंच तयार केलेली दुसरी कंपनी अॅपल सेल्स इंटरनॅशनलच्या नावेही गुंतवणूक करण्यात आली आहे. 2015 ते 2016 या काळादरम्यान या कंपनीच्या नावे व्यवहार झाले आहेत.

अॅपलनं खेळलेल्या या नव्या खेळीमुळं त्यांचे कोट्यवधी डॉलर्स वाचले.

2017 मध्ये अॅपलला अमेरिकेबाहेरील व्यवहारातून 44 अब्ज डॉलर महसूल मिळाला आणि त्यांनी केवळ 1.65 अब्ज डॉलर कर बाहेर देशात दिला.

हे प्रमाण 3.7 टक्के आहेत. जगभरात आकारल्या जाणाऱ्या सरासरी कॉर्पोरेट टॅक्सच्या तुलनेत हे प्रमाण एक षष्टमांश इतकं आहे.

अॅपल आणि आयर्लंड विरुद्ध युरोपियन युनियन

नियमांचं उल्लंघन करून आयर्लंडनं अॅपलच्या फायद्याचे निर्णय घेतल्याचा दावा युरोपियन कमिशनने 2016 मध्ये केला होता.

आपण चौकशी केली आणि त्यात आम्हाला असं आढळलं की आयर्लंडनं घेतलेल्या निर्णयामुळे अॅपलला करात सवलत मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images

"2003 ते 2013 या काळात अॅपलनं जो कर चुकवला आहे तो कर अॅपलनं आयर्लंड सरकारला द्यावा असं युरोपियन कमिशननं म्हटलं होतं. हा कर 13 अब्ज युरो आहे," असं त्यांनी म्हटलं होतं.

युरोपियन कमिशननं आपलं निरीक्षण मांडल्यानंतर त्याचा विरोध आयर्लंड आणि अॅपलने संयुक्तरित्या केला.

"युरोपियन कमिशनचं वक्तव्य हे फक्त राजकीय उद्दिष्टातून आहे." असं टीम कूक यांनी म्हटलं होतं.

तर आयर्लंड सरकारनं म्हटलं, "हा आमच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे. जर युरोपियन कमिशननं सांगितलं तसं आम्ही केलं तर बहुराष्ट्रीय कंपन्या दुसरीकडं जातील."

नंतर आयर्लंडने अॅपलकडून 13 अब्ज युरो कर वसुली करू असं कबूल होतं.

फोटो कॅप्शन,

ऑफशोअर ठिकाणी अॅपलची गुंतवणूक किती?

2017 मध्ये युरोपियन युनियननं म्हटलं की आयर्लंडनं अॅपलकडून कर वसूल केला नाही तर आम्ही तुम्हाला न्यायालयात खेचू.

त्यावर आयर्लंडनं प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, "ही बाब खूप गुंतागुंतीची आहे आणि वसुलीसाठी आम्हाला वेळ लागेल."

जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

जेव्हा दुहेरी आयरिश पळवाट बंद झाली त्यानंतर आयर्लंडनं कर संरचना बदलली. त्या कर संरचनेचा फायदा अॅपलसारख्या कंपन्यांनी घेतला.

अॅपलची कंपनी अॅपल सेल्स इंटरनॅशनलच्या नावावर बहुमूल्य अशी बौद्धिक संपदा होती. ही कंपनी अॅपलने जर्सी येथे स्थलांतरित केली.

कंपनीकडं असलेले पेटंट्स त्यांनी एका आयरिश कंपनीला विकले. त्यातून मिळालेला कोट्यवधी डॉलरचा नफा हा अॅपल सेल्स इंटरनॅशनलला मिळाला.

ही कंपनी जर्सीमध्ये असल्यामुळं त्यांना कर देखील भरावा लागला नाही. सर्व पैसा त्यांच्या खात्यात जमा झाला.

सुरुवातीला असं वाटलं की, अॅपलनं केलेल्या या खेळीचा फायदा आयर्लंडला झाला नाही.

पण 2015 मध्ये आयर्लंडच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) मध्ये 26 टक्क्यांची वाढ झाली होती अशी चर्चा त्यावेळी माध्यमांमध्ये होती.

अॅपलच्या या खेळीमुळे त्यावर्षी आयर्लंडच्या उत्पन्तात 250 अब्ज युरोंची वाढ झाली होती.

आयर्लंडनं कर रचना बदलली. पण आमच्या या नव्या कर रचनेमुळं बहुराष्ट्रीय कंपन्यांना काही फायदा झाला याची कबुली त्यांनी कधीच दिली नाही.

आयर्लंडच्या अर्थ खात्यानं त्यांच्यावर झालेले आरोप धुडकावून लावले.

"बहुराष्ट्रीय कंपन्यांना आम्ही जी सवलत दिली ती काही विशेष नव्हती. ही पद्धत जगभरात चालते," असं आयर्लंडच्या अर्थ खात्यानं म्हटलं होतं.

जर्सीतील गुंतवणुकीवर बोलण्यास अॅपलचा नकार

आपल्या दोन कंपन्यांच्या स्थलांतरावर बोलण्यास अॅपलनं नकार दिला आहे.

बौद्धिक संपदांच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यावर कर का भरला नाही? या प्रश्नाचं उत्तर देण्यासही त्यांनी नकार दिला.

"2015 मध्ये जेव्हा आयर्लंड सरकारनं आपल्या कर कायद्यांमध्ये बदल केला. त्यावेळी आम्ही आमच्या कंपन्यांचं स्थलांतर जर्सीमध्ये केलं.

याबाबत आम्ही युरोपियन कमिशन, आयर्लंड सरकार आणि अमेरिकेला कळवलं आहे," असं स्पष्टीकरण अॅपलनं दिलं आहे.

"आम्ही जे बदल केले त्यामुळं कोणत्याही देशातील कर बुडालेला नाही. खरं तर या नव्या बदलामुळं आयर्लंड सरकारला आम्ही गेल्या तीन वर्षांत 1.5 अब्ज डॉलर कर दिला आहे.

ही रक्कम आम्ही पूर्वी भरत होतो त्या कराच्या तुलनेत जास्त आहे," असं अॅपलनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)