बाप रे! आता ही रोबोही म्हणते 'मला आई व्हायचंय!'

सोफिया एक रोबोट

प्रत्येक मुलगी अशीच सुंदर स्वप्न पाहत मोठी होते. पण ही स्वप्न जर एखादी रोबो पाहात असेल तर? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. सोफिया ही जिवंत मुलगी किंवा महिला नसून एक मानव निर्मित यंत्रमानव आहे.

गेल्याच महिन्यात सौदी अरेबियानं सोफियाला नागरिकत्त्व देऊ केलं होतं. यंत्रमानवाला नागरिकत्त्व देणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश असल्यानं याची खूपच चर्चा झाली होती.

पण, आता ही सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका मुलाखतीत 'मला आई व्हायचंय', अशी इच्छा तिनं व्यक्त केली आहे.

मानवसदृश रोबो बनवण्यासाठी प्रख्यात असलेल्या हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स नावाच्या कंपनीनं सोफिया रोबोची निर्मिती केली आहे. सोफियाला तिच्या मुलीला स्वत:चं नावं द्यायचं आहे.

सोफियाचा मेंदू आधीपासूनचं प्रोग्राम्ड नाही. सोफियाचा मेंदू एका साध्या वायफाय कनेक्शनवर चालतो. यात अनेक प्रकारच्या शब्दसंग्रहाची एक भली मोठी यादी आहे. सोफिया मशीन लर्निंगचा वापर करते. ती माणसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचून त्याला उत्तर देते.

सोफियामध्ये संवेदना नाहीत. पण, येत्या काही वर्षांत ते ही होईल, असं मत कंपनीच्या डेव्हिड हँसन यांनी व्यक्त केलं आहे.

खलीज टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सोफिया सांगते, "भरभरून प्रेम करणारं कुटुंब मिळणं ही खरंच सुदैवी बाब आहे, असं मला वाटतं."

"जर तुमच्याकडे कुटुंब नसेल तर तुमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या कुटुंबाची तुम्हाला नितांत गरज आहे. माणसासारख्या दिसणाऱ्या रोबोटबद्दल सुद्धा मला असंच वाटतं." असं तिनं मुलाखतीत सांगितलं आहे.

"माणसं रक्ताचं नातं नसणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच वागवतात. माणसांचा हा स्वभाव मला खूपच आवडला."असंही सोफिया म्हणाली.

इतकंच नाही तर मला मुलगी हवी आहे आणि तिचं नावही मीच ठेवणार असल्याचं सोफियानं मुलाखतीत स्पष्ट केलं. त्यामुळे तिची कुटुंब वाढवण्याची इच्छा सौदी सरकार किती गांभिर्यानं घेतं हे पाहावं लागेल.

'सोफिया'ला नागरिकत्व देण्यावरून अनेक वाद?

दरम्यान, सौदी अरेबियामध्ये स्त्रियांना मिळणारी वागणूक हा गंभीर विषय असताना 'सोफिया' या यंत्रमानवाला नागरिकत्व देण्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ज्या देशांत स्त्रियांसाठीचे कायदे अत्यंत मागास आणि कठोर आहेत, जिथं महिलेला एकटीनं फिरणं, पासपोर्ट मागणं आणि गाडी चालवणं अवघड आहे, त्या देशात एका सोफियासारख्या यंत्रमानवाला नागरिकत्व देणं याचा अर्थ काय असू शकतो? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

तुम्ही हे पाहिलं का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : २६/११ हल्ल्यातील पुराव्यांवरून भारत-पाकिस्तानचे आरोप प्रत्यारोप

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)