काबुल : शमशाद टीव्ही चॅनलच्या इमारतीवर 'ISचा' हल्ला, सुरक्षारक्षक ठार

शमशाद टीव्ही चॅनलवरील हल्ला रोखणारे पोलीस कर्मचारी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

काबुलमधील शमशाद या टीव्ही चॅनलच्या कार्यालयावर तीन बंदुकधारी हल्लेखोरांनी मंगळवारी हल्ला केला.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये 'शमशाद टीव्ही' चॅनलच्या कार्यालयावर तीन बंदुकधाऱ्यांनी मंगळवारी हल्ला केला. मात्र या हल्ल्याने खचून न जाता चॅनेलनं काही तासांतच थेट प्रक्षेपणाला सुरुवात केली.

ग्रेनेड फेकून हे तीन हल्लेखोर 'शमशाद टीव्ही'च्या इमारतीत घुसले होते. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. या हल्ल्यात एक सुरक्षारक्षक ठार झाला असून 20 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इमारतीचा परिसर पोलिसांनी सील केला असून कथित इस्लामिक स्टेट संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं अफगाणिस्तानची वृत्तसंस्था 'अमाक'ने स्पष्ट केलं.

हल्ला झाल्यानंतर 'शमशाद'वरचं प्रसारण लगेच थांबवण्यात आलं होतं. पण काही तासांतच ते पूर्ववत करण्यात आलं.

तीन हल्लेखोरांनी बंदुका आणि ग्रेनेडसह चॅनेलवर हल्ला केला. यापैकी एकाने चॅनेलच्या प्रवेशद्वारावर स्वत:ला उडवलं. दुसऱ्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन गोळीबार केला.

यावेळी चॅनेलचे सगळे कर्मचारी आतच अडकले. काहींनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही जण शेजारच्या इमारतींमधून बाहेर पडले.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही तासांकरता चॅनलचं थेट प्रक्षेपण थांबवण्यात आलं. त्याऐेवजी एक फोटो स्क्रीनवर दाखवण्यात आला.

'पळण्यात यशस्वी झालो'

'शमशाद टीव्ही' चॅनल पश्तो भाषेत ताज्या घडामोडी आणि बातम्यांसह अनेक मनोरंजन कार्यक्रमांचं प्रसारण करतं. बीबीसीच्या सहकारी चॅनलपैकी शमशाद टीव्ही एक आहे.

चॅनलचे पश्तो रिपोर्टर हश्मत इस्तांकझी यांनी बीबीसीला सांगितलं, ''माझ्या काही सहकाऱ्यांचा यात मृत्यू झाल्याची शक्यता असून काही जण जखमी झाल्याची शक्यता आहे. पण मी पळण्यात यशस्वी झालो."

गेल्या काही महिन्यांपासून काबुल हे तालिबान आणि कथित इस्लामिक स्टेटचं लक्ष्य ठरलं आहे. अफगाणिस्तान हा पत्रकारांसाठी सगळ्यांत धोकादायक देश असल्याचं अफगाण पत्रकार सुरक्षा समितीनं आपल्या अहवालात म्हटलं होतं.

मे महिन्यात एका सुसाईड बाँम्ब हल्ल्यात काबुलमध्ये 150 जणांचा मृत्यू झाला होता. यात बीबीसीचा एक वाहनचालकही होता.

तसंच गेल्या वर्षी तालिबानने केलेल्या एका सुसाईड बाँम्ब हल्ल्यात खाजगी न्यूज चॅनलच्या सात जणांचा मृत्यू झाला होता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)