#BBC Innovators : झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी त्यानं बनवलं टाकाऊपासून टिकाऊ छत

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
व्ही़डिओ: हासित यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे.

टाकाऊ पुठ्ठ्यापासून छप्पर बनवायचं पण तेही वॉटरप्रूफ... झोपडीत राहणाऱ्यांसाठी वरदान ठरलेलं हे छत बनवलंय हासित गणात्रा यांनी.

झोपडपट्ट्या शहरातल्या असो किंवा मग खेड्यातल्या त्या अनेक समस्यांचं आगार असतं.

अहमदाबादमधल्या झोपडपट्ट्या बघून हासित गणात्रा यांच्या लक्षात आलं की, घराचा दर्जा चांगला नसला की लोकांचं जगणं किती अवघड होतं.

2011 च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे 6.5 कोटी लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. याच अहवालानुसार झोपडपट्ट्या म्हणजे 'अशी जागा जिथली घरं मानवी अधिवासासाठी योग्य नाहीत.'

त्या घरांच्या छपरांना भोकं पडलेली असतात. तुम्ही तिथं राहणाऱ्या माणसांना विचारलं की, बाबा काय हे? तर उत्तर येतं, "आमच्याकडे याशिवाय पर्याय काय आहे?"

या झोपड्या सिमेंटच्या किंवा पत्र्यांच्या असतात. तिथं राहणाऱ्यांना उन्हाळ्यात प्रचंड गरम होणार, हिवाळ्यात भयानक थंडी वाजणार आणि पावसाळ्यात घरात पाणी भरणार हे ठरलेलं.

आपलं इंजिनिअरिंग पूर्ण करून हासित गणात्रा घरी परत आले तेव्हा त्यांना वाटलं की, अशा घरांसाठी चांगलं छप्पर स्वस्तात बांधायची पद्धत शोधून काढली पाहिजे. अशी छपरं जी मजबूत असतील आणि लोकांना परवडणारीही.

झोपड्यांची वाईट परिस्थिती

तब्बल दोन वर्षं आणि 300 प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या मॉडरूफ कंपनीला मजबूत आणि वॉटरप्रूफ छप्पर बांधायचा मार्ग सापडला. त्यांनी हे छप्पर टाकाऊ पदार्थ, कागदाचा लगदा आणि नैसर्गिक तंतू (फायबर) वापरून बनवलं.

Image copyright Hansit Ganatra
प्रतिमा मथळा छतांच्या पुढच्या अवृत्तीमध्ये सौर पॅनल बसवण्याचा त्यांचा मानस आहे.

"जगभरातल्या तज्ज्ञांनी आम्हाला सांगितलं की, तुम्हाला हे जमणार नाही. तुम्ही हा नाद सोडा..." गणात्रा सांगत होते.

"पण तुम्ही त्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची परिस्थिती पाहता, तेव्हा तुम्हाला काहीतरी करणं भागच असतं." गणात्रा सांगतात.

मॉडरूफच्या सेल्स टीममध्ये सगळ्या महिला आहेत. यातल्या बऱ्याच जणींनी हे नव्या प्रकारचं छप्पर आधी स्वतः वापरून पाहिलं. त्यामुळे घराला एक टिकाऊ आणि चांगलं छत असणं महिला आणि मुलांसाठी किती महत्त्वाचं आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे, ते म्हणाले.

या टीमच्या सदस्या कौशल्या शर्मा म्हणतात की, लोकांना चांगलं आयुष्य देण्यासाठी हे काम गरजेचं आहे.

"जेव्हा आम्ही लोकांच्या घरी जातो तेव्हा त्यांना अशा अवस्थेत राहताना बघून फार वाईट वाटतं," त्या पुढे म्हणतात.

"मी त्यांना सांगते की, या छताची काळजी घेणं सोपं आहे. आम्ही त्यांना नवीन छपरासाठी कर्ज मिळवायला मदतही करू शकतो. कारण त्यातल्या बऱ्याच जणांना हा खर्च परवडणारा नसतो," कौशल्या शर्मा म्हणतात.

250 स्क्वेअर फुटाच्या छपराला सुमारे 65,000 रुपये एवढा खर्च येतो. पत्र्याच्या छपरापेक्षा हा खर्च जास्त असला तरी सिमेंटच्या छपरापेक्षा हा खर्च कमी आहे.

मॉडरूफचे बहुतांश ग्राहक दोन वर्षांसाठी कर्ज घेऊन हे छप्पर बसवतात. त्यांना साधारणतः 3250 रुपये महिना एवढा हफ्ता बसतो.

"आमच्या घरात 4 लहान मुलं आहेत. आमच्या सध्याच्या छपरामुळे उन्हाळ्यात प्रचंड उकडतं," सकीना सांगतात. मॉडरूफनं सकिना यांच्या घराच्या छपराचं काम लवकरात लवकर सुरू करावं अशी इच्छा त्या व्यक्त करतात.

जागतिक समस्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2020 पर्यंत शहरी भागांमध्ये 2 कोटी स्वस्त घरं पुरवण्याची योजना आखली आहे.

दुसऱ्या बाजूला सेंटर फॉर अर्बन अॅण्ड रिजनल एक्सेलन्स (क्युअर) सारख्या संस्था सध्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये लोकांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत.

"चांगली घरं पुरवण्यातली मोठी अडचण म्हणजे खराब छप्पर आहे. त्यामुळे जर तुम्हाला लोकांना चांगली घर पुरवायची असतील तर छपरावर संशोधन होणं फार गरजेचं आहे," क्युअरच्या संचालक रेणू चोल्सा म्हणतात.

अहमदाबादमधले लोक या नव्या छतांचे अनेक उपयोग करतात. संजय पटेल एक स्थानिक शाळा चालवतात.

Image copyright Hansit Ganatra
प्रतिमा मथळा हे छप्पर बसवणं सुद्धा अगदी सोपं आहेत.

"मुलं छतांवर जाऊन पतंग उडवू शकतात. आधीची पत्र्याचं छप्पर अगदीच कुचकामी होती. त्यावर मुलांना जाऊ देणं म्हणजे धोक्याला आमंत्रण होतं", ते सांगतात.

जगभरातून वाढती उत्सुकता

"जगभरातून लोक आम्हाला या छपराविषयी विचारत आहेत. लोकांना स्वस्त पण चांगली घरं राहायला नसणं ही एक जागतिक समस्या आहे," गणात्रा सांगतात.

मॉडरूफनं बनवलेली छपरं 20 वर्षं टिकू शकतील अशा पद्धतीनं डिझाईन केली आहेत. गणात्रांना आशा आहे की, येत्या काही वर्षांत झोपडपट्टीमधली अनेक घरं त्यांच्या या शोधाचा फायदा घेतील.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)