साडी काय फक्त हिंदूच नेसतात का?

साडी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतात साडी नेसण्याचे 60 प्रकार आहेत.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या असगर कादरी यांच्या लेखात साडीला हिंदुत्ववादी पोशाख ठरवण्यात आलं आहे. त्यांच्या या लेखामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. हा वाद मूळ लेखापेक्षाही विचित्र आहे.

भारतीय फॅशनबद्दल कादरी यांची भूमिका हास्यास्पद आहे. भाजप सरकार सध्या योग, आयुर्वेदिक औषधं, आणि पारंपरिक भारतीय ज्ञान पद्धतीचा प्रसार करत आहे. तसंच मांसाहाराला देखील विरोध होतो आहे. पण त्याचवेळी सगळीकडे भारतीय वेशभूषाच करावी असा आग्रह कुठेही धरला जात नाही.

त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोशाखाचा समावेश नाही. कारण, भारतातल्या सगळ्या पंतप्रधानांचा पोशाख पक्षीय विचारधारा, पक्ष यांच्यापलीकडे असतो. उलट मोदी तर अनेक कार्यक्रमात तिथं शोभतील अशा प्रकारचे पाश्चिमात्य सूट परिधान करतात.

असगर कादरी म्हणतात, "भारतीय फॅशन इंडस्ट्रीवर पाश्चिमात्य कपड्यांना बगल देऊन पारंपरिक भारतीय पोशाखाला प्रोत्साहन देण्याचा दबाव आहे. हा प्रकार 121 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येच्या विविधांगी श्रद्धा असलेला देशाला हिंदू राष्ट्र म्हणून जगासमोर आणण्याच्या राजकीय विचाराशी मिळताजुळता आहे."

भारतीय वेशभूषेतील विविधता

हे अतिशय गलिच्छ आहे. साडी, सलवार कमीज, धोतर, लहंगा, ओढणी, लुंगी, मेखला चादोर, शेरवानी, अचकन आणि नेहरू जॅकेट या पोशाखाचा हिंदुत्वाशी संबंध नाही. भारतातील विविध प्रकारचा पोशाख, भारतातील संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात.

Image copyright Getty Images

प्रादेशिक विविधता आणि पोशाखाच्या शिलाईची पद्धत (उदा. मोदींचा बंद गळा आणि चुडीदार) ही शतकानुशतकं वातावरण, जीवनशैली आणि इतर देशात असलेल्या शैलीवरून विकसित झाली आहे.

ग्रीस, मध्य आशियातले दलाल आणि ब्रिटिशांनी सुद्धा कपडे नेसण्याच्या पद्धती, अचकन, अनारकली आणि अंगरख्याला असलेल्या कट्ससाठी आणि त्यांच्या डिझाइनसाठी योगदान दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे विविध प्रदेशात प्रवास करताना मोदी त्या भागातील पागोटे, टोपी, फेटे इत्यादी घालतात.

पण याचा अर्थ पाश्चिमात्य वेशभूषेकडे कानाडोळा केला आहे असं नाही. उच्चभ्रू पाश्चिमात्य ब्रँड्सना भारतीय बाजारात येण्यासाठी प्राधान्य दिलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मोदी वेगवेगळ्या भागात दौरा करताना त्या भागातील वेशभूषा करण्याचा प्रयत्न करतात.

हर्मिस, कार्टिअर, गुची, झारा, टॉमी हिलफिगर, लिवाईस, बेनेटन या ब्रँड्सचे शोरूम्स आजकाल छोट्या शहरामंध्ये सुद्धा आढळतात. जीन्स, टी-शर्ट आणि इतर ड्रेसेस सर्वत्र मिळतात. त्यामुळे साडी घातली की मला पुरातन काळात गेल्यासारखं वाटतं.

हातमागाला प्रोत्साहन

पारंपरिक भारतीय वेशभूषेला प्रोत्साहन देण्यापेक्षा भारतीय ब्रँड्स आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्याचे या सरकारचे प्रयत्न आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयसुद्धा वाराणसी आणि इतर हँडलूम सेंटरला भारतीयच नव्हे तर जागतिक स्तरावरच्या विविध फॅशन शोसाठी वेगवेगळे पोशाख तयार करायला सांगत आहेत.

वस्त्रोद्योग मंत्री म्हणून स्मृती इराणी यांनी एका पाश्चिमात्य ब्रँडकडे त्यांच्या शर्ट्ससाठी हातमागाचं कापड घेण्यासाठी पाठपुरावा केला. हा त्यांचा आतापर्यंतचा मोठा विजय समजला जातो.

दिवसेंदिवस लयाला जाणाऱ्या हातमाग उद्योगाला उभारी देण्यासाठी हातमाग दिन साजरा केला जातो. पण हा कोणत्याही प्रकारचा अजेंडा नाही. उलट नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोट्या गटात असणाऱ्या विणकरांनी जे भोगलं ते बघता या क्षेत्रासाठी फारसं काही केलं जात नाही असंच आम्हाला वाटतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतीय वेशभूषेत ब्रिटिशांचं सुद्धा योगदान आहे.

हातमागाला सर्व सरकारांनी पाठिंबा दिला आहे. हे हिंदुत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून नाही तर हातमाग हे शेतीनंतर रोजगार देणारं एक सगळ्यात मोठं क्षेत्र आहे.

पण यंत्रमागामुळे हे अतिशय दुर्मिळ असलेलं कौशल्य लोप पावत आहे. 15% लोक हे दुसऱ्या चांगल्या पगाराच्या किंवा अकुशल नोकऱ्यांसाठी विणकाम सोडून देतात.

योगायोगानं हातमागाचा हिंदूत्वाशी काहीही संबंध नाही. अनेक हातमाग कामगार हे मुस्लीम समाजातील आहे. मोदींच्या वाराणसी मतदारसंघातसुद्धा हीच परिस्थिती आहे. मध्य आणि उत्तर पूर्व राज्यातील अनेक कामगार हे आदिवासी आहेत.

हातमागाचे कपडे घालण्याचा किंवा त्यांना प्रोत्साहन देण्याचा संबंध हिंदूत्ववादाशी जोडणं म्हणजे मुस्लीम स्त्रीनं साडी घातल्यास हिंदूत्ववादाचा छुपा अजेंडा आहे असा आरोप करण्यासारखं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा यंत्रमागामुळे हातमागाचं महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे.

आपल्या राजकीय विचारधारेचा प्रसार करण्यासाठी भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्माचा वापर ज्या सरकारांनी केला त्यांनी वेशभूषेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही हे आश्चर्य आहे. त्याची कदाचित दोन कारणं असू शकतील.

पहिलं म्हणजे पारंपरिक भारतीय पोशाखात खाद्यपदार्थांइतकीच विविधता आहे. त्यामुळे कोणत्या एका पोशाखावर बोट दाखवणं अशक्य आहे. भारतीय वेशभूषा ही प्रादेशिक आहे. पूर्ण भारताचा एक असा कोणताही पोशाख नाही. ( उदा. साडी नेसण्याचे भारतात 60 प्रकार आहेत.)

दुसरं असं कारण असावं की सरकारला त्याची गरज वाटत नाही. सध्याची तरूण पिढी पाश्चिमात्य वेशभूषेचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे. पण ते पुन्हा पारंपरिक भारतीय वेशभूषेकडेसुद्धा वळतील.

या प्रकरणात आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य आहे. पण, कादरीसारख्या लोकांनी आमच्या पोशाखावर चुकीची टोपी घालण्याचा प्रयत्न केला हे अतिशय संतापजनक आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)