8000 वर्षं जुनी वाईन सापडलीये ना भाऊ! चिअर्स!

वाईन बनवण्यासाठी वापरली जाणारी भांडी. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा फ्रान्समध्येही जार्जियासारखी मोठी भांडी आजही वाईन बनवण्यासाठी वापरली जातात.

असं म्हटलं जातं की दारू जितकी जुनी तितकी चांगली, आणि तितकीच महागही, बरं का! आता जॉर्जियाची राजधानी टिबिलिसी इथं शास्त्रज्ञांना 8,000 वर्षं जुनी मातीची भांडी सापडली असून त्यात त्यांना काही शिल्लक वाईन मिळाली आहे.

यापूर्वी दारूनिर्मितीसाठी वापरण्यात आलेली 7,000 वर्षं जुनी भांडी इराणमध्ये सापडली होती. ते वाईनच्या अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे मानले जायचे.

जॉर्जियामध्ये सापडलेल्या काही भांड्यांवर द्राक्षांची तर काहींवर नृत्य करणाऱ्या पुरुषांचे चित्र रेखाटण्यात आलं आहे.

प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकडमी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये एक शोधनिबंधात यावर लिहिण्यात आलं आहे.

टोरंटो विद्यापीठातले संशोधक स्टीफन बाटिउक म्हणाले, "जंगली युरेशियन द्राक्षांचा केवळ वाईन बनवण्यासाठी वापर होत असल्याचा हा सर्वांत जुना पुरावा असावा."

"आजच्या प्रमाणे तेव्हाही वाईन पाश्चात्त्य संस्कृतीच्या केंद्रस्थानी असावी. प्राचीन संस्कृतीत धार्मिक पंथ, औषधशास्त्र, अन्नपदार्थ, अर्थव्यवस्था आणि समाजांमध्येही वाईनला बरंच महत्त्व होतं," ते पुढे सांगतात.

पारंपरिक पद्धती

निओलिथिक काळातील ही भांडी टिबिलिसी शहराच्या 30 किमी दक्षिणेस गडच्रिली गोरा आणि शुलावेरिस गोरा गावांमध्ये सापडली आहेत. वाईनचा पुरावा दाखवणारी रसायनं आठ भांड्यात सापडली आहेत. यातील सर्वांत जुनं भांडं ख्रिस्तपूर्व 5,980 सालच्या आसपासच्या काळातलं आहे.

या संशोधनात सहकार्य करणारे जॉर्जियन नॅशनल म्युझियमचे संचालक डेव्हिड लॉर्डिकपॅंडीझ सांगतात, मोठ्या भांड्यांना क्वेवरी म्हटलं जातं, आणि अशी मोठी भांडी आजही वाईन बनवण्यासाठी जॉर्जियात वापरली जातात.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा जॉर्जियात सापडलेल्या या भांड्यांवर द्राक्षांची नक्षी आहे.

टोरंटो विद्यापीठाचे बाटिउक सांगतात की आता ज्या पद्धतीनं वाईन बनवली जाते, तशीच ती त्या काळातही बनवली जात असावी.

इराणच्या झॅगरॉस पर्वतांत ख्रिस्तपूर्व 5,400 ते 5,000 या काळातील वाईन बनवण्याचे पुरावे सापडले आहेत. हा आतापर्यंतचा वाईन निर्मितीचा सर्वांत जुना पुरावा आहे.

2011 मध्ये अर्मेनियाच्या गुहेत वाईन बनवण्याची 6000 वर्षं जुनी भांडी सापडली आहेत.

जगातील द्राक्षरहित वाईन निर्मितीचा सर्वांत जुना पुरावा चीनमधील असून, ते ख्रिस्तपूर्व 7000 काळातील आहे. ही वाईन भात, मध आणि फळांपासून बनवली जात होती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)