6000 वर्षांपूर्वीच्या त्सुनामीचा पुरावा ठरली ही कवटी

मानवी कवटी Image copyright ARTHUR DURBAND

पापुआ न्यू गिनीमधील एका प्रांतात काही वर्षांपूर्वी एक प्राचीन मानवी कवटी सापडली होती. ही कवटी जगातील पहिल्या त्सुनामीची बळी असल्याची शक्यता आता शास्त्रज्ञ वर्तवत आहेत.

1929 साली एटापे शहराजवळ सापडलेली ही कवटी सहा हजार वर्षांपूर्वीची आहे. सुरुवातीला आधुनिक मानवाचा पूर्वज असलेल्या होमो इरेक्टस प्रजातीशी तिचा चुकीच्या पद्धतीनं संबंध लावण्यात आला होता.

शास्त्रज्ञांच्या मते, पापुआ न्यू गिनीच्या बेटांचा समूह भूकंपप्रवण क्षेत्रात होता. या बेटांचं सहा हजार वर्षांपूर्वी त्सुनामीनं मोठं नुकसान केलं.

त्सुनामीच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ही कवटी असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

समुद्र क्षेत्रातील गाळ आणि 1998 साली आलेल्या त्सुनामीत उद्धवस्त झालेली जमीन यांची तुलना केल्यानंतर हे समोर आलं आहे.

"कवटीच्या हाडांचा योग्य प्रकारे अभ्यास करण्यात आला. तसंच पूर्वी काही ठिकाणी अवशेष सापडले होते, त्यावरही विशेष लक्ष देण्यात आलं," असं न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाचे प्राध्यापक जेम्स गॉफ यांनी सांगितलं.

सर्वात पहिल्या त्सुनामीचा बळी

"अवशेषांमध्ये असलेली भौगौलिक समानता ही इथल्या लोकांनी हजारो वर्षं त्सुनामी अनुभवल्याचं निदर्शक आहे," असं प्रा. जेम्स गॉफ सांगतात.

"अनेक वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेला हा माणूस जगातील सर्वांत पहिल्या त्सुनामीचा बळी असल्याच्या निष्कर्षावर आम्ही आलो आहोत," असं त्यांनी सांगितलं.

Image copyright ETHAN COCHRANE

'त्सुनामीच्या काही दिवस अगोदरच त्या व्यक्तीचं निधन झालं आणि त्याला दफन करण्यात आलं, ही देखील शक्यता असू शकते,' असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

या अभ्यासासाठी किनारी भागातील गाळाचा, समुद्रातील सूक्ष्म जीवांचा अभ्यास करण्यात आला आणि त्याची तुलना करण्यात आली 1998 साली आलेल्या त्सुनामीनंतरच्या परिस्थितीशी.

1998 साली आलेल्या त्सुनामीमुळं दोन हजारपेक्षा जास्त लोख मृत्युमुखी पडले होते. या त्सुनामीनंतर समुद्रात सापडलेले सूक्ष्म जीव आणि त्या गाळातील सूक्ष्म जीवांशी साधर्म्य सांगणारे होते.

मानवनिर्मित वस्तूंचं वय ठरवण्यासाठी वापरण्यात येणारी 'रेडिओकार्बन डेटिंग' पद्धतदेखील संशोधनादरम्यान वापरण्यात आली.

किनारपट्टीच्या क्षेत्रातील अन्य पुराशास्त्रीय शोधांचं पुनर्मूल्यांकन करायला हवे की नाही, असा प्रश्न या शोधावरून उपस्थित होत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 'PLOS One' जर्नलमध्ये या शोधाशी संबंधित निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)