'सुपरवुमन' लिली सिंग, जी युट्यूबवरच्या कमाईतून भरते चाहत्यांचं घरभाडं

कॅनडीयन कॉमेडियन लिली सिंग Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कॅनडीयन कॉमेडियन लिली सिंग

जगात सर्वाधिक कमाई करणारी महिला युट्यूबर म्हणजे लिली सिंग. युट्यूबवर एकापेक्षा एक भारी व्हीडिओ बनवून लिली तिच्या चाहत्यांच्या आर्थिक अडचणी दूर करते.

लिलीने तिच्या 45 लाख ट्विटर फॉलोअर्सला विचारलं की सध्या ते कुठल्या आव्हानांना तोंड देत आहेत. अनेक चाहत्यांनी खिसे खाली असून घरभाडं भरायला किंवा कॉलेजचे पुस्तकं खरेदी करायला पैसे नाहीत, असं सांगितलं. काहींना जिमचं शुल्क भरण्यासाठी मदत हवी होती.

आणि त्यांचं ऐकून घेतल्यावर लिलीनं त्यांना चक्क आर्थिक मदत करण्याची तयारीही दर्शविली.

बीबीसी न्यूजबीटशी बोलताना 18 वर्षांची उमा म्हणते, ती निःशब्दच झाली जेव्हा लिलीने तिच्या आजारी आईला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मदतीची तयारी दर्शविली.

फोर्ब्जनुसार 2016 मध्ये लिली सिंगने यूट्यूबच्या माध्यमातून 57 लाख पाऊंडची कमाई केली होती. जगभरात सर्वाधिक पैसा मिळवणाऱ्या यूट्यूबर्समध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर होती.

लिली ही कॅनडियन कॉमेडियन असून 'सुपरवुमन' नावाच्या तिच्या यूट्यूब चॅनलचे सव्वा कोटीहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत.

या आठवड्यात 1,000 व्ह्लॉग्ज (म्हणजेच व्हिडीओ ब्लॉग्ज) पूर्ण झाल्याबद्दल तिने चाहत्यांना एकूण एक हजार डॉलरची मदत केली. अर्थात ज्यांना पैशाची गरज होती त्यांनाच.

एका चाहतीने तिला संपर्क साधून सांगितलं की तिच्या आईला नुकतीच अटक झाली असून सध्या तीच दहा वर्षांच्या लहान भावाला सांभाळत आहे. लिलीने या चाहतीला अन्नपदार्थ खरेदी करायला आर्थिक मदत केली.

मलेशियात राहणाऱ्या उमाने न्यूजबीटला सांगितले, "मी साधारणत: कुणाजवळ बोलत नाही पण तिला सांगावंसं वाटलं. माझी आईच्या आजारपणामुळे मला थो़डं बरं नव्हतं वाटत."

"मला तिच्याकडून काहीच अपेक्षा नव्हत्या. मला फक्त तिच्याजवळ मन मोकळं करायचं होतं. आणि तेवढ्यातच माझा फोन वाजला."

"लिलीने मला सांगितलं की मी माझ्या आईला एका डिनरसाठी बाहेर घेऊन जावं आणि छानपैकी एक ट्रीट द्यावी. तिला ते आवडेल."

Image copyright SUPERWOMANFREAK
प्रतिमा मथळा मलेशियाच्या टूरवर असताना लिलीने उमाची भेट घेतली.

लिली "एक आदर्श व्यक्ती" असल्याचं उमा मानते.

"मला एक तरी सेलेब्रिटी सांगा जी आपल्या चाहत्यांसाठी इतकं काही करते. तिनं वेळ राखून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला, हे आणखी कोण करतं. माझ्यासाठी हेच खूप होतं."

अमेरिकेतील डलासमध्ये राहणाऱ्या क्लॉडीननेही लिलीला ट्विट करून तिला एका चांगल्या नोकरीची आणि परीक्षेसाठी काही पैशांची गरज असल्याचं सांगितलं.

क्लॉडीन म्हणते, लिलीने तिला दिलेला प्रतिसाद बघून ती धन्य झाली.

न्यूजबीटला तिनं सांगितलं, "मी तिच्या टीमशी बोलले आहे. मी परीक्षेसाठी सज्ज झाल्यावर दोन आठवड्यांत मला पैसे मिळतील, असं त्यांनी कळवलं. मला तरं हे सगळ स्वप्नवत आहे."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)