सापडली! जगातली पहिली सेल्फी सापडली!

सेल्फी घेणारी युवती Image copyright william87 / iStock / Getty Images Plus

"11 वर्षांपूर्वी मी आणि ब्रिटनीनं सेल्फीचा शोध लावला." पॅरीस हिल्टन हिनं रविवारी हे ट्वीट केलं.

गायिका ब्रिटनी स्पीअर्ससोबत 2006ला घेतलेल्या दोन सेल्फीही तिनं यावेळी शेअर केल्या.

पण पॅरीस आणि ब्रिटनीच्या दुर्दैवानं त्यांना हा दावा करायला किमान 167 वर्षं उशीर झाला आहे. कारण जगातली पहिली सेल्फी घेतील होती ती 1839ला. अर्थात त्यावेळी सेल्फी हा शब्द रूढ झाला नव्हता.

मोबाईल आणि सेल्फी असं समीकरण आता रूढ झालं आहे. पण सेल्फीचा इतिहास हा मोबाईलपेक्षा ही जुना आहे. मोबाईलचा जन्म होण्यापूर्वीही हातात कॅमेरा घेऊन स्वतःची छबी टिपण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता.

पण आता मात्र सेल्फीचा सुळसुळाट झाला आहे. मोबाईलचा ज्या काही विविध कामांसाठी वापर होतो त्यात आता सेल्फीचा क्रमांक फार वरचा आहे. घरात, कामच्या ठिकाणी, ट्रिपमध्ये, पार्टीवेळी असा कुठही घेता येणारा फोटोचा प्रकार आता चांगलाच रुळला आहे.

पण सेल्फीचा इतिहास तसा फारच जुना आहे. मोबाईलच्या शोधापूर्वी अनेकांनी कॅमेऱ्यावर हा प्रयत्न केला आहे. पण गेल्या 167 वर्षांत ही सेल्फी कशी विकसित झाली याची ही टाईमलाईन.

1839 : द ट्रेलब्लेझर

उपलब्ध असलेली ही जागतली पहिली सेल्फी 1839ची आहे. 30 वर्षांचा रॉबर्ट कॉर्नेलिअस यानं ती घेतली होती. फिलाडेल्फिया इथं एका दिव्यांच्या दुकानाबाहेर त्यानं ही सेल्फी घेतली आहे.

Image copyright Getty Images

त्यावेळी हा फोटो येईल का नाही, याची त्याला खात्री नव्हती. याच काही आश्चर्य वाटायला नको, कारण हा सेल्फी घेण्यासाठी त्याला 15 मिनिटं एकाच स्थितीत उभ रहावं लागलं होतं. त्यावेळच फोटो घेण्याच तंत्रच तसं होतं.

1914 : राजकन्येचा मिरर फोटो

मोबाईलमध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा येण्यापूर्वी अनेकांनी आरशासमोर उभं राहून फोटो घेतले असतील. पण तुम्हाला माहिती आहे का अशा मिरर फोटोची पहिली नोंद 1914ची आहे.

रशियाच्या झारची लहान कन्या ग्रँड डचेस अॅनास्टसिया निकोलिव्हना ऑफ रशिया हिनं आरशासमोर उभं राहून स्वतःचा फोटो घेतला होता.

तिनं वडिलांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, "मी आरशासमोर पाहताना माझा हा फोटो घेतला. हा फोटो घेणं फारच अवघड होतं. माझे हात फार दुखले."

1920 : आजोबांची सेल्फी

न्यूयॉर्कचे फोटोग्राफर जोसेफ बेरॉन यांनी घराच्या छपरावर ही सेल्फी घेतली होती.

अर्थात हा कॅमेरा मोठा होता आणि तो पकडण्यासाठी त्यांना दुसऱ्याचं सहकार्यही घ्यावं लागलं.

1938 : सेलेब्रिटीची बाथरूम सेल्फी

सेलेब्रिटींनी सेल्फी घ्यायची आणि मग त्यावर लगेचच लाईक आणि शेअरचा पाऊसच. अनेक सेलेब्रिटी तर बाथरूममध्येही सेल्फी घेतात.

पण बाथरूममधली पहिली सेल्फी आहे ती गायक फ्रॅंक सिनाट्रा यांची. प्रसिद्धीच्या झोतात येण्यापूर्वी वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी बाथरूममध्ये आरशासमोर स्वतःचा फोटो घेतला होता.

1966 : सेल्फीतून स्वतःचा शोध

बिट्ल्समधील गिटारवादक जॉर्ज हॅरिसन यांनी आशियाची भटकंती केली होती. या भटकंतीत आलेले अनुभव त्यांनी सेल्फीबद्ध केले आहेत.

फिश आय लेन्स प्रकारच्या लेन्सचा त्यांनी वापर केला होता. त्यानंतर बिटल्सनी त्यांच्या काही उत्तम निर्मिती केल्या होत्या.

2002 : सेल्फी शब्दाचा शोध

सेल्फी या शब्दाचा पहिला वापर ऑस्ट्रेलियातला आहे. ऑस्ट्रेलियात शब्दानंतर ie लिहून ते संक्षिप्त करणं नवीन नाही. "barbie", "tinnie", and "sunnies" ही अशीच काही उदाहरणं आहेत.

2002 मध्ये ऑस्ट्रेलियातल्या एका ऑनलाईन फोरमवर या शब्दाचा प्रथम वापर झाल्याची नोंद आहे. नाथन होप या तरुणानं त्याच्या ओठांचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर त्यानं फोकसबद्दल माफ करा, ही सेल्फी होती असं लिहिलं होतं.

2011 : माकडाची सेल्फी

2011मध्ये गाजली ती माकडाची सेल्फी. फोटोग्राफर डेव्हिड स्लॅटर यांनी एका जंगलात माकडांना कॅमेरा हाताळायला दिला होता.

त्यात नरुटो असं नामकरण करण्यात आलेल्या एक माकडानं ही सेल्फी घेतली होती. या सेल्फीवर स्वामित्व हक्क कुणाचा हा वाद बराच गाजला होता.

त्यानंतर अमेरिकेतील न्यायालयानं नरुटो माकड असल्यानं त्याला स्वामित्व हक्क नाही, असा निकाल दिला.

सेल्फीला बहुमान

2013मध्ये सेल्फी विथ पोप व्हायरल झाली होती. तर ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान हेले थॉर्निंग शिम्ड् यांच्यासोबतच्या बराक ओबामा यांच्या सेल्फीवर टीका झाली होती.

त्याच वर्षी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनं सेल्फीला या वर्षाचा वर्ड ऑफ द इअरचा बहुमान दिला.

2014ची बहुचर्चित सेल्फी

2014ला ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निवेदक एलेन डिजर्नस यांनी सर्वाधिक रिट्वीट होणारा फोटो घेतला.

बार्डली कूपर, जेनिफर लॉरेन्स, मार्ली स्ट्रीप यांच्यासह घेतलेली ही सेल्फी जगातील सर्वाधिक वेळा रिट्वीट झालेली सेल्फी ठरली. त्यावेळी ट्विटरचं सर्व्हर काही काळासाठी डाऊन झालं होतं. तब्बल 3 वर्ष या फोटोचा हा रेकॉर्ड कायम होता.

त्यानंतर 2016मध्ये 16 वर्षांच्या एका मुलानं त्याला चिकन गजेट्स हवेत, असा फोटो टाकला होता. त्या फोटोनं एलेनच्या फोटा रेकॉर्ड मोडला.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)