ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या सर्वांत लोकप्रिय नेत्या प्रीती पटेल आहेत तरी कोण?

प्रीती पटेल Image copyright PA

ब्रिटिश सरकारमधील भारतीय वंशाच्या मंत्री प्रीती पटेल यांनी गुप्तपणं केलेला इस्राईल दौरा वादात सापडताच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

ऑगस्ट महिन्यात कौटुंबिक सहलीवर इस्राईलला गेल्यावर त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि काही नेते तसंच इस्राईली अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती.

या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती त्यांनी ब्रिटिश दुतावासाला दिली नव्हती.

या प्रकरणी वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली.

पण ती पुरेशी ठरली नाही आणि आफ्रिका दौरा अर्धवट सोडून त्यांना मायदेशी परत यावं लागलं.

"माझ्याकडून कामाचा जो दर्जा अपेक्षित आहे, त्या दर्जाची माझी कामगिरी होत नाही," असं त्यांनी बुधवारी दिलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

कोण आहे प्रीती पटेल?

45 वर्षीय प्रीती पटेल या सत्ताधारी हुजूर पक्षाच्या नेत्या आहेत. पक्षातील प्रभावशाली नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

जून 2016 मध्ये त्यांच्याकडे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट मंत्रिपदाचा कार्यभार दिला होता. ब्रिटनतर्फे विकसनशील देशांना केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचं काम त्या बघत होत्या.

Image copyright EPA

प्रीती पटेल युरोपियन युनियनवर टीका करत. हुजूर पक्षात त्यांची भुमिका महत्त्वाची होती. त्यांनी समलैंगिकांच्या विवाहाच्या विरोधात मतदान केलं होतं. तसंच धुम्रपानविरोधी अभियानातही भाग घेतला होता. प्रीती पटेल इस्राईलच्या समर्थक आहे.

पटेल यांची 2010 साली खासदार म्हणून निवड झाली होती. 2014 साली त्या ट्रेझरी मंत्री होत्या. 'ब्रेक्झिट'लाही त्यांनी पाठिंबा दिला होता. 2015 च्या निवडणुकांनंतर रोजगार मंत्रिपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

गुजराती कुटुंबात जन्मलेल्या प्रीती पटेल युगांडाहून पळून लंडनला आल्या होत्या. त्यांचं शिक्षण 'वॅटफोर्ड ग्रामर स्कूल फॉर गर्ल्स' येथे झालं. कील आणि एसेक्स युनिव्हर्सिटीतून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी हुजूर पक्षाच्या केंद्रीय कार्यालयातसुद्धा काम केलं आहे.

1995 ते 1997 या काळात जेम्स गोल्डस्मिथ यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या रेफरेंडम पार्टीच्या त्या प्रवक्त्या होत्या. रेफरेंडम पार्टी हा युरोपियन युनियनविरोधी पक्ष आहे.

विलियम हेग हे हुजूर पक्षाचे नेते झाल्यावर त्यांनी या पक्षात प्रवेश केला. 1997 ते 2000 या कार्यकाळात त्या डेप्युटी प्रेस सेक्रेटरी होत्या.

त्यानंतर त्यांनी मद्य उत्पादक कंपनी डायजीओ बरोबरसुद्धा काम केलं आहे.

2005 साली नॉटिंगहॅमच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 2010 साली विटहॅममधून त्यांचा विजय झाला होता.

प्रीती पटेल माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना आदर्शस्थानी मानतात.

ऑगस्ट महिन्यात इस्राईलला कौटुंबिक सुटीदरम्यान त्यांनी इस्राईली अधिकाऱ्यांची आणि व्यापार क्षेत्रातल्या अनेकांशी गुप्त भेट घेतली असल्याची माहिती 'बीबीसी'नं गेल्या आठवड्यात दिली होती.

त्यांनी इस्राईलच्या भेटीत एका मुख्य विरोधी पक्षाच्या नेत्याची भेट घेतली.

मंत्र्यांना परदेश दौऱ्याची माहिती सरकारला द्यावी लागते. ती न दिल्यानं हा सगळा प्रकार घडला आहे.

आपल्या दौऱ्यानंतर प्रीती पटेल यांनी, ब्रिटनच्या आर्थिक मदतीचा काही भाग इस्राईली सेनेला द्यायला हवा, अशी सूचना केली होती.

परंतु पटेल यांचा प्रस्ताव अनेक अधिकाऱ्यांनी अयोग्य ठरवला होता.

Image copyright Pablo Kaplan

सिरियाच्या गोलन हाईट्स भागात इस्राईलनं 1967च्या युद्धानंतर ताबा मिळवला होता.

पण इतर काही देशांसारखंच ब्रिटननंसुद्धा इस्राईलच्या या नियंत्रणाला कधीच मान्यता दिली नव्हती.

प्रीती पटेल यांची प्रतिक्रिया

राजीनामा देण्याआधी प्रीती पटेल यांनी आपल्या भेटींबाबत परराष्ट्र विभागाला माहिती न दिल्याबद्दल माफी मागितली होती. परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन यांना त्यांच्या भेटीबद्दल माहिती होती, असंही पटेल यांनी सूचित केलं होतं.

सरकारनं सुरुवातीला त्यांची माफी मान्य केली. तसंच, पंतप्रधान थेरेसा मे यांनी पटेल यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

Image copyright PA

परराष्ट्र विभागातील एका अधिकाऱ्यानं या भेटीचा बचाव करत ब्रिटनच्या परराष्ट्र धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचं म्हटलं आहे.

पण मजूर पक्षानं पटेल यांची चौकशी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मजूर पक्षानं त्यांच्यावर नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप केला.

सोशल मीडियावरसुद्धा त्यांना टीकेचा सामना करावा लागला. कौटुंबिक सुट्टीवर असताना एखाद्या नेत्याची भेट कोण का घेईल, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला.

शेवटी काय झालं?

बुधवारी झालेल्या घटनाक्रमामुळे प्रीती पटेल आणि सरकारसमोरच्या अडचणींत वाढ झाली.

सप्टेंबर महिन्यातही प्रीती पटेल यांनी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत दोनदा बैठका घेतल्या होत्या. त्यांनी इस्राईलचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री वेस्टमिंस्टर आणि इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

'ज्युईश क्रॉनिकल'च्या मते पटेल यांनी घेतलेल्या भेटीची सरकारला कल्पना होती. पण या भेटीची वाच्यता न करण्याची सूचना त्यांना करण्यात आली होती. त्यामुळे प्रीती पटेल यांच्यासमोरच्या समस्यांत वाढ झाली. सरकारनं मात्र या आरोपाचं खंडन केलं आहे.

या घडामोडींमुळे पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर पटेल यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला. ही सगळी माहिती समोर येताच युगांडाच्या दौऱ्यावर गेलेल्या पटेल यांनी आपला दौरा अर्धवट सोडला आणि पंतप्रधानांची भेट घेऊन राजीनामा सुपुर्द केला.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)