प्रक्षोभक रिट्वीटवरून ट्रंप आणि थेरेसा मे मध्ये जुंपली

ट्रंप आणि थेरेसा मे Image copyright Getty Images

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रिट्वीट केलेल्या तीन ट्वीटवरून युनायटेड किंगडम (UK)च्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या कार्यालयानं नाराजी व्यक्त केली. त्यावर ट्रंप यांनी त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी ब्रिटनमधील दहशतवादावर लक्ष केंद्रीत करावं.

झालं असं की ट्रंप यांनी अती-उजवे समजल्या जाणाऱ्या 'ब्रिटन फर्स्ट' या संघटनेच्या उपनेत्या जेडा फ्रांसेन यांचे तीन व्हीडिओ ट्वीट रिट्वीट केले होते. त्यात एका मुस्लीम निर्वासिताकडून एक कुबड्या घेऊन चालणाऱ्या व्यक्तीला मारहाण होताना दाखवण्यात आलं आहे.

ट्रंप यांनी थोडाही वेळ न दवडता हे तीनही ट्वीट रिट्वीट केले.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या या कृतीच्या प्रत्युत्तरात ब्रिटनच्या पंतप्रधान मे यांच्या कार्यालायानं म्हटलं आहे, "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ब्रिटनमधील अती-उजवी संघटना ब्रिटन फर्स्टतर्फे करण्यात आलेले व्हीडिओ ट्वीटला रिट्वीट करणं चुकीचं आहे."

ट्रंप यांनी मग मे यांना प्रत्युत्तरात ट्वीट केलं, "थेरेसा मे, माझ्याकडं लक्ष देऊ नका. त्याऐवजी कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादावर लक्ष केंद्रीत करा, जो ब्रिटनमध्ये फोफावत आहे. आमचं बरं चाललंय."

मे यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आलं की, "ब्रिटन फर्स्ट हे द्वेषपूर्ण गोष्टी पसरवतात, ज्या की खोट्या असतात आणि तणाव निर्माण करतात."

अमेरिका आणि ब्रिटन हे अतिशय जवळचे मित्र समजले जातात. त्यांच्यात विशेष मैत्री असल्याचं नेहमी म्हटलं जातं.

व्हीडिओमधले दावे कितपत सत्य?

अती-उजव्या विचारसरणीच्या ब्रिटीश नॅशनल पार्टीच्या सदस्यांनी 2011 मध्ये 'ब्रिटन फर्स्ट' संघटनेची स्थापना केली. ही संघटना सोशल मीडियावर विवादास्पद पोस्ट टाकण्यासाठी ओळखली जाते.

Image copyright TWITTER

याच संघटनेच्या उपनेत्या जेडा फ्रांसेन यांचे ट्वीट ट्रंप यांनी रिट्वीट केले. ट्रंप यांचे चार कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

जेडा फ्रांसेन यांच्यावर "धमकी देणं तसंच अपमानास्पद किंवा अपमानजनक शब्द वापरणं किंवा वर्तणूक ठेवण्याचे" आरोप ब्रिटनमध्ये केले जातात.

ट्वीट केलेल्या एका व्हीडिओत एक मुस्लीम स्थलांतरीत डच व्यक्तीवर हल्ला करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हाच व्हीडिओ एका डच वेबसाईटवर वापरण्यात आला होता. नंतर मे 2017 मध्ये तो त्यावरून काढण्यात आला.

या ट्वीटमध्ये केलेले दावे संशयास्पद आहेत. डच वृत्तपत्र डी टेलिग्राफने म्हटलं आहे की, या व्हीडिओच्या अनुषंगाने पोलिसांनी दोन जणांना अटक केली. हे दोघं उत्तर नेदरलॅंडमधील आहेत.

डच पब्लीक प्रोसिक्यूशन सर्व्हिसच्या प्रवक्त्याने सांगितलं की संबधित व्हीडिओतील व्यक्ती ही स्थलांतरीत नसून नेदरलँडमधीलच आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)