इराक : ISच्या ताब्यातील शहरात सापडल्या सामूहिक कबरी, हवाईतळाचा केला वधस्तंभ?

हाविजा शहरातील सामूहिक कबरी Image copyright AFP/GETTY IMAGES

इराकमधील हाविजा या शहरात सामूहिक कबरी सापडल्या असून त्यामध्ये 400हून अधिक मृतदेह सापडले आहेत. या शहरावर गेल्या महिन्यापर्यंत कथित इस्लामिक स्टेटचा (IS) ताबा होता.

किर्कुक प्रांताचे गव्हर्नर राकान सईद म्हणाले, "या कबरी शहाराच्या बाहेर असलेल्या हवाईतळानजीक सापडल्या आहेत."

ज्यांना IS मृत्युदंडाची शिक्षा देत असे त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे घातलेले असत. या सामूहिक कबरीत सापडलेल्या मृतदेहांवरील कपडे याच प्रकारचे आहेत. या कबरींमधील काही मृतदेहांवर मात्र सर्वसामान्य नागरिकांसारखे कपडे सापडले आहेत.

सईद म्हणाले, IS या हवाईतळाचा वापर मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी करत होते.

इथल्या स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर ही कबर इराकच्या सैनिकांना सापडल्याचे जनरल मोरताद अल लुवैबी यांनी सांगितले.

ISच्या ताब्यात असलेल्या परिसरांतून इराकच्या सैनिकांना मोठ्या संख्येने सामूहिक कबरी सापडल्या आहेत.

गेल्या वर्षी असोसिएटेड प्रेसने प्रसिद्ध केलेल्या अहवालात अशा 72 सामूहिक कबरींची नोंद आहे. त्यामध्ये 5,200 ते 15000 इतक्या संख्येने मृतदेह असल्याचं यात म्हटलं आहे.

हाविजा हे शहर बगदादपासून उत्तरेला 240 किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर 2013पासून ISच्या ताब्यात होतं. गेल्या महिन्यात इराकच्या सैनिकांनी हे शहर परत जिंकलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)