Miss World Affairs : सौंदर्यवतींची राजकीय भूमिका

मिस वर्ल्ड Image copyright STR/AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा प्युरतो रिकोच्या मिस वर्ल्ड 2016 स्टेफनी डेल वाले या वर्षची स्पर्धेच्या अंतिम फेरीत येत असतना

कल्पना करा सौंदर्य स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या सौंदर्यवतींचे तुम्ही फोटो घेत आहात. लटके वाद, जागतिक शांततेवर व्यक्त होणारी मतं असंही सुरू आहे....

दागिने आणि स्वीमसूट राउंड यांच्यापलीकडे जात सहभागी सौंदर्यवती राजकीय प्रश्नांवर चर्चा करत आहेत. मतमतांतरं व्यक्त होत आहेत.

चिली, तुर्कस्तान, लेबनॉन, म्यानमार, पेरू आणि अमेरिका इथे यावर्षी झालेल्या सौंदर्यस्पर्धांमध्ये सहभागी सौंदर्यवतींनी व्यक्त केलेली राजकीय मतं बातमीचा विषय बनली. अर्थात या स्पर्धांतील काही जणींना त्यासाठी आपला पुरस्कारही गमवावा लागला.

'मिस वर्ल्ड' ही स्पर्धांना 'मिस वर्ल्ड अफेअर्स' बनली आहे का, असं वाटण्यासारखं हे चित्र आहे.

'समुद्र बोलेव्हियाचा आहे'

गेल्या आठवडयात बोलिव्हियात रेना हिस्पॅनो अमेरिकाना 2017 ही सौंदर्यस्पर्धा झाली. स्पर्धेत सहभागी चिलीची मॉडेल व्हॅलेंटिना शिनित्झर हिनं 'समुद्र बोलिव्हियाचा आहे', असं जाहीर केलं.

चिली आणि बोलिव्हिया यांच्यात प्रशांत महासागरावरून गेलं शतकभर वाद सुरू आहे.

ती म्हणाली, "आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुमच्या हक्कासाठी लढत राहू. माझे सर्व लोक, चिलीची जनता, माझे सहकारी, मी ज्यांच्याशी बोलत आहे ते सर्व... म्हणा समुद्र बोलिव्हियाचा आहे."

खरं तर हा जुना वाद आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये न्यायाच्या आहे. पण या वक्तव्यानंतर ट्विटरवर मात्र नवी डिप्लोमॅटिक डिबेट सुरू झाली आहे.

बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हो मोरालेस यांनी चिलीच्या या सौंदर्यवतीला पाठिंबा देत तिच्या या धाडसी विधानाबद्दल अभिनंदन केलं.

पण चिलीच्या लोकांना मात्र तिचं हे मत रुचलेलं नाही. 'मिस चिलीनं स्वतःबद्दल बोलावं', 'मिसी चिली चिलीतच राहतात का?' अशा टीका अनेकांनी केल्या.

कुणाबरोबर सेल्फी घेतानाही सावधान!

जगातील काही भागात सौंदर्यवतींना त्यांच्या भटकंतीच्या प्लॅन्सवर आणि बोलण्यावरही नियंत्रण ठेवावं लागतं.

Image copyright INSTAGRAM / DORON MATALON
प्रतिमा मथळा मिस इस्राईल (डावीकडे) मुळं मिस लेबनॉन (डावीकडून दुसरी) अडचणीतं सापडली होती.

अमांडा हाना ही स्वीडिश-लेबनीज नागरिक आहे. तिनं 'मिस लेबनॉन इमिग्रंट 2017'चा बहुमान मिळवला होता. पण तिला हा किताब एका आठवड्यासाठीच मिळाला. तिला तो किताब परत करावा लागला.

तिचा गुन्हा काय? तर स्वीडनच्या पासपोर्टवर तिनं 2016मध्ये इस्राईलला शैक्षणिक सहल केल्याचं समजलं. म्हणून तिला तिचा सौंदर्यवतीचा बहुमान परत करावा लागला.

लेबनॉन आणि इस्राईल यांच्यात संघर्ष सुरू आहे. औपचारिकपणे 2006पासून या देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहेच.

असाच वाद 2015च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेवेळी झाला होता. स्पर्धेत सहभागी 'मिस लेबनॉन' सॅली ग्रेज हिनं मिस जपान, मिस सोल्व्हेनिया आणि मिस इस्राईल यांच्यासोबत घेतलेला सेल्फी वादात सापडला होती. शत्रूसोबत फोटो घेतले, असे आरोप तिच्यावर झाले होते.

"मी मिस जपान आणि मिस स्लोव्हेनियाबरोबर फोटो घेत असताना मिस इस्राईल मध्येच आली आणि हा फोटो घेतला. तिनंच तो सोशल मीडियावर टाकला", असा खुलासा तिनं केल्यानंतर तिचा मिस लेबनॉनचा मुकूट वाचला.

'ट्रंप यांनी उत्तर द्यावं'

मिस अमेरिका ही स्पर्धा अशीच लक्षवेधी ठरली. ही स्पर्धा राजकीय मतांपासून अलिप्त असणं अपेक्षित आहे. पण प्रश्नोत्तरांच्या राउंडमध्ये वादग्रस्त प्रश्न विचारले जातात.

स्पर्धक चुकून काहीतरी बोलतील आणि युट्यूबसाठी चांगला व्हीडिओ मिळेल, यासाठीच असे प्रश्न विचारण्यात येतात.

या वर्षी मिस टेक्सास मार्गाना वूड हिला शार्लोट्सव्हिल इथं झालेल्या निओ नाझी निदर्शानांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या वेळी निदर्शनांना विरोध करणारे हिदर हेयर मारले गेले होते.

वूड हिनं ही घटना दहशतवाद असल्याचं सांगितलं. तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यावर तातडीनं निवेदन प्रसिद्ध करायला हवं होतं, असंही ती म्हणाली. तिच्या उत्तराला माध्यमांत प्रसिद्धी तर मिळालीच, शिवाय तिनं ही स्पर्धाही जिंकली.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा मिस टेक्सासची तिनं दिलेल्या उत्तरांमुळं स्तुती झाली होती.

या स्पर्धेतील प्रश्नोत्तरांचा राउंड म्हणजे एक कला असल्याचं मानलं जातं. स्पर्धक यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही घेतात.

प्रशिक्षक व्हेलेरी हेस म्हणाल्या, "आदर्श विचार केला तर तुम्हाला विषयाची माहिती असावी लागते, तसंच उत्तरं तर्कशुद्ध आणि कुणाचा अपमान होणार नाही अशा पद्धतीनं द्यावी लागतात."

त्या पुढे म्हणतात, "हे झालं उद्दिष्ट. पण संख्याशास्त्रानुसार 5 प्रश्नांची उत्तरं काही स्पर्धेचा निकाल बदलू शकत नाही. म्हणून काहीतरी धक्कादायक बोलावं लागतं."

मासिक पाळीची तुलना हुतात्म्यांशी

तिकडे तुर्कस्तानमध्येही यंदा एका सौंदर्यवतीनं एक धाडसी विधान केलं. मिस टर्की 2017 असलेल्या 18 वर्षांच्या इटिर इसेन हिनं गेल्या वर्षी तिच्या देशातल्या बंडाच्या संदर्भातलं एक ट्वीट केलं आणि सौंदर्यस्पर्धेचा मुकुट मिळाल्यानंतर काही तासांतच तिला विखारी टिकेचा सामना करावा लागला.

तिनं ट्वीट केलं होतं की, '15 जुलैला सकाळी हुतात्मा दिनी माझी मासिक पाळी आली. या दिवसातला माझा स्त्राव हे हुतात्मांनी सांडलेल्या रक्ताचं प्रतीक असेल.'

Image copyright VITTORIO ZUNINO CELOTTO/GETTY IMAGES FOR IMG
प्रतिमा मथळा इसेन काहीवेळासाठी मिस तुर्की राहिली.

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एरडोगन 2016मध्ये झालेल्या सरकार विरोधी बंडाचं वर्णन करताना नेहमी त्या संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांना उद्देशून हुतात्मा हा शब्द वापरतात.

पण इसेन हिचं वक्तव्य मात्र हुतात्म्यांचा अवमान करणारं मानलं गेलं. या स्पर्धेच्या संयोजकांनी 'मिस टर्की ही संस्था तुर्कस्तानच्या प्रचारासाठी कार्यरत आहे, त्यामुळं अशा पोस्ट मान्य करणार नाही', अशी भूमिका घेतली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मेर्व्ह बुयुक्साराक राष्ट्राध्यक्षावर उपहासात्मक कविता शेअर केल्यानं अडचणीत आली होती.

तरीही इसेनला मिळालेला धडा तिच्या आधी हा किताब मिळवणाऱ्या सौंदर्यवतीला झालेल्या शिक्षेपेक्षा कमीच म्हणायला हवा.

2016मध्ये राष्ट्राध्यक्षांबद्दल उपहासात्मक कविता शेअर केल्यानं त्या वेळीची मिस टर्की मेर्व्ह बुयुक्साराक हिला 14 महिन्यांचा तुरुंगवास झाला होता.

'विरोध करायचा आहे, तर परवानगी घ्या'

सौंदर्यस्पर्धांच्या प्रशिक्षक हायेस म्हणाल्या, "स्पर्धेच्या विजेत्यांना नियमावली दिलेली असते. याच्या साहायाने विजेत्यांवर नियंत्रण ठेवलं जातं. स्पर्धेची प्रतिमा बिघडवली, या आरोपाखाली विजेत्यांचं पद काढूनही घेतलं जाऊ शकतं."

ऑक्टोबरमध्ये 19 वर्षीय श्वे ईयान सी हिनं तिचा 'मिस ग्रॅंड म्यानमार' हा किताब काढून घेण्यात आल्याचं सांगितलं. म्यानमारमधील राखीन प्रांतातील हिंसाचार रोहिंग्या बंडखोरांमुळे पसरत आहे, असा संदेश देणारा ग्राफिक व्हीडिओ शेअर केल्यानं हा पुरस्कार काढून घेण्यात आला आहे, असा दावा तिनं केला होता.

सी हिला या भूमिकेबद्दल तिच्या मायदेशात सहानुभूती मिळाली असती. पण संयुक्त राष्ट्रांनी राखीन प्रांतातील हिसांचाराबद्दल मानवी संकटाचा इशारा देण्याच्या पार्श्वभूमीवर तिच्या प्रतिक्रियवर इतर देशांत नकारात्मक पडसाद उमटले असते.

Image copyright SHWE EAIN SI
प्रतिमा मथळा श्वे ईन सी

ही स्पर्धा घेणाऱ्या हॅलो मॅडम मीडिया ग्रुपनं बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "तिची वर्तणूक रोल मॉडेलला शोभणारी नव्हती आणि या निर्णयाचा तिच्या राखीन व्हीडिओशी संबंध नाही."

तुमची भूमिका काहीही असो, प्रश्न राहतोच की, स्पर्धा संयोजकांचे नियम न मोडता राजकीय भूमिका कशी घ्यायची?

सौंदर्यस्पर्धेत महिला अत्याचाराचा लेखाजोखा

काही दिवसांपूर्वी पेरू इथे झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी त्यांच्या फिगरची मोजमापं न सांगता महिलांवर होत असलेल्या अत्याचारांचे आकडे सांगितले.

यात संयोजकही सहभागी झाले होते. ही स्पर्धा सुरू असताना महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या संदर्भातील फुटेजही दाखवण्यात आलं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
मिस पेरू स्पर्धेतल्या सौंदर्यवतींनी देशांतील महिलांवर होणाऱ्या हिंसेबद्दलची आकडेवारी दिली.

खरं तर पारंपरिक स्विमसूट राउंडच्या जागी घेतलेल्या या नव्या राउंडचं जगभरात कौतुक झालं. स्पर्धेच्या संयोजक जेसिका न्यूटन एएफपीशी बोलताना म्हणाल्या, "बऱ्याच महिलांना महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची माहिती नसते. त्यांना वाटतं या तुरळक घटना आहेत."

"मला असं वाटतं की, तुम्हाला तुमच्या प्रांतातील प्रतिनिधीनं, सौंदर्य सम्राज्ञीनं तुमच्या देशात काय चाललं आहे याचे खरे आकडे दिले तर ते धक्कादायक वाटतं आणि त्याचं गांभीर्य गडद होतं", असं त्या म्हणाल्या.

या महिन्याच्या अखेरीस या सौंदर्यस्पर्धेतील स्पर्धक पेरूची राजधानी लिमा इथे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल जनजागृती रॅलीतही सामील होणार आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)