हो, मी स्त्रीबीज दान करण्याचा निर्णय घेतला! कारण की...

इलेयन चाँग Image copyright christopher paul csiszar
प्रतिमा मथळा इलेयन चाँग

एखाद्या अनोळखी व्यक्तीला मुल व्हावं म्हणून एक स्त्री आपली स्त्रीबीजं दान करेल का? इलेयन चाँगनं आपली स्त्रीबीजं दान केली. काय आहे त्यांचं म्हणणं याबद्दल?

मी अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये होते तेव्हा पहिल्यांदा स्त्रीबीज दानाबद्दल ऐकलं. या विषयाबद्दल माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी शुक्राणू आणि स्त्रीबीज दानाचा समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला. आणि आपण अशी काही गोष्ट देऊ शकतो या विचारांनीच मला आनंद झाला.

स्त्रीबीज संगोपन करणाऱ्या बॅंकांना सदृढ, तरुण आणि सुशिक्षित महिला दात्यांची गरज असते. पण अश्वेत महिलांची (woman of colour) नेहमीच कमतरता पडते अशी माहिती मला आमच्या प्राध्यापकांकडून मिळाली.

एका स्त्रीबीजाची किंमत साधारणतः 3,000 डॉलर (अंदाजे 1.94 लाख रुपये) इतकी असते. जेव्हा या प्राध्यापकांनी लेक्चर हॉलमध्ये ही किंमत सांगितली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं आणि सर्वांच्या तोंडून ओह!... असा आवाज निघाला.

मी अमेरिकेत स्थायिक झालेल्या चीनी वंशाच्या लोकांचा विचार केला. त्यांच्यापैकी काही जणांना बाळ होण्यासाठी काही अडचणी येत असतील.

त्यांना पालक होण्याची इच्छा असेल, पण काही शारीरिक अडचणींमुळे त्यांना होता येत नसेल हा विचार मनाला सुन्न करून गेला.

माझ्या मित्रांपैकी काही जण समलैंगिक आहेत. त्यांनी देखील त्यांच्या भावना मला सांगितल्या. जर कुणी स्त्रीबीजं दान करत असेल तर आम्हाला पालक होता येईल असं त्यांनी मला सांगितलं.

मी माझी स्त्रीबीजं दान करण्याचा निर्णय घेतला. खूप साऱ्या गोंडस लहान मुलांचे फोटो असलेल्या अधिकृत वेबसाइटवर मी स्त्रीबीजं दान करण्यासाठी नोंदणी केली.

Image copyright Getty Images

पण दुर्दैव असं की मला स्त्रीबीज दान करता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. स्त्रीबीजदात्याला एक तपासणी करावी लागते त्या तपासणीत मी 'नापास' झाले होते.

जो कुणी 1980 ते 1997 दरम्यान सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ यूकेमध्ये राहिला असेल ती व्यक्ती अमेरिकेमध्ये रक्त, कि़डनी किंवा स्त्रीबीज दान करण्यासाठी अपात्र ठरवली जाते. कारण त्या व्यक्तीला बीएसई संक्रमणाचा धोका असतो.

मी स्त्रीबीज दान करू शकत नाही हे कळल्यावर निराश झाले. पण माझ्या मनातून हा विचार काही केल्या जात नव्हता.

मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी युकेमध्ये परतल्यावर पुन्हा एकदा तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

मी पुन्हा एका दुसऱ्या वेबसाइटवर नोंदणी केली. त्यांच्या वेबसाइटवर देखील खूप साऱ्या बाळांचे फोटो होते. यूकेमध्ये दात्याला एकाच वेळी 990 डॉलर (अंदाजे 65 हजार रुपये) मिळतात. पण मी ही गोष्ट पैशांसाठी करतच नव्हते.

नोंदणीनंतर मला खूप साऱ्या तपासण्यांसाठी बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी असलेल्या प्रशासक, नर्स आणि डॉक्टरांनी मला खूप सारे प्रश्न विचारले. मी हे नेमकं कशासाठी करत आहे असं त्यांनी मला विचारलं. मी त्यांना एक गोष्ट सांगितली.

माझ्यामुळं कुणाचं कुटुंब पूर्ण होईल याचं समाधान मला मिळेल हे उत्तर मी त्यांना दिलं.

आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे यूकेमध्ये वांशिक अल्पसंख्यांकांच्या दात्यांची संख्या खूप कमी आहे.

  • वांशिक अल्पसंख्यांक स्त्रीबीज दात्यांच्या कमतरतेच्या अडचणीवर वारंवार चर्चा झाल्याचं अनेक सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
  • वेगवेगळ्या वंशांचे स्त्रीबीज दाते यूकेमध्ये उपलब्ध आहेत. पण अल्पसंख्यांकांच्या तुलनेत श्वेतवर्णीय दात्यांची संख्या अधिक आहे.
  • स्त्रीबीज स्वीकारण्यासाठी योग्य दाता शोधणं हे खूप मोठं आव्हान आहे. कारण भावी पालकांना दाता शोधण्यासाठी वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये नोंदणी करावी लागते. जर दाता आणि इच्छुकांची सांगड घालायची असेल तर एखादी कार्यक्षम पद्धत विकसित करण्याची आवश्यकता आहे, असं डोनर कंसेप्शन नेटवर्कच्या संचालिका निना बार्नस्ले यांचं मत आहे.

माझ्या माहितीप्रमाणे चीनी संस्कृतीमध्ये स्त्रीबीज दान करणं निषिद्ध मानलं जातं, याचा कुठेच संदर्भ नाही. पण मी स्त्रीबीजं का दान करत आहे? हे माझ्या आईला समजावून सांगण्यासाठी मला खूप मोठी कसरत करावी लागली.

माझ्या आईला मृत्युपूर्वी अवयव दान करण्याची इच्छा आहे. तिनं वारंवार ही इच्छा बोलून दाखवली आहे. पण स्त्रीबीजं? ही गोष्ट काहीशी वेगळी होती. माझ्या स्त्रीबीजापासून तयार झालेल्या मुलांमध्ये माझी जनुकं असतील. माझे आई-वडील त्या मुलांचा नातवंडं म्हणून स्वीकार करतील? हा प्रश्न माझ्या मनात येऊन गेला.

मी जेव्हा माझा निर्णय माझ्या आईला सांगितला तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया होती "ते ठीक आहे, पण तू तुझ्या वडिलांना याबद्दल सांगू नकोस."

मला जेव्हा दाता म्हणून मान्यता मिळाली तेव्हा मला डॉक्टरांनी अनेक कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या.

चित्रपटात जसं दाखवलं जातं तसं माझ्यासोबत काही होणार नाही असं त्यांनी सांगितलं. माझ्या स्त्रीबीजापासून कुणाचा जन्म झाला याचा शोध मला घेता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

"तुमच्या स्त्रीबीजापासून जन्मलेल्या मुलाला जर आपला जन्म कुणामुळं झाला हे जाणून घेण्याची इच्छा झाली तर ते मूल सज्ञान झाल्यावर तुमचा शोध घेऊ शकतं," असं मला सांगण्यात आलं.

पण, त्यासाठी त्यांना ह्युमन फर्टिलायजेशन अॅंड एम्ब्रायलॉजी अॅथोरिटीकडून परवानगी घ्यावी लागेल असं डॉक्टरांनी मला सांगितलं.

कायदेशीर बाबींचा विचार केला तर हे योग्यचं आहे असं मला वाटलं.

मग सविस्तर फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मी स्वतःला भावी पालकांसमोर कसं सादर करेल? याचा मी सतत विचार करू लागले.

मी माझी उंची, रंग, डोळ्यांचा रंग, वैद्यकीय इतिहासाबद्दल फॉर्ममध्ये लिहिलं. पण या सर्व गोष्टींमुळं मी एक व्यक्ती म्हणून कशी आहे याचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहणार नव्हतं.

मला प्रश्न पडायचे, "त्या भावी पालकांना कसं कळेल की त्यांचं होणारं मूल हे माझ्यासारखं खिलाडू वृत्तीचं, थाय-फूडची आवड असणारं किंवा प्राण्यांची आवड असणारं होईल, या सर्वांची कल्पना त्यांना कशी येईल?"

नंतरच्या काही दिवसांमध्ये माझ्या खूप तपासण्या झाल्या.

Image copyright Getty Images

माझ्या शरीरातून रक्त काढलं की मला खूप राग येतो. पण जेव्हाही मी रक्त दिलं त्या मोबदल्यात स्वतःला समोशांची ट्रीट दिली. त्यामुळं आता समोसा म्हणजे माझ्यासाठी प्रोत्साहनाचं प्रतीक बनलं आहे.

मला दिवसातून दोनदा हार्मोन्सची इंजेक्शन्स घ्यावी लागत असत. मी डॉक्टर आहे असचं मला वाटू लागलं होतं. ही इंजेक्शन्स मी माझ्या फ्रीजमध्ये ठेवत असे. सुदैवानं, या विचित्र बॉक्समध्ये काय आहे? असं मला कुणी विचारलं नाही.

पण मी इंजेक्शन घेत आहे हे कळाल्यावर आईला त्या सुईची भीती वाटली. मी ज्यावेळी इंजेक्शन घेत असे तेव्हा ती रूममध्ये थांबत नसे.

Image copyright Getty Images

मासिक पाळीच्या आधी एखाद्या महिलेची अवस्था जशी असते तशी माझी अवस्था या हार्मोन्स डोसमुळं झाली होती. फक्त फरक एवढाच की ती शंभरपट भयानक असल्याचं मला वाटायचं.

या काळात क्रॅम्प्स येतील असं मला सांगण्यात आलं होतं. पण क्रॅम्प्स तर येतचं असत त्यासोबत बरंच काही माझ्या शरीरात घडत होतं.

या दरम्यान माझं वजन वाढलं. जीन्स? ते तर विसराचं! मला त्या काळात सैल कपडे घालावे लागत असंत.

मी अतिशय भावूक व्हायचे. काही झालं तरी मला रडू यायचं. एखादं भावपूर्ण गाणं लागलं किंवा प्राण्याचा व्हीडिओ पाहिला तरी मला रडू येत असे.

डॉक्टरांना भेटणं देखील कठीण काम होतं. डॉक्टरांची प्रत्यक्ष भेटीची वेळ ही लवकर आटोपत असे पण तुमचा नंबर येईपर्यंत तुम्हाला वाट पाहण्यावाचून काही दुसरा पर्याय नसे.

त्याठिकाणी माझ्यासारख्या इतर दाते असल्यामुळं हा वेळ लागत असे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा वेळ लागला. त्या काळात मी पार्ट टाइम करत होते म्हणून तरी बरं.

जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होण्याची वेळ येऊन ठेपली तेव्हा मला नर्सचा मेसेज आला.

क्लिनिकजवळ एक दहशतवादी हल्ला झाला आहे आणि पूर्ण भागात पोलीस आहेत. त्यांनी तो भाग टेपनं सील केल्याचं तिनं मला सांगितलं.

त्यादिवशी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना तिथं पोहोचताचं आलं नाही. आणि दुसरं म्हणजे ज्या रुग्णांना अत्यावश्यक सेवेची आवश्यकता होती त्यांना हार्ले स्ट्रीट क्लिनिकवर पाठवण्यात आलं होतं. माझं ऑपरेशन हार्ले स्ट्रीट इथंच होईल असं मला सांगण्यात आलं.

Image copyright Getty Images

माझ्या हातात काही दिवसांचा वेळ शिल्लक आहे हे कळल्यावर हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी मला नव्यानं वेळ दिली. मी जेव्हा हॉस्पिटलला जात होते तेव्हा अनेक विचार माझ्या डोक्यात येत होते.

"जर पुन्हा हल्ला झाला आणि त्यात माझा मृत्यू झाला तर? निदान मी परत येताना तरी हा हल्ला यावा. माझ्या पोटात ही अमूल्य स्त्रीबीजं आहेत. ती एखाद्या कुटुंबाला मिळाल्यानंतर माझं काही बरं वाईट झालं तर चालेल." असा विचार माझ्या मनात आला.

मी हार्ले स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हे हॉस्पिटल अत्याधुनिक होतं. तसचं या वेटिंगरूमध्ये चित्ताकर्षक मुरल पेंटिंग्स होत्या. त्या ठिकाणी फॅशन मॅगजीन्स होती आणि अल्ट्रासाउंड पाहण्यासाठी मला मान वळवून पाहण्याची गरज नव्हती. माझ्यासमोर लावलेल्या प्लाजमा स्क्रीनवर मी ते सहज पाहू शकत होते.

तिथल्या नर्सनं माझ्या स्त्रीबीज पिशव्या (एग सॅक्स) मोजल्या. एव्हाना त्या मोजण्यात मी देखील तज्ज्ञ झाले होते. माझी स्त्रीबीजं आता मी देऊ शकते असं त्यांनी मला सांगितलं.

ऑपरेशन आधीच्या रात्री मला उपास करावा लागणार होता.

मला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर यायचं होतं. प्रसंगाचं औचित्य साधून मी ड्रेस घातला. याची दोन कारणं होती एक म्हणजे मी काही रुग्ण नव्हते आणि दुसरं म्हणजे हे हार्ले स्ट्रीट होतं.

मी तिथं पोहचले. तिथं त्यांनी मला वेटिंग रूममध्ये थांबण्यास सांगितलं. तिथं माझ्याप्रमाणे इतर मुलीदेखील आल्या असाव्यात. पण चीनी वंशांची मी एकटीच असावी. कारण हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी बोलताना माझा उल्लेख 'ती चिनी मुलगी' असा केला होता.

मला या आधी कधीच भूल देण्यात आली नव्हती किंवा मला कधी हॉस्पिटलचा गाऊन देखील घालावा लागला नव्हता. माझं लज्जा रक्षण व्हावं याची काळजी त्या नर्स घेत होत्या, पण मी मात्र ऑपरेशन गाऊन म्हणजे बॅकलेस ड्रेस आहे या थाटात बाथरूममध्ये सेल्फी काढत होते.

Image copyright Elaine chong

ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर मी इकडं तिकडं पाहत होते. मला या प्रसंगाचं स्मरण ठेवायचं होतं म्हणून प्रत्येक बाब पाहत होते. पण थोड्याच वेळात त्यांनी मला भूल दिली आणि त्यानंतर पुढची गोष्ट मला लक्षात आहे ती म्हणजे काही वेळानंतर मी रिकव्हरी रूममध्ये होते.

मी काहीशी गुंगीत होते. मला झोप येत-जात होती. बिस्कीट हवं आहे का असं मला नर्सनं विचारलं. त्या अर्ध्या शुद्धीतही मला वाटत होतं की मी एखादी सेलिब्रिटी आहे. "तुझ्याकडं काही असेल तर आण," असं मी म्हटलं.

ते ऐकताच तिनं मला एक चॉकलेटचा बॉक्स आणि 'थॅंकू फॉर डोनेटिंग' असं कार्ड दिलं.

माझी अकरा स्त्रीबीजं काढण्यात आली, असं त्यांनी मला सांगितलं. "या स्त्रीबीजांचा वापर करून निदान एक जरी बाळ जन्मलं तर किती मस्त होईल ना?" या नुसत्या कल्पनेनंच मला भरून आलं.

Image copyright chong

भविष्यात जन्मणाऱ्या बाळासाठी आणि त्याच्या पालकांसाठी एक पत्र लिहा असं मला हॉस्पिटलनं सांगितलं. जोपर्यंत ती मुलं सज्ञान होऊन माझा शोध घेत नाहीत तोपर्यंत हे पत्रच आमच्यातला दुवा आहे असं मला लक्षात आलं.

मी माझ्या फोनवरून हे पत्र लिहिलं. माझ्या भविष्यातील मुलांचा विचार करून मी भावूक झाले आणि रडू लागले.

तुम्ही एका मोठ्या नियोजन आणि प्रेमाचा भाग आहात. तुम्ही मला ओळखत नसला तरी माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझं कुटुंब देखील तुमच्यावर इतकंच प्रेम करतं असं मी त्या पत्रात लिहिलं.

मी त्यांना माझ्याबद्दल थोडी जास्त माहिती पण दिली. माझ्या सामाजिक न्यायाबद्दलच्या काय कल्पना आहेत हे मी त्यांना सांगितलं.

अठरा वर्षानंतर ते मला शोधतील आणि त्यांच्या आयुष्यात काय झालं ते मला सांगतील असं मला वाटतं.

मी पुन्हा स्त्रीबीजं दान करीन? कदाचित करेनसुद्धा. मला वाटतं मी योग्य निर्णय घेतला आहे. हे काम जितकं अवघड आहे असं मला वाटलं होतं इतकं तर ते नक्कीच अवघड नव्हतं.

तुम्ही हे पाहिलं आहे का ?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
हे काँडम महिलांचे प्राण वाचवतं

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)