ग्राउंड रिपोर्ट : म्यानमारमध्ये बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये एवढा तणाव का?

बौद्ध

पिंपळासारख्या एका मोठ्या झाडाखाली काही पोस्टर लावण्यात आली आहेत, ज्यात एक बौद्ध भिख्खू रागानं आजूबाजूला चिटकवलेल्या आणि विचलित करणाऱ्या चित्रांना निरखून पाहत आहे.

या चित्रांमध्ये "मुस्लिमांकडून जाळण्यात आलेले आणि विध्वंसतेचे बळी पडलेले" बौद्ध लोकं दर्शवण्यात आली आहेत.

स्टीलच्या एका लखलखणाऱ्या बाकड्यावर तीन तरुण बौद्ध विद्यार्थी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रं आणि मॅगझीनमध्ये रोहिंग्या संकटावरचं वृत्त वाचत आहेत.

हे म्यानमारच्या मंडाले शहरात कट्टरवादी बौद्ध भिख्खू अशिन विराथू यांच्या मठाचं प्रांगण आहे.

प्रतिमा मथळा अशिन विराथू मठ

दोन दिवसांत मी इथं सात वेळा आलो. पण माझी निराशाच झाली. महागडी सिगारेट पिणारा एका कर्मचारी एकच उत्तर देत होता, "तुम्ही बीबीसीचे असाल नाहीतर आणखी कोणी, ते तुमच्याशी बोलणार नाहीत."

हे तेच विराथू आहेत, ज्यांना टाईम मॅगझीनने 'फेस ऑफ बुद्धीस्ट टेरर' म्हटलं होतं, आणि म्यानमार सरकारनं त्यांच्या बौद्ध संघटनेवर बंदी आणली होती, कारण त्यांनी म्यानमारमधल्या मुस्लिमांना देशाबाहेर हाकलून लावण्याची धमक्या दिल्या होत्या.

प्रतिमा मथळा मंडालेची सर्वोच्च बौद्ध कमिटी

अशिन विराथूसारख्यांच्या चिथावणींमुळे मठापासून जवळच राहणाऱ्या दाव चिन चीन यी यांच्या सारख्यांना भिती वाटते. चीन यी एक लेखिका आणि कवयित्री आहेत ज्या तीन पिढ्यांपासून मंडालेमध्ये राहत आहेत. त्या अल्पसंख्यांक मुस्लीम समुदायाच्या आहेत.

त्या म्हणाल्या, "आधी इथं धार्मिक सलोखा होता. आता मात्र प्रत्येक जण एकमेकांकडं संशयानं पाहतो. ही वाढती दरी आणि धर्मामुळे विभागलेले लोक बघून दुःख होतं. मला वाटतं, बहुतांश बौद्ध धर्म वक्ते चांगले आहेत. पण काही जण फारच आक्रमक भाषा वापरतात. आशा आहे, हे सगळं इथंच थांबेल, लवकर थांबेल."

प्रतिमा मथळा दाव चिन चीन यी

बर्मामधलं शासन असो वा ब्रिटीश राज, या अलिशान शहरात सर्व धर्मांचे लोक एकत्र राहत आहेत.

पण आता परिस्थिती बिघडली आहे. याला कारण म्हणजे 2014 मध्ये झालेला हिंसाचार, ज्यात बौद्ध आणि मुस्लीम समुदायांचं नुकसान झालं.

मंडालेमधले जाणकार सांगतात की हिंसा भडकल्यानंतर कथित बौद्ध युवकांनी मुस्लीम वस्त्यांवर हल्ले केले होते. त्याचा परिणाम असा झाला की, मुस्लीम समुदाय आता आपल्या लोकांमध्येच एकवटत चालला आहे.

प्रतिमा मथळा मंडाले

मुस्लीम वस्त्यांनी आपल्या गल्लींच्या तोंडावर मोठमोठ्या तारा आणि उंच लोखंडी गेट लावले आहेत, जे रात्री बंद केले जातात.

एका संध्याकाळी मी मंडालेच्या सर्वोच्च बौद्ध समितीच्या ताकदवान भिख्खूंना भेटण्यासाठी गेलो.

नुकतंच रखाइन प्रांताचा दौरा करून आलेले समितीचे ज्येष्ठ सदस्य यू ईयन दसाका यांच्या मते तिथं आता परिस्थिती सर्वसामान्य आहे.

प्रतिमा मथळा मंडाले

त्यांनी सांगितलं, "आम्ही कट्टरवादी वक्तव्य नाही करत. आमच्या देशात सर्वं धर्मांना त्यांचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण इस्लाम धर्माची म्यानमारमध्ये खूप अडचण होते. हा धर्म दुसऱ्यांसोबत मिळून मिसळून राहूच शकत नाही."

आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारच्या सैन्यावर वंश संहाराचे आरोप लावले आहेत. माझ्या अनेक प्रयत्नानंतरही मला रखाइनच्या हिंसाचारग्रस्त भागात जाऊ दिलं गेलं नाही.

खरं तर, बौद्ध धर्माचं पालन करणाऱ्या देशाच्या लष्करावर मंडालेसारख्या बौद्ध धार्मिक केंद्रांचा प्रभाव आहे.

प्रतिमा मथळा मंडाले

गेल्या काही वर्षांत म्यानमारमध्ये वाढणाऱ्या बौद्ध राष्ट्रावादामागे इस्लामच्या प्रति वाढत्या कट्टरवादही एक कारण असल्याचं सांगितलं जातं.

पण बहुसंख्य बौद्ध धर्म मानणाऱ्यांशिवाय राजकीय गटांकडूनही ही बाब नाकारली जाते.

सर्वांत जास्त तणावग्रस्त असलेल्या रखाइन प्रांतात अराकन नॅशनल पार्टी सर्वांत ताकदवान आहे. या पार्टीचे महासचिव आणि माजी खासदार तुन आँग च्या म्हणतात, "हे सगळ आंतरराष्ट्रीय मीडियानं माजवलेलं अवडंबर आहे."

प्रतिमा मथळा बौद्ध भिख्खू

ते म्हणाले, "कट्टर राष्ट्रवादाचा उगम... नाही सर, ही चुकीची माहिती आहे. या देशात लोकं आपापल्या धर्माचं स्वेच्छेनं पालन करण्यास मोकळे आहेत. तसं बौद्ध इथं बहुसंख्य आहेत. हा! रोहिंग्या मुस्लिमांचा उद्देशच मूळात एक वेगळं मुस्लीम राष्ट्र स्थापन करण्याचा आहे. काही देशांकडून त्यांना समर्थनही मिळत आहे."

एका दुपारी मला म्यानमारचं सर्वांत मोठं शहर रंगूनमध्ये एक मोठी रॅली दिसली, जी या विचारांच्या समर्थसाठी काढण्यात आली होती.

हे हजारो लोक रखाइन प्रांतात सुरू असलेल्या लष्करी कारवाईच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले होते.

प्रतिमा मथळा बर्मीज मुस्लीम

मी रंगूनच्या काही जुन्या वस्त्यांमध्येही गेलो, जिथं बर्मीज मुस्लीम शेकडो वर्षांपासून राहत आहेत.

एका जुन्या मशिदीचं छायाचित्र घेत असताना दोन सुरक्षा रक्षक माझ्याजवळ आले आणि म्हणाले, "आत चला. इमाम साहेबांनी बोलावलंय."

आत गेल्यावर इमाम साहेबाच्या खोलीमध्ये तीन लोक थोडे घाबरलेले आणि साशंक दिसत होते. त्यांना चिंता होती की मी काढलेल्या मशिदीच्या छायाचित्रांमुळे त्यांच्या समाजाला काही त्रास तर होणार नाही ना.

तिकडं दुसरीकडं काही जण या गोष्टींवरून अधिक चिंतेत आहेत की, म्यानमारमधून सहा लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांनी पलायन केलं असताना म्यानमारच्या लोकशाहीचे समर्थक शांत का बसलेत?

प्रतिमा मथळा खिन जो विन

खिन जौ विन हे राजकीय घडामोडींचे जाणकार आणि तंपादा थिंकटँकचे संचालक आहेत. ते सांगतात, "राष्ट्रवादीपणा किंवा कट्टर राष्ट्रवाद हा फार लहान शब्द आहे. ब्रिटीश काळात याचं फार महत्त्व होतं."

"पण आता हा प्रकार एका भीतीत रूपांतरीत होऊ लागला आहे. एका प्रकारे इस्लामची भीती दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. वाईट या गोष्टी वाटतं की राजकीय पक्ष आणि बर्माचं लष्करही अशा ताकदींना बळ देण्याचं काम करत आहे."

खरंतर म्यानमारमध्ये शंभरहून अधिक जातीय समूह कित्येक काळापासून एकत्र राहत आहेत. पण आता तसं राहिलं नाही.

बौद्ध धर्म मानणारे आणि अल्पसंख्याक मुस्लीम यांच्यातला तणाव वाढतच चालला आहे. आणि याला कारण आहे, म्यानमारमध्ये राष्ट्रवादाचा वाढता आवाज.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या

प्रमोद सावंत : संघाच्या मुशीतील डॉक्टर ठरले पर्रिकरांचे वारसदार

लोकसभा निवडणुकीचा डिजिटल कार्यक्रम ‘राष्ट्र महाराष्ट्र’, जिथे तुम्ही विचाराल नेत्यांना थेट प्रश्न

मोदी सरकारच्या काळात देशाची सुरक्षा व्यवस्था ढासळली का? बीबीसी रिअॅलिटी चेक

नेदरलँड्सच्या ट्राममध्ये अंधाधुंद गोळीबारात तीन ठार; नऊ जखमी

मुकेश अंबानी धावले अनिल यांच्या मदतीला #5मोठ्याबातम्या

प्रियंका पोहोचल्या त्या मंदिरात, जिथे एकेकाळी इंदिरांनी घेतलं होतं दर्शन

राजकारणामुळे बिघडतेय का केरळच्या मसाल्याची चव?- व्हीडिओ

'त्या हल्लेखोरालाही कधीतरी तीव्र दुःख झालं असणार...' - व्हीडिओ