पाहा व्हीडिओ : तुमच्या फोटोवरुन मेंढीनं तुम्हाला ओळखलं तर...

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : मेंढ्याही ओळखू शकतात माणसाचा चेहरा!

मेंढ्यामध्ये त्यांच्या सान्निध्यात असलेल्या तसंच प्रसिद्ध व्यक्तींचे चेहरे ओळखण्याची क्षमता असते, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

केंब्रिज विद्यापीठानं यासंबंधी एक अभ्यास केला आहे. या अंतर्गत काही मेंढ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

त्यानुसार या मेंढ्यांनी अभिनेत्री एमा वॉटसन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि बीबीसीच्या वृत्तनिवेदक फियोना ब्रूस यांचे चेहरे अचूकरित्या ओळखले आहेत.

अनोळखी लोकांऐवजी परिचित लोकांचे फोटो ओळखण्यात मेंढ्या सक्षम असल्याचं या प्रशिक्षणानंतर समोर आलं आहे.

मेंढ्यांमध्ये इतर प्राण्यांप्रमाणेच चेहरा ओळखण्याची क्षमता असते, हे यावरून लक्षात येतं.

मेंढ्यांनी यांना ओळखलं...

मेंढ्या या त्यांच्या ओळखीत असलेल्या इतर मेंढ्यांना आणि मेंढपाळांना ओळखतात, असं मागील एका अभ्यासात समोर आलं होतं.

Image copyright SPL

'फोटोवरुन एखाद्या व्यक्तीला ओळखणं मेंढी शिकू शकते का? याचा आम्ही अभ्यास केला,' असं या अभ्यासाचे प्रमुख जेनी मॉर्टन यांनी सांगितलं.

'एखाद्या द्विमितीय वस्तूला किंवा फोटोला मेंढ्या व्यक्ती म्हणून ओळखू शकतील का?' यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं.

या अभ्यासाअंतर्गत आठ 'वेल्श माउंटन' जातीच्या मेंढ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. यात मेंढ्यांना अपरिचित लोकांमधून चार सेलेब्रिटींना ओळखायचं होतं.

यासाठी समोर ठेवलेल्या दोन कॉम्प्युटर स्क्रीनवर दोन वेगवेगळे फोटो मेंढ्यांना दाखवण्यात आले. यात मेंढ्यांनी त्यांच्या नाकाद्वारे स्पर्श करुन अचूक फोटो निवडला.

मेढ्यांनी त्यांच्यासमोर असलेल्या फोटोंमधून सेलेब्रिटींना अचूकरित्या ओळखलं.

सेलेब्रिटींना ओळखल्यानंतर संशोधकांनी मेंढ्याना एक नवीन काम दिलं. वेगवेगळ्या अँगलने घेतलेल्या फोटोंमधून सेलेब्रिटींना ओळखायची परीक्षा या मेंढ्यांना द्यायची होती.

यातही मेढ्यांनी केलेली कामगिरी लक्ष वेधणारी होती.

चेहऱ्यावरील हावभाव मेंढ्या ओळखू शकतील?

शेवटी या मेंढ्या फोटोंवरुन त्यांच्या मेंढपाळांना ओळखू शकतील का? हे शोधकर्त्यांना बघायचं होतं.

त्यासाठी मग त्यांनी मेंढपाळ आणि इतर लोकांचे फोटो एकमेकांमध्ये मिसळले. आणि हे सर्व फोटो मेंढ्यांना स्क्रीनवर दाखवण्यात आले.

याही वेळी मेंढ्यांनी अचूकपणे त्यांच्या मेंढपाळांना ओळखलं.

मेढ्यांमध्ये मानव आणि माकड यांच्याप्रमाणेच चेहरा ओळखण्याची क्षमता असते, असं या निकालांवरून स्पष्ट झालं.

'भविष्यात मानवी चेहऱ्यावरील विविध हावभाव मेंढ्या ओळखू शकतील का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल,' असं संशोधक सांगतात.

पार्किन्सन्स आणि ह्युटिंग्टन सारख्या न्युरोडिजनरेटिव्ह आजारांबद्दल अधिक जाणून घेण्याकरता हे संशोधन प्रभावी ठरू शकतं.

या अभ्यासाशी संबंधित शोधनिबंध 'ओपन सायन्स' या रॉयल सोसायटी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)