इराक-इराण सीमेजवळ तीव्र भूकंपाचा धक्का : 300 ठार, 5,660 जखमी

भूकंप, अपघात, मृत्यू Image copyright Reuters
प्रतिमा मथळा भूकंपाचा केंद्रबिंदू असणाऱ्या हलाज्बा शहरातील एका दुकानाचे झालेले नुकसान.

इराण आणि इराकच्या सीमाभागात रिश्टर स्केलवर 7.3 तीव्रतेच्या भूकंपाने किमान 348 जणांचा मृत्यू झाला आहे. 5,660 लोक यात जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू इराक-इराण सीमेजवळच्या हलाज्बापासून 30 किलोमीटर दूर तर जमिनीखाली 33.9 किलोमीटर खोलवर होता. संयुक्त राष्ट्रानुसार या केंद्रबिंदूभोवतालच्या 100 किमी परिघात जवळजवळ 18 लाख लोक राहतात.

तुर्कस्तान, इस्राईल आणि कुवैत या शेजारी देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

मृतांपैकी बहुतांश जण ईराणच्या कर्मनशाह प्रदेशातले होते. एका आपातकालीन सेवा अधिकाऱ्यानुसार फक्त ईराणमध्येच 5,346 लोक जखमी झाले आहेत.

ईराकच्या राजधानी बगदादमध्येही सात बळी गेले आहेत. ईराकच्या आरोग्य मंत्रालयाने 321 लोक जखमी असल्याचं म्हटलं आहे.

बगदादमध्ये मृत आणि जखमींसाठी मशिदीत जाहीर प्रार्थना करण्यात येत आहे.

या भूकंपामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण आहे. अनेकांनी घरातून पळ काढून मोकळ्या जागी आश्रय घेतला आहे.

प्रतिमा मथळा भूकंपानंतर बगदाद शहरात नागरिकांनी मोकळ्या जागेत आश्रय घेतला.

इराण-इराकची सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरपोल-इ-झाहेब या परिसरात सर्वाधिक बळी गेल्याचं इराणच्या आपात्कालीन सेवा विभागाचे प्रमुख पीर होसेन कोलीवांद यांनी सांगितलं.

या शहराच्या मुख्य रुग्णालयालाही या भूकंपाने मोठं नुकसान झाल्याने जखमींवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत.

प्रदेशाची राजधानी इरबिल इथून बीबीसीच्या रामी रुहायम यांनी सांगितलं, "थोड्या वेळासाठी काय होत आहे, कळलंच नाही. मला वाटलं, खरंच काहीतरी हलत आहे की मला भास होत आहे."

"पण मग थोड्याच वेळात नक्की कळलं... भिंती हलत होत्या, इमारतींना हादरू लागल्या."

एकूण आठ गावांना भूकंपाच्या धक्क्याचा फटका बसल्याचं इराणच्या रेड क्रेसेंट संघटनेचे प्रमुख मोर्तझा सलीम यांनी सांगितलं. या दुर्घटनेमुळं काही गावांमध्ये वीजपुरवठा, दूरध्वनी आणि इंटरनेट यंत्रणा ठप्प झाल्या आहेत.

दरड कोसळण्याच्या घटनांमुळे मदत पुरवणाऱ्या यंत्रणेच्या कामात अडथळा येत आहेत, असं कोलीवांद यांनी सांगितलं.

2003 साली 6.6 तीव्रतेच्या एका भूकंपाने ईराणच्या बाम शहराला बसलेल्या धक्क्यात 26,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

सोमवारी झालेला हा भूकंप ईराणमधला 2012 नंतरचा सर्वांत विध्वसंक भूकंप होता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)