सिंधू संस्कृतीचा उगम नदी किनारी झालाच नव्हता?

सिंधू

मानवी उत्क्रांतीमधील सर्वांत जुन्या नागर संस्कृतींपैकी एक असलेल्या सिंधू संस्कृतीवर संशोधकांनी नवा प्रकाश टाकला आहे. नदीच्या अस्तानंतर ही संस्कृती उदयास आली असा निष्कर्ष नव्या संशोधनातून काढण्यातं आला आहे.

आताच्या भारत आणि पाकिस्तानच्या वायव्येस 5,300 वर्षांपूर्वी ही सिंधू संस्कृती उदयास आली. या संस्कृतीच्या उदयाचं बरचसं श्रेय हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांमुळे इथं झालेल्या सुबत्तेला दिलं जातं किंवा तसं मानलं जातं.

पण नव्याने झालेल्या संशोधनानं असं दाखवून दिलं आहे की या प्रदेशात मनुष्य स्थिरावण्यापूर्वीच नदीनं प्रवाह बदलला होता.

मोठ्या आणि प्रवाही नदीमुळे निर्माण झालेल्या साधनसंपत्तीचा लाभ या संस्कृतीला झाला नाही. या उलट इजिप्त आणि मेसोपोटामिया या संस्कृतींना मात्र अशा साधनसंपत्तीचा मोठा लाभ झाला होता.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर (IITK) आणि इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनमधल्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे.

कांस्य युगातील या मानवी संस्कृतीला पाण्याची मोठी गरज होती. पण ती गरज मान्सूनच्या पाण्यामुळं भागवली गेली असेल, अशी मांडणी या संशोधकांनी केली आहे.

Image copyright A Singh
प्रतिमा मथळा घग्गर-हाक्रा प्रचीन नाल्याच्या गाळाचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे.

IITKचे प्रा. राजीव सिन्हा म्हणाले की, "नदी लुप्त झाल्यानं हडाप्पा संस्कृती लयास गेली अशी सर्वसाधारण संकल्पना आहे. नदी आणि संस्कृती यांच्यातील संबंध अधोरेखित करणारी ही जुनी कल्पना आमच्या संशोधनानं मोडीत काढली आहे."

ते म्हणाले, "प्राचीन समाज रचनांमध्ये मोठ्या नद्यांना महत्त्व होतंच. पण अशा नद्यांच्या अस्तित्वापेक्षा या नद्यांचं लुप्त होणं जास्त परिणामकारक ठरलं, अशी आमची मांडणी आहे."

"आमच्या संशोधनानुसार 8000 ते 12,000 या कालखंडात नदी लुप्त झाली. तर ही संस्कृती 3000 ते 4000 या कालखंडात सर्वोच्च पातळीवर पोहचली होती," अशी माहिती त्यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना दिली.

प्रा. सिन्हा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन 'नेचर कम्युनिकेशन जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालं आहे.

घग्गर-हाक्रा या प्राचीन नदी पात्राचा यात पुन्हा अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनासाठी प्रत्यक्ष जागेवर तसेच उपग्रहाकडून घेतलेल्या माहितीचा आधार घेण्यात आला आहे.

Image copyright NASA/USGS
प्रतिमा मथळा प्राचीन कालव्यातील गाळांतील फरक नासाच्या इन्फ्रारेड सॅटेलाईट इमेजमधून दिसून आला आहे.

सिंधू संस्कृतीमधील कालिबंगन आणि बनवाली अशी काही नगरं, या नदीच्या किनाऱ्यावरच वसली होती.

"आता जे नदीच्या खोऱ्याचे अवशेष आहेत, ते सतलज नदीचं जुनं खोरं असावं. या नदीनं कालांतरानं प्रवाह बदलला असावा. प्रवाह बदलण्याची प्रक्रिया हिमालयातील नद्यांच्या बाबतीत सातत्यानं घडते," अशी माहिती त्यांनी दिली.

"हिमालयातील नद्या 100 वर्षांत प्रवाह बदलत असल्याची उदाहरणे आहेत," अशी माहिती इंपिरियल कॉलेजमधील प्रा. संजीव गुप्ता यांनी दिली.

"सतलज नदी बदलेल्या प्रवाहात राहिली. त्यामुळे प्राचीन पात्र सुरक्षित राहिला. यातून एक प्रकारे सिंधू संस्कृतीची प्रगतीच झाली. कारण यामुळेच या संस्कृतीचं विनाशकारी पुरांपासून संरक्षण सुद्धा झालं," असं ते म्हणाले.

Image copyright S.Gupta
प्रतिमा मथळा कालिबंगन इथल्या रस्त्याचे अवशेष

या संस्कृतीमधील काही मोठी नगरं या नदी पात्राच्या काठानं वसली होती. अशी प्राचीन शहर हिमालयात उगम पावणाऱ्या नदीच्या काठाला वसली असती तर ती नष्ट होण्याचा धोका अधिक होता, असं ते म्हणाले.

ऑप्टिकली स्टिम्युलेटेड लुमिनेसन्स या तंत्रज्ञानाचा वापर करून या नदी पात्रातील गाळाचा कालखंड मोजण्यात आला आहे.

सतलज नदीचा प्रवाह बदलाची सुरुवात 15000 वर्षांपूर्वी झाली, तर आताच्या प्रवाहात येण्याचा कालावधी 8,000 वर्षांपूर्वीचा आहे, असं नवं संशोधन सांगतं.

गुप्ता म्हणाले, "सिंधू संस्कृतीमधील लोक कुशल अभियंते होते. त्यांनी त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण केल्या होत्या. त्यांनी भूजलचा वापरही केला असावा. परिस्थितीवर त्यांनी कशी मात केली असेल, या प्रश्नाचं उत्तर पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी शोधायचं आहे."

Image copyright S.Gupta
प्रतिमा मथळा कालिबंगन इथं आढळणारी सिंधू संस्कृतीतल्या मातीच्या भांड्यांचे अवशेष

"पण एकमात्र नक्की आहे, ते म्हणजे या संस्कृतीचा भूप्रदेश वैविध्यपूर्ण होता आणि त्यांनी त्याच्याशी जुळवून घेतलं होतं," असं ते म्हणाले.

न्यूयॉर्क युनिर्व्हसिटीमधील मानववंश विषयाच्या शास्त्रज्ञ प्रा. रिटा राईट म्हणाल्या की हे नवीन संशोधन आपल्या ज्ञानात भर घालणारं आहे.

"पण हे संशोधन हडप्पा संस्कृतीनं व्यापलेल्या एकूण भूभागाच्या फारच कमी जागेवर झालं आहे. हे संशोधन या भागापुरतं मर्यादित आहे. तरीसुद्धा या संशोधनाला मोठं महत्त्व आहे," असं ते म्हणाले.

पाण्याच्या नव्या परिसंस्थेची मांडणी हे संशोधन करतं. सिंधू संस्कृतीत पाण्याला मोठं महत्त्व होतं, हे नाकारता येत नाही. पण मैदानावरील आणि घग्गरमधील मान्सूनवर आधारीत पाण्याची व्यवस्था यात मोठा फरक होता, याचा हा पुरावा आहे, असं त्या म्हणाल्या.

हे वाचलं का?

महत्त्वाच्या बातम्या

2014 मध्ये भाजप सरकार आलं, पण 2019मध्ये NDAचं सरकार येईल - संजय राऊत

16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं: धनंजय मुंडे

'महाराष्ट्र सरकारच्या अमृतमंथनामधलं विष माझ्या वाट्याला आलं'

मशीद हल्ल्यानंतर न्यूझीलंडमध्ये शस्त्रबंदीला पाठिंबा मिळणार?

विजयसिंह आणि रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये जाणार

पहिल्या विमान उड्डाणाच्या वर्षी या आजीचा जन्म झाला होता... - व्हीडिओ

'आता फक्त मोदी-शाहविरुद्ध प्रचार करा, त्याचा फायदा कुणालाही होवो'

'...तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार'

नायलॉन दोरीने घेतला वाघिणीचा जीव; दीड वर्षं होती जखमी