पॉपकॉर्नचा इतिहास तुम्हाला माहिती आहे?

पॉपकॉर्न Image copyright Getty Images

पॉपकॉर्नला जर जगातला सर्वांत लोकप्रिय स्नॅक्स म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. चित्रपट पाहताना असो वा संध्याकाळी चहाच्या वेळी, बागेत असो वा गप्पा मारताना पॉपकॉर्न प्रत्येक वेळेसाठी आणि वातावरणासाठी एकदम झकास स्नॅक्स आहे याबाबत कुणाचं दुमत नसेल.

बरं पॉपकॉर्न हे पचायला पण हलके आणि आरोग्यदायी असतात. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात मीठ आणि लोणी टाकू शकतात. पण त्यानं हा आरोग्यदायी गुण अबाधित राहणार नाही.

पॉपकॉर्न फक्त आपल्याच देशातच नाही तर जगात सगळीकडं खाल्लं जातं. याचा सर्वांत जुना संदर्भ अमेरिका खंडात सापडतो. उत्तर आणि दक्षिणी अमेरिकेमध्ये रेड इंडियन ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी पॉपकॉर्नचे दाणे सापडले असं सांगितलं जातं.

Image copyright iStock

एक किस्सा तर असा पण सांगितला जातो की, जेव्हा हे दाणे पुरातत्त्व वैज्ञानिकांना सापडले तेव्हा त्यांनी ते भाजण्याचा प्रयत्न केला होता.

गंमत म्हणजे हजार वर्ष जुने असलेले दाणे गरम झाल्यानंतर लगेच फुटले. याचं कारण म्हणजे दाण्यांचं वरचं आवरण हे जाड असतं. साधारणतः 200 डिग्री तापमानावर हे दाणे फुटतात आणि त्याचा पॉपकॉर्न तयार होतो.

आज पूर्ण जगाला पॉपकॉर्ननं वेड लावलं आहे. एक अमेरिकन नागरिक वर्षाला सरासरी पन्नास लीटर पॉपकॉर्न खातो असं म्हटलं जातं. तर ब्रिटनमध्ये गेल्या पाच वर्षांत पॉपकॉर्नच्या विक्रीमध्ये 169 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Image copyright Getty Images

तसं पाहायला गेलं तर याचा इतिहास अगदी पुरातन आहे. पण सर्वांत आधी पॉपकॉर्न खाण्याची सुरुवात अमेरिकेत झाली असं म्हणतात.

अमेरिकेचे मूळ निवासी पॉपकॉर्न खात असत. त्याठिकाणी गेलेल्या युरोपीय लोकांनी देखील पॉपकॉर्न खाण्यास सुरुवात केली.

पॉपकॉर्नची कथा

जर तुम्हाला याबाबत काही गैरसमज असतील तर चला ते दूर करून घेऊ. पहिली गोष्ट पॉपकॉर्न त्या मक्याच्या कणसापासून बनत नाही जे आपण नेहमी खातो.

पॉपकॉर्न एका मक्याच्या विशिष्ट जातीपासून बनतात. वायव्य अमेरकेतल्या काही गुहांमध्ये वैज्ञानिकांना मक्याचे दाणे सापडले होते. तसंच दक्षिण अमेरिकेतही असा मका खात असावेत असं म्हटलं जातं.

Image copyright iStock

प्रसिद्ध वैज्ञानिक थॉमस हार्पर गुडस्पीड यांनी याबाबत काही गंमतीशीर तथ्य सांगितली आहेत. 1941 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं.

संशोधन करत असताना चिलीच्या वैज्ञानिकांनी त्यांना 1000 वर्ष जुने पॉपकॉर्नचे दाणे मिळाल्याचं 'प्लांट हंटर्स इन द अॅंडीज' या पुस्तकात लिहिलं आहे.

एकदा त्यांना वाटलं की, हे खरंच पॉपकॉर्नचे दाणे आहेत की नाही. त्यामुळे त्यांनी ते भाजण्याचा विचार केला. त्यांना वाटलं हे दाणे भाजले जाणार नाही. पण उष्ण तापमानावर भाजल्यावर हे दाणे फुटले. जणु काही मागच्याच वर्षी शेतातून हे दाणे काढले असावेत.

Image copyright Getty Images

पॉपकॉर्न कसे भाजले जातात

पॉपकॉर्न ज्या मक्यांच्या दाण्यांपासून बनतात त्या दाण्यांचं आवरण टणक असतं. नेहमीच्या मक्याच्या दाण्यांपेक्षा हे दाणे चार पट टणक असतात. यामुळं हे दाणे जळण्याऐवजी फुटतात. तापमान वाढलं की दाण्यांमध्ये दबाव वाढतो. आणि जेव्हा हा दबाव त्यांना सहन होत नाही तेव्हा ते फुटतात आणि लाह्यांचा आकार धारण करतात.

वैज्ञानिकांनी हे सप्रमाण सिद्ध केलं आहे, जर तुम्ही दाण्यांवर दबाव टाकला तर त्यांचा आकार आणखी वाढू शकतो. अशा परिस्थितीत ते भाजले तर पॉपकॉर्नचा आकार मोठा होतो.

जगभरात पॉपकॉर्न बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. चीनमध्ये लोखंडाच्या ड्रममध्ये पॉपकॉर्न भाजले जातात. ड्रमचं तोंड उघडं ठेवलं जातं. जेव्हा दाणे फुटू लागतात तेव्हा त्यांच्यावर कॅनवासची झोळी टाकली जाते आणि दाणे त्या झोळीत भरून घेतले जातात.

Image copyright Getty Images

पॉपकॉर्न भाजण्याचं मशीन

पॉपकॉर्न भाजण्याच्या मशीनचा शोध अमेरिकेत 1885 मध्ये लागला. इलिनॉय प्रांतातल्या चार्स क्रेटर्स यांनी हा शोध लावला. त्यांना भुईमुगाच्या शेंगा भाजण्याची मशीन बनवायची होती. त्याचा शोध लावताना हा शोध लागला.

खाद्य संस्कृती इतिहासतज्ज्ञ अॅंड्र्यू स्मिथ सांगतात, "चार्ल्स क्रेटर यांनी पहिल्यांदा हे मशीन 1893ला एका प्रदर्शनामध्ये नेलं होतं. त्यांच्यासोबत त्यांचे एक सहकारी पण असत. त्या ठिकाणी ते दोघे ओरडून-ओरडून पॉपकॉर्न खायला लोकांना बोलवत असंत. हवे तितके पॉपकॉर्न खा आणि पिशवीत भरून घेऊन जा असं ते सांगत. त्यांची ही जाहिरात ऐकून खूप लोकांची गर्दी उसळत असे."

Image copyright Getty Images

पॉपकॉर्न भाजताना पाहून लोकांना उत्साह येत असे. लोकांना पॉपकॉर्नही आवडू लागले. त्यांच्या मशीनची विक्री होऊ लागली. आजही चार्ल्स क्रेटर्स ही जगातली सर्वांत मोठी पॉपकॉर्न मशिन बनवणारी कंपनी आहे.

आरोग्यदायी पॉपकॉर्न

चित्रपट पाहताना आपण जे पॉपकॉर्न खातो त्याला लोणी किंवा मीठ लावलेलं असतं. पण जर हे अल्प प्रमाणात लावलं तर ते आरोग्यदायी ठरतात.

अमेरिकेत तर हे आरोग्यदायी आहे असं भासवण्यासाठी मार्केटिंग टीम आपलं कौशल्य पणाला लावत आहेत. पॉपकॉर्नच्या याच वैशिष्ट्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पॉपकॉर्नची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

Image copyright Getty Images

आता पॅकेटबंद मक्याचे दाणे बाजारात उपलब्ध आहेत. त्या दाण्यांना घरात भाजलं तरी त्याचे पॉपकॉर्न तयार होतात.

मक्याच्या दाण्यांव्यतिरिक्त इतर दाण्यांच्याही लाह्या होतात. गहू, तांदूळ, राजगिऱ्याच्या पण लाह्या तयार होतात. पण त्या मक्या दाण्याइतक्या फुगत नाहीत.

अर्थातच चित्रपट पाहायला गेल्यावर तुम्ही राजगिऱ्याच्या लाह्या थोड्याच खाणार आहात म्हणा! तिथं तर फक्त पॉपकॉर्नचं अधिराज्य आहे. तर मग विचार कसला करता, एखादा छानसा चित्रपट लावा आणि पॉपकॉर्नचा टब घेऊन पाहत बसा.

हे पाहिलं का

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : या आजी-आजोबांच्या सुखी जीवनाचं रहस्य काय?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)