पाकिस्तान: कसाबच्या गावात कसाबसा मिळवला प्रवेश पण...

कसाब

तो दिवस होता 21 नोव्हेंबर 2012चा. भारतात अजमल कसाबला फाशी दिल्याच्या बातमीनं मला जाग आली.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर हल्ला झाला होता. कसाब या दहा हल्लेखोरांपैकी एक होता. या हल्ल्यात 174 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

अजमल कसाब हा फक्त एकटा हल्लेखोर पोलिसांच्या तावडीत सापडला होता. सुरक्षा दलांनी इतर नऊ जहालवाद्यांचा खात्मा केला होता.

तीन दिवस चाललेल्या या हल्ल्यात ऑटोमॅटिक गन पकडलेल्या कसाबचं छायाचित्र खूप प्रसिद्ध झालं होतं.

कसाबच्या खऱ्या ओळखीबाबत सुरूवातीला अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. तो लष्कर-ए-तय्यबा सदस्य असल्याचा दावा केला होता. पण, त्याविषयी अतिशय कमी माहिती त्यांच्याकडे होती. काही महिन्यानंतर पाकिस्तान सरकारने तो पाकिस्तानचा नागरिक असल्याची माहिती दिली होती.

एका स्थानिक न्यूज चॅनेलला नंतर कळलं की, तो पाकिस्तानच्या मध्य पंजाब भागातील फरिदकोट गावातला होता.

आम्ही तिथे निघालो...

पत्रकार म्हणून त्याच्या मूळ गावात काय परिस्थिती आहे हे बघायला जाण्याची माझी तीव्र इच्छा झाली.

कसाबच्या आयुष्याबद्दल आणि कुटुंबीयांची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेल्या पत्रकारांना मारहाण करण्यात आली होती त्यामुळे मी जरा घाबरले होते.

मी माझ्या कॅमेरामन सोबत प्रवास करत होते. पण, मी तिथल्या स्थानिक पत्रकाराशी संपर्क साधला. त्याला त्या भागातील माहिती होती. तोसुद्धा आमच्याबरोबर आला.

आम्ही एका निमुळत्या गल्लीसमोर असलेल्या एका रस्त्यावर थांबलो. "ही जागा आहे. यापुढे आता आपल्या जबाबदारीवर पुढे जा" त्या स्थानिक पत्रकारानं आम्हाला सांगितलं. मी धैर्य एकवटलं आणि पुढे चालायला सुरुवात केली.

माझा कॅमेरामन आणि स्थानिक पत्रकार माझ्या मागे आले.

पंजाबमधल्या इतर गावांसारखंच तिथं वातावरण होतं. तिथे काही लहान घरं होती. काही छोटी दुकानं होती आणि लहान मुलं बाहेर खेळत होती. पहिल्या पाहण्यात सगळं व्यवस्थित दिसलं. काही लोकांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे झळकत होती.

विचित्र नजरा आणि प्रतिसाद

मी तिथल्या एका माणसाला विचारलं की अजमल कसाबचं घर कुठे आहे? त्यानी माझ्याकडे बघितलं आणि तो माझ्यावर ओरडला, "मला माहिती नाही." तो निघून गेला. मी थोडी घाबरले. पण मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर चालत राहिले.

आणखी एक माणूस तिथं आला आणि मी त्याला तोच प्रश्न विचारला. त्यानं माझ्याकडे रागानं पाहिलं आणि तोंड फिरवून घेतलं.

मी मनातल्या मनात तिथं जाण्यात किती धोका आहे, मी तिथे जावं की जाऊ नये याचे आडाखे बांधत होते. थोडं अजून पुढे गेल्यावर मला तिथे काही मुलं खेळताना दिसली आणि त्यांनासुद्धा मी तोच प्रश्न विचारला.

रस्त्याच्या शेवटी असलेल्या एका हिरव्या गेटकडे त्यांनी बोट दाखवलं.

मी त्या रस्त्यावर मुलांबरोबर चालायाला लागले, ते गेट थोडंसं उघडं होतं. ती मुलं आम्हाला आत घेऊन गेली. तिथे मला एक मोठं अंगण दिसलं.

तिथं एका कोपऱ्यात दोन म्हशी चरत होत्या आणि जमिनीवर लाकडाचा मोठा ढीग पडला होता. ते घर रिकामं वाटत नव्हतं.

मी दोन तीन वेळा दरवाजा ठोठावला आणि कोणी आत आहे का? असं विचारलं. कोणीही प्रतिसाद दिला नाही.

जीव वाचवण्याची कसरत

माझा कॅमेरामन बाहेरच्या भागाचं शूटिंग करत होता. तेवढ्यात काही माणसं आली आणि बखोटीला धरून त्याला बाहेर जा, म्हणून सांगू लागली.

मी तिथं उभ्या असलेल्या एका माणसाशी बोलले आणि कसाबच्या कुटुंबीयांची चौकशी केली.

त्यांच्यापैकी एका माणसाने सांगितलं की, हे पाकिस्तानला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि असा कोणताही माणूस इथं राहत नव्हता.

लवकरच आम्हाला धमकावणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्याचं आमच्या लक्षात आलं आणि आम्ही तडक तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

आम्ही आमच्या कारच्या दिशेनं निघालो आणि आणखी काही माणसांच्या गटानं आम्हाला अडवलं.

त्यांच्यापैकी एकानं आम्हाला सांगितलं की आमचा कॅमेरा तपासून फुटेज डिलिट केल्याशिवाय तिथून जाऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर पोलीससुद्धा होते.

तो माणूस म्हणाला, "लोक आपल्या मर्जीनं इथं येतात, पण आमच्या मर्जीनं परत जातात."

मी त्या माणसाशी बोलत असताना काही माणसांनी आमचा कॅमेरा तपासायला सुरुवात केली. माझ्या कॅमेरामननी त्यांना चकवत फुटेज सेव्ह करून ठेवलं.

आम्ही नशीबवान म्हणून वाचलो. तिथला एक गट अजूनही आम्ही असं जाऊ शकत नाही, असं म्हणत होता. पण कोणीतरी सांगितलं की, आणखी एक मीडियाची टीम आली आहे आणि आम्ही सटकलो.

त्याचं लक्ष काही क्षणांसाठी भरकटलं, आम्ही आमच्या कारच्या दिशेने धावलो आणि निघून गेलो.

मी परत येताना मला काही पत्रकारांचे फोन येत होते. त्यांनी मला सांगितलं की आम्ही तिथून गेल्यापासून कोणालाही त्या ठिकाणी जाऊ देत नव्हते.

तिथले रहिवाशी आहेत असं सांगून काही लोकांनी पत्रकारांना मारहाण केली, त्यांचा कॅमेरा पण हिसकावून घेतला.

एका स्थानिक पत्रकारानं मला सांगितलं की अजमल कसाबचं कुटुंब एका अनोळखी जागी गेलं आहे आणि दुसरंच कोणीतरी तिथं रहात आहे.

हा इतका भयानक अनुभव होता की फरिदकोटला कधीही न जाण्याचं मी ठरवलं.

तुम्ही हे पाहिलं का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : २६/११ हल्ल्यातील पुराव्यांवरून भारत-पाकिस्तानचे आरोप प्रत्यारोप

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)