गर्लफ्रेंड मेगन मार्कलशी विवाहबंधनात अडकणार प्रिन्स हॅरी

प्रिन्स हॅरी आणि गर्लफ्रेंड मेगन मार्कल Image copyright Reuters
प्रतिमा मथळा प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल लवकरच लग्न करणार आहेत.

ब्रिटीश युवराज प्रिन्स हॅरी लवकरच गर्लफ्रेंड मेगन मार्कलशी लग्नबंधनात अडकणार आहे.

हॅरीच्या विवाहासंदर्भात घोषणा करताना अत्यंत आनंद होतो आहे, असं प्रिन्स चार्ल्स यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. प्रिन्स हॅरीनं मार्कल कुटुंबीयांचे शुभाशिर्वाद घेतले आहेत.

गेल्यावर्षीपासून एकमेकांच्या ऋणानुबंधनात असलेले हॅरी आणि मेगन यांचा या महिन्याच्या सुरुवातीला साखरपुडा झाला होता. ज्याबद्दल कुणाला फारशी माहिती देण्यात आली नव्हती.

केवळ महाराणी आणि कुटुंबातील प्रमुख सदस्यांना हॅरी आणि मेगन यांच्या लंडनमध्ये झालेल्या साखरपुड्याबद्दल कल्पना होती.

प्रिन्स चार्ल्स यांच्या अधिकृत निवासस्थानाकडून मिळालेल्या निवेदनानुसार लग्नाच्या तारखेविषयीचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल.

मेगन लॉस एंजेलिसमधल्या मध्यमवर्गीय वातावरणात लहानाची मोठी झाली आहे. खाजगी कॅथलिक शाळेत तिचं शिक्षण झालं आहे. मेगनला राजघराण्याची कोणतीही पार्श्वभूमी नाही.

राजपदाच्या दावेदारांमध्ये पाचवा क्रमांक लागणाऱ्या हॅरी आणि मेगन यांचा विवाह पुढच्या वसंत ऋतूत होणार आहे. नवदांपत्य लंडनमधील केनसिंग्टन महालातील नॉटिंगहॅम कॉटेजमध्ये राहील.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा मेगन असंख्य मानवतावादी चळवळींशी संलग्न आहे.

मेगन मार्कल ही हॉलीवूड अभिनेत्री आहे. ती घटस्फोटित आणि मिश्र वंशाची आहे.

मेगन मानवतावादी चळवळींसाठी काम करते. लिंगसमानता आणण्याच्या दृष्टीने ती प्रयत्नशील आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या महिला विभागाची सल्लागार म्हणून कार्यरत असणाऱ्या मेगननं किशोरवयीन मुलींमध्ये नेतृत्त्वगुण विकसित करण्याच्या दृष्टीनं काम केलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मेगनला राजघराण्याची कोणतीही पार्श्वभूमी नाही.

मेगन सध्या संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ सल्लागार एलिझाबेथ न्यामायारो यांच्या बरोबरीनं विविध उपक्रमांसाठी कार्यरत आहे.

मात्र प्रसारमाध्यमांमध्ये मेगनच्या पूर्वआयुष्याबद्दल चर्चा होते. म्हणूनच प्रिन्स हॅरीनं यासंदर्भात जाहीर निवेदन प्रसिद्ध केलं.

"मेगनला खाजगी आयुष्य आहे. तिच्या खाजगीपणाच्या अधिकाराचं जतन व्हावं. कारण तिच्यासंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना वंशवादी सूर आहे," असं हॅरीनं म्हटलं होतं.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)