पाकिस्तान : 'ईश्वरनिंदे'वरून हिंसाचार भडकला, लष्कर तैनात

इस्लामाबाद निदर्शनांत हिंसाचार
प्रतिमा मथळा इस्लामाबाद निदर्शनांत हिंसाचार

पाकिस्तानात मुस्लीम निदर्शक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत किमान 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पाकिस्ताननं जमावावर ताबा मिळवण्यासाठी सैन्य बोलावलं आहे.

राजधानी इस्लामाबादमध्ये तहरीक-ए-लब्बैक (TLP) संघटनेच्या रसूल अल्लाह अशरफ जलीना धडा आणि सुन्नी तहरीक यांनी हा शनिवारी मोर्चा काढला होता. या धार्मिक संघटना गेले 20 दिवस इस्लामाबादमध्ये धरणे आंदोलन करत आहेत.

पाकिस्तानचे कायदा मंत्री जाहिद हमीद यांच्यावर ईश्वरनिंदेचा आरोप करत TLPनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी या जमावानं हमीद यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. पण ते तिथं तेव्हा नव्हते. याचदरम्यान झालेल्या पोलीस कारवाईत मोठा गोंधळ उडाला आणि जीवितहानीसह मालमत्तेचं बरच नुकसान झालं.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा 141 हून जास्त लोक जखमी

इस्लामाबादहून बीबीसीच्या प्रतिनिधी शुमाइला जाफरी यांनी सांगितलं की, जखमींना पाकिस्तान मेडिकल सायन्स इन्स्टीट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यात 57 पोलीस आणि 46 नागरिकांचा समावेश आहे.

निदर्शकांनी इस्लामाबाद एक्सप्रेसवे जवळ फैजाबाद इंटरचेंजजवळ तळ ठोकला होता. पण इस्लामाबाद आणि रावळपिंडीच्या इतर भागांमध्येही हिंसाचार भडकला आणि त्यात शेकडो लोक जखमी झाले.

या घटनेची धग लाहोर आणि कराचीमध्येही पोहोचली असून पोलिसांच्या मदतीला निमलष्करी दलाला तैनात करण्यात आलं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा पोलिसांच्या गाड्यांवरही हल्ला झाला.

निदर्शक इस्लामाबादच्या मुख्य रस्त्यांवर तळ ठोकून होते. पोलिसांनी त्यांचे तंबू उखडून टाकले.

तसंच जमाव पांगवण्यासाठी अश्रुधूर तसंच रबरी गोळ्यांचा माराही करण्यात आला. उत्तरादाखल निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा निदर्शकांवर अश्रुधूर सोडण्यात आला.
प्रतिमा मथळा फैजाबाद इंटरचेंजजवळ निदर्शनं

निदर्शनं का भडकली?

गेल्या महिन्यात आलेल्या निवडणूक सुधारणा विधेयकानंतर पाकिस्तानात वाद भडकला होता. सध्या प्रत्येक संसद सदस्याला 'प्रेषित पैगंबर हे इस्लाममधले अखेरचे प्रेषित होते', या आशयाची शपथ घ्यावी लागते.

या नव्या विधेयकाद्वारे ही तरतूद वगळण्यात येणार असल्याचे आरोप झाले. इस्लामिक संघटनांनी या तरतुदी इस्लामविरोधी आणि ईश्वरनिंदात्मक असल्याचं म्हणून विरोध केला.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा इस्लामाबादसह इतरही शहरात हिंसेचं वृत्त आहे.

सरकारने याला कारकुनी चूक म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण निदर्शकांनी कायदामंत्री जाहिद हमीद यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या निदर्शकांना हटवण्याचे आदेश दिले होते.

प्रतिमा मथळा इस्लामाबाद

न्यायालयाने मुदतही घालून दिली होती, पण ती अनेकदा पुढेही ढकलण्यात आली. अखेर शेवटची मुदत संपल्यानंतर सरकारने शनिवारी सकाळी कारवाई सुरू केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा निवडणुक सुधारणा विधेयकाविरुद्ध असंतोष उफाळला.

ही निदर्शनं इस्लामाबाद एक्स्प्रेस वेवरच्या फैजाबाद इंटरचेंजजवळ होत होती. इस्लामाबादला बाकीच्या पाकिस्तानशी जोडणारा रस्ता इथून जातो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 370 निदर्शकांना अटक करण्यात आली.

निदर्शकांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईची बातमी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे कराची, लाहोर, सियालकोटसारख्या शहरांमध्ये पसरत असल्याचं लक्षात आल्यानंतर प्रशासनाने सगळ्या खाजगी वृत्तवाहिन्यांचं प्रक्षेपण काही काळासाठी थांबवलं होतं.

प्रतिमा मथळा निदर्शक-पोलीस आमने-सामने

खाजगी वृत्तवाहिन्यांवरचे निर्बंध पेमरा (PEMRA) च्या आदेशावरून लावण्यात आले.

दरम्यान, या निदर्शनांमुळे आणि धरणे आंदोलनामुळे अनेक मोठे रस्ते बंद होते, ज्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. कार्यालयं, शाळा आणि महाविद्यालयांध्ये उपस्थितीसुद्धा रोडावली होती.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)