ISविरुद्ध लढणाऱ्याची आई असण्याचं दिव्य!

अॅडले प्रोक्टोर आणि त्यांचा मुलगा जाश
प्रतिमा मथळा अॅडले प्रोक्टोर यांना त्यांचा मुलगा IS विरोधात लढण्यासाठी जात आहे याची कसलीही कल्पना नव्हती.

अॅडेल प्रॉक्टर त्यावेळी शिक्षिका होत्या. एक दिवस त्यांच्या लक्षात आले की, त्यांचा मुलगा जॉश वॉकर सुटीसाठी तुर्कस्तानाला नाही तर कथित इस्लामिक स्टेट (IS) विरोधात लढण्यासाठी सीरियात गेलेला आहे.

ISविरोधात लढणाऱ्या मुलाची आई असणं म्हणजे काय दिव्य असेल?

अॅडेल प्रॉक्टरच्या घरी चला. त्यांच्या घराच्या हॉलमध्ये फोटोंची टाईमलाईनच आहे. जॉशचे वेल्श कॅसलमध्ये तलवारीसोबतचे फोटो, आईसोबत भारताच्या ट्रिपला आला होता त्याचे फोटो, तो 18 महिन्यांचा असताना आई पापा घेतानाचा फोटो... असे बरेच फोटो इथे आहेत.

पण ही फोटोंची टाईमलाईन दीड वर्षांपूर्वीपर्यंत येऊन थांबते. तेव्हा जॉश ISविरोधात लढण्यासाठी स्वतःहून सहभागी झाला होता.

अॅडेल म्हणाल्या, "मला वाटलं होतं तो सुटीसाठी टर्कीमध्ये गेला आहे." अॅडेल ब्रिस्टलमध्ये ललित कला शिक्षक आहेत. "मी वर्गात शिकवत होते. तेव्हा एका मुलानं इस्तंबूलमध्ये विमानतळावर बाँबहल्ला झाल्याचं सांगितलं. त्यावेळी जॉश तिथूनच निघणार होता. बाँबहल्ल्यांची बातमी ऐकून मला रडूच फुटलं", त्या सांगतात.

"मी वर्गातून बाहेर पडले आणि त्याला फोन केला. त्याचा मोबाईल लागत नव्हता," मुलगा कथित इस्लामिक स्टेटविरोधात लढण्यासाठी गेल्याचं त्या दिवशीच त्यांना पहिल्यांदा कळणार होतं.

घाबरलेल्या अॅडेल यांच्या मनात वाईट विचार येत होते. त्या नारबर्थ येथील प्रेम्ब्रोकशायर इथल्या आहेत. त्या अवस्थेतच त्यांनी जॉशच्या संपर्कात असलेल्या सर्वांना फोन केले.

अॅडेल यांचे पूर्वाश्रमीचे जोडीदार आणि जॉशचे वडील यांच्याशी फोन झाला, तेव्हा परिस्थितीचा उलगडा झाला. त्यांनी सांगितलं की जॉश कुर्दिश बंडखोर गट असलेल्या कुर्दिश पिपल्स प्रोटेक्शन युनिटमध्ये स्वेच्छेनं सहभागी झाला आहे.

त्यांनी मला सांगितलं की, जॉश तुर्कस्तानात नाही तर कुर्दिस्तानात आहे. तो बाँबहल्ल्यात अडकलेला नाही, तो मारला गेलेला नाही, या विचारानं मला समाधान वाटलं.

"नंतर मी कुर्दिस्तान आहे तरी कुठं आहे, याचा शोध घेऊ लागले. उत्तर सीरिया आणि इराकच्या मध्ये हा भाग आहे."

"त्यानंतरचे काही दिवस मी जॉशचं काय झालं असेल, याचा विचार करण्यात घालवले. आणि मी त्याबद्दल काहीच करू शकतं नाही, याचीही जाणीव तेव्हाच झाली," अॅडेल प्रॉक्टर सांगतात.

फॉरेन अॅंड कॉमनवेल्थ ऑफिसने सीरियातील परिस्थित अत्यंत धोकादायक आणि अस्थिर असल्याच्या सूचना वारंवार दिल्या होत्या. तिथे न जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता.

यूकेतील ISसोबत लढण्यासाठी गेलेले सहा जण मारले गेल्याचं मानलं जात होतं. अशा स्थितीमध्ये अॅडेल विचार करत होत्या की, जॉशनं हा निर्णय का घेतला असेल. त्याच्या या निर्णयाची पूर्वसूचना देणारं काही घडलं होतं का?

"खरं तर जॉश तसा कमी बोलणारा आहे. पण सुटीसाठी जात आहे, हे सांगताना त्यानं मला घट्ट मिठी मारली होती, आणि म्हणाला होता, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मम्मी!"

प्रतिमा मथळा अॅडेल प्रॉक्टोर शाळेत शिक्षिकेची नोकरी करण्यापूर्वी त्या प्रोफेशनल डान्सर आहेत.

"मला आता असं वाटतं, जर तो खरंच परत आला नाही तर मला त्याच्या प्रेमाबद्दल खात्री पटावी म्हणून त्यानं असं केलं असावं," अॅडेल भावूक होऊन सांगत होत्या.

जॉश जेव्हा सीरियात गेला तेव्हा तो अॅबरीस्टवीथ विद्यापीठात पॉलिटिक्स अँड स्ट्रॅटजी या विषयाचा विद्यार्थी होता. त्याचा जन्म हा प्रेम्ब्रोकशायर इथला आहे.

अॅडेल म्हणतात, "तो राजकारणाशी संबंधित विषयातच जाणार, हे मला पूर्वीपासूनच वाटायचं. तो जेव्हा 7 वर्षांचा होता, तेव्हा शाळेतील दूध बंद का केलं यावर त्यानं राजकारण्यांना पत्र लिहिलं होतं."

"जेव्हा मी त्याच्या वडिलांपासून स्वतंत्र झाले, तेव्हा जॉश हेच माझं जग होतं. सर्वस्व होतं."

"त्याला वाढवताना त्याच्या वडिलांनी आणि मी त्याला शिकवलं होतं की, तुझा जर कशावर विश्वास असेल तर त्याबद्दल काहीतरी अवश्य कर. जॉश हा नेहमीच कष्टाळू आणि आदर्शवादी होता", जॉशची आई अभिमानानं सांगते

"पण तो असं काही करणार आहे, हे जर त्यानं मला सांगितलं असतं तर मी त्याला रोखलं असतं, हे त्याला ठाऊक असावं."

शेवटी जेव्हा जॉशशी संपर्क झाला, तेव्हा त्यानं आईला सांगितलं की, तो सीरियात सहा महिने राहणार आहे.

त्या म्हणाल्या, "युद्धभूमीमध्ये आहे मी, असं तो सांगायचा. आणि त्यामुळे काही वेळा संपर्कात राहणं शक्य होणार नाही, असंही तो म्हणायचा. पण तो ऑनलाईन आहे, हे पाहून तो जिवंत असल्याची खात्री होत असे आणि तोच माझ्यासाठी आधार होता."

"खरंतर त्या दिवसात मी फेसबुक आणि मेसेंजरनं पूर्ण व्यापून गेले होते. त्याच्या नावाच्या पुढं दिसणारा हिरवा डॉट आणि ते शेवटचं लॉग ऑन कधी झाला, यावरून मला आधार मिळत असे."

"कधीकधी त्याच्याशी आठवडाभर संपर्क होत नसे. मी वरवर दुर्लक्ष करत असल्याचं भासवत असले तरी तो जिवंत असेल ना या विचारानं मी आतल्या आत हादरून जात असे", अॅडेल म्हणाल्या.

"मला सतत वाटायचं की, त्याला जेव्हा गरज भासेल तेव्हा मी तिथं नसणार. पण मला माहीत होतं त्याला जे करायचं होतं ते करताना जर मरण आलं तर त्याबद्दल आदर ठेवला पाहिजे", त्या पुढे सांगतात.

2016ला जॉश यूकेमध्ये परत आला. परत येताच पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याच्या फ्लॅटची झडती घेण्यात आली. जॉश घरी येत आहे, अशी माहिती पोलिसांनीच अॅडेल यांना दिली.

"मी टीव्ही पाहात होते. मॅप्सवर शोधत कुठे काय वेळ असेल ते पाहात होते. वेळ घालवण्यासाठी जे काही करता येईल ते करत होते. मग खिडकीतून त्याचा छोटा चेहरा दिसला आणि मी धावत जाऊन अक्षरशः त्याला मिठी मारण्यासाठी धावले."

"त्या रात्री आम्ही फक्त अखंड बोलत राहिलो. खरं तर मला त्याचा फार रागही आला होता, पण मी तसं सांगितलं नाही. त्याला बरंच काही सांगायचं होतं. त्यानं काय पाहिलं, त्यानं काय अनुभवलं हे सारं काही त्याला सांगायचं होतं."

"मी त्याला सगळं सांगायला सांगितलं. त्यानं माझ्यापासून काहीच लपवू नये, असं मला वाटत होतं. जर त्यानं मला सांगितलंच नाही तर मी त्याला पाठबळ कसं देणार?"

"बाँबहल्ल्यातून जॉश दोनवेळा बचावला होता. एकदा सिगरेट ओढताना त्याच्या बाजूलाच बाँब पडला होता. तर एकदा त्याच्यापासून काही अंतरावर बाँब पडला होता. या हल्ल्यात तो एकटाच बचावला होता."

"जॉश तिथून बाहेर पडल्यानंतर त्याचा चांगला मित्र रायन लॉक मारला गेला. जर जॉश तिथं असता तर तो त्याच्यासोबतच असता."

"त्या रात्री आम्ही ड्रिंक घेतलं. जे मारले गेले त्या सर्वांविषयी तो बोलला. तो आता मोठा वाटत होता. आणि त्याच्यातला अल्लडपणा कमी झाला होता", अॅडेल प्रॉक्टर म्हणाल्या.

नंतर त्यांना समजलं की, जॉशवर दहशतवादाशी संबधित कायद्यानुसार खटला चालवला जाणार आहे. तो विद्यार्थी असताना जिथं राहात होता, तिथल्या त्याच्या बेडच्या खाली अनार्किस्ट कूकबुक हे पुस्तक सापडलं होतं. बर्मिंगहॅम इथल्या क्राऊन कोर्टाने नुकतीच त्याची मुक्तता केली आहे.

"घरी परत आल्यानंतर खटल्याला तोंड द्यायला लागल्यामुळे जॉश पुरता गोंधळला होता. "

"त्याला नंतर अँटी एंझायटी म्हणजे मानसिक अस्वास्थ्यतेवर औषधं घ्यावी लागली. इतर सर्व जबाबदाऱ्या, नोकरी यातून मी जॉशला या खटल्यांत मदत करत होते."

सुदैवानं न्यायालयानं त्याल निर्दोषमुक्त केलं. न्यायालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, सर्वच खटल्यांमध्ये आमचा निर्णय हा कायदे आणि पुरावे विचारात घेऊन देण्यात आलेला असतो.

Image copyright PA
प्रतिमा मथळा जाशची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली.

त्या म्हणाल्या, "जॉश आता सर्वसामान्य जीवन जगता यावं यासाठी प्रयत्न करत आहे."

त्यांना अपेक्षा आहे की, जॉश पुढच्या वर्षी विद्यापीठात प्रवेश घेईल आणि त्याचा पदवी प्रदान समारंभातील फोटो त्यांच्या घरच्या हॉलमध्ये असेल. टाईमलाईन पुन्हा सुरू होईल.

त्या म्हणाल्या, "मी पुन्हा आनंदित आहे. खरं तर मला डिस्नेच्या सिनेमात असल्यासारखं वाटत आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीची पानगळ सुरू आहे आणि सर्वत्र स्वच्छ सूर्यप्रकाश आहे."

"मला याचा अभिमान वाटतो की, माझ्या मुलानं त्याला पटणारी भूमिका घेतली. अर्थात हे माझ्यासाठी तणावपूर्ण ही होतं."

"खरंतर त्याला वाढवताना तुझा ज्यावर विश्वास आहे, त्या बाजूनं उभं रहा, अशी शिकवण आम्हीच दिली होती. आमची त्याच्याकडून तीच अपेक्षा होती. त्यामुळे मला वाटतं की, आपण अपेक्षा करताना काळजीपूर्वक केली पाहिजे."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)