इवांकाताई, तुम्ही मुंबईतही या.. मग इथले रस्त्यावरचे खड्डे बुजवले जातील!

इव्हांका ट्रंप Image copyright Getty Images

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कन्या इवांका ट्रंप या एका व्यावसायिक परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आल्या. पण त्या देशाची आर्थिक राजधानीतच येणार नसल्याचे ऐकून एका मुंबईकराची निराशा झाली. तेव्हा एका पत्राद्वारे या मुंबईकरानं आपल्या खास शैलीत त्यांना मुंबईतही येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

नमस्कार इवांकाताई,

आमच्याकडे नेत्यांना भाऊ, आप्पा, तात्या आणि त्यांच्या मुला-मुलींना दादा-ताई म्हणण्याची प्रथा आहे. म्हणून तुमच्या तीर्थरूपांना आमच्याकडे ट्रंपतात्या म्हटलं जातं, तर तुम्ही आमच्यासाठी इवांकाताई!

तर ताई, तुमचं भारतात स्वागत! हैदराबादला तुम्ही आला आहात. तुमच्यासाठी हैदराबाद शहरच नाही तर आजूबाजूच्या परिसरानंच कात टाकलीये. निझामशाहीची राजधानी म्हणून ओळख असलेल्या या शहरानं IT क्रांतीनंतर सायबराबाद म्हणून ओळख मिळवली.

या कायापालटानंतर आत्ता तुमच्यामुळं पुन्हा एकदा हे शहर कात टाकतंय. चकाचक रस्ते, रंगवलेल्या भिंतींनी तुमचं स्वागत केलं आहे.

इवांकाताई, तुम्ही हैदराबादला आलात याचा आम्हाला आनंद आहेच. पण आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या मुंबईला एकदा तरी येऊन जा ना!

कसंय, तुम्ही एक दिवसासाठी मुंबापुरीत आला तर या महानगरीचंही रुपडं पालटून जाईल.

Image copyright Getty Images

खरंतर तुम्ही ज्या ग्लोबल आँत्रेप्रेन्युअरशिप समिटसाठी आला आहात, तो मोठाच कार्यक्रम आहे. आणि त्यासाठी हैदराबादेत कामं केली जाणार होतीच.

पण तुम्ही येणार म्हणून खास मेहनत घेतली गेली आहे. तेलंगणा सरकारनं कायापालटासाठी आठ कोटी खर्च केलेत.

त्याशिवाय हैदराबाद महानगरपालिकेनं बराच खर्च केलाय. त्यांनी आकडा अजून उघड केलेला नाही.

आमची मुंबई महानगरपालिकाही काही कमी श्रीमंत नाही. तुम्ही येणार असाल तर तीही भरपूर खर्च करू शकते.

हैदराबादचे खडबडीत रस्ते तुम्ही येणार म्हणून एकदम गुळगुळीत झाले आहेत. तुमचा कार्यक्रम जिथं होत आहे ते हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर, मादापूर येथील IT हब या भागातले रस्ते जणू काय नव्यानंच बांधले गेलेत.

तसं तर हैदराबादचे अनेक रस्ते अनेक दिवसांपासून डागडुजीची वाट पाहत होते. तुमच्या येण्यानं त्यांचं भाग्य उजळलं आहे.

बरं, फक्त रस्तेच चकाचक केलेत, असं नाही. आजूबाजूचे फूटपाथ, भिंती यांचीही रंगरंगोटी करण्यात आली. शोभेत आणखी भर म्हणून फूटपाथवर कुंड्याही ठेवण्यात आल्या आहेत.

Image copyright Getty Images

आम्ही मुंबईकर तर खड्ड्यातूनच वाट काढत असतो. "नेमेची येतो 'खड्ड्यांसह' पावसाळा", अशी आमची परिस्थिती.

तुम्ही आलात तर खड्ड्यांपासून मुक्ती तर होईलच आमची, वरून चकाचक रस्तेही मिळतील.

रस्ते कोणी दुरुस्त करायचे यावर आमच्याकडे सेनेची महापालिका आणि भाजपचे राज्य सरकार यांच्यात वादावादी सुरूच असते. तुम्ही येणार म्हटल्यावर दोघं मिळून एकदिलाने खड्डे बुजवतील.

तुम्ही येणार म्हणून चारमिनारलाही झळाळी मिळाली म्हणे. तुम्ही तिथं थांबणार का, हे अजूनही नक्की नाही. पण तुम्ही काही सेकंदासाठी तरी थांबणार, हे गृहित धरून चारमिनारला झळाळी देण्याचं काम झालं.

अशीच अनेक ऐतिहासिक स्थळं मुंबईतही आहेत. त्यांच्या दर्शनासाठी तुम्ही आलात तर त्यांच्याकडे महापालिकेचं थोडं लक्ष जाईल.

तुम्ही गोवळकोंड्याच्या किल्ल्यावर जाणार आहात म्हणून तो किल्ला डासमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

किल्ल्यावर धूरफवारणी तर झालीच आहे. याशिवाय किल्ल्याच्या भिंतींवर लेमन ग्रास लिक्विड फवारण्यात आलंय, जेणेकरून एकही डास तुमच्या आसपास भटकता कामा नये.

Image copyright Getty Images

आमच्या मुंबईकरांचं तर डासांनी जगणं मुश्किल केलंय. तुम्ही आला तर आमची मुंबई महापालिका अगदी तत्परतेने डासांचा बंदोबस्त करेल आणि आमचीही डासांपासून थोडीफार मुक्ती होऊ शकेल.

बरं किल्ल्याचाच विषय निघाला म्हणून सांगतो, आमच्याकडेही रायगड आहे. शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी राहिलेल्या आमच्या या रायगडावर प्यायला पाणीही सहजासहजी मिळत नाही.

स्वराज्याच्या राजधानीची हेळसांडच झाली आहे. तुम्ही गोवळकोंड्याप्रमाणे रायगडाला भेट दिली तर आमच्या सरकारचंही रायगडाकडे लक्ष जाईल.

आमच्या मुंबईत आल्यावर एकदा आमची लाईफलाईन असलेल्या लोकल प्रवासाचा कार्यक्रमही ठेवा, बरं का! तुम्ही लोकलमधून प्रवास करायचं ठरवलं तर कदाचित रेल्वे तातडीने एसी लोकल सुरूही करतील.

आम्ही मुंबईकर बऱ्याच दिवसांपासून एसी लोकलची चातकासारखी वाट पाहतोय. तुमच्यामुळे ती लोकल सुरू तरी होईल.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा इवांका यांच्या दौऱ्यानिमित्त हैदराबादमध्ये भिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली.

अरे हो, तुमच्यामुळे हैदराबादच्या रस्त्यावरचा कचराही गायब झालाय म्हणे. ते तर आमच्यासाठी खूपच महत्त्वाचं. तुम्ही आलात तर काही दिवसांसाठी तरी मुंबईकरांना कचऱ्याचा तो वास सहन करावा लागणार नाही.

तुमच्या आगमनामुळे हैदराबादेतील कचऱ्याबरोबरच भटके कुत्रेही गायब करण्यात आलेत म्हणे. इथं मुंबईत तर भटक्या कुत्र्यांमुळे रात्री जीव मुठीत धरून घरी पोहचावं लागतं.

तुम्ही आलात तर भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त होऊन जाईल.

बरं त्या हैदराबादमध्ये तुमच्यामुळे भिकाऱ्यांवर मोठीच संक्रांत आलीय. आमच्या मुंबईत भिकारी असले तरी आम्हाला त्यांच्या पोटावर पाय द्यायचा नाही.

त्यामुळं तुम्ही याल तेव्हा मुंबई महापालिकेला स्पष्ट सांगा की भिकाऱ्यांची मला ऍलर्जी नाही!

बरं आता थांबतो. मुंबईला यायचं कसं जमवता येईल, ते बघा आता. तात्यांना साष्टांग दंडवत!

तुमचाच,

एक मुंबईकर

तुम्ही हे पाहिलं का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : प्रिन्स हॅरी यांनी मेगन यांच्यासाठी डिझाईन केली अंगठी

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)